Home महाराष्ट्र कोकण मेवा ..आणखी किती पर्यटकांचे बळी हवेत?

..आणखी किती पर्यटकांचे बळी हवेत?

0

कोकणात लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. मात्र, दुर्देवाने त्यातील अनेक पर्यटकांना समुद्राच्या अक्राळ लाटांनी आपले भक्ष्य बनविले आहे.
शनिवारी सकाळी मालवणच्या वायरी, भूतनाथ समुद्रात पर्यटन आणि समुद्रस्नानाची मजा लुटण्यासाठी आलेल्या बेळगावच्या मराठामंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील अकरा विद्यार्थी, विद्यार्थीनी बुडाले. दुर्दैवाने त्यातील ८ विद्यार्थी प्राध्यापकासह बुडून मृत्यू पावले. सुदैवाने तीन विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले. समुद्रात बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात सतत होत आहेत. कोकणच्या समुद्राच्या ओढीने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, बेळगाव, तसेच अन्य ठिकाणचे पर्यटक सिंधुदुर्गात दरवर्षी येतात. अनोख्या समुद्रस्नानाचा मनसोक्त आनंद लुटावा. समुद्राच्या फेसाळत येणा-या लाटा अंगावर घेऊन तृप्त व्हावे, समुद्रसफरीचा आनंद मनसोक्त घ्यावा यासाठी कोकणात लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. मात्र, दुर्देवाने त्यातील अनेक पर्यटकांना समुद्राच्या अक्राळ लाटांनी आपले भक्ष्य बनविले आहे.

कोकणच्या समुद्रकिना-यावर दरवर्षी कुठेना कुठे पर्यटक बुडतात त्यातील काही सुदैवाने बचावतात. परंतु समुद्रात बुडून मृत्यू पावणा-यांची संख्या काही कमी होत नाही. आणि त्यामध्ये अतिउत्साही, अनभिज्ञ महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनींची संख्या जास्त आहे. दरवर्षी समुद्रात बुडणारे हे पर्यटक स्वत:च्या दुर्दैवाने मृत्यू पावत असले तरी कोकणच्या समुद्रातील पर्यटकांचे मृत्यू एकप्रकारे सरकारी प्रशासकीय अनास्थेचे आणि बेफिकीरीचे बळी आहेत, असेच म्हणावे लागेल.

कोकणच्या समुद्र पर्यटनात दरवर्षी वाढ होत आहे. लाखो पर्यटक दरवर्षी कोकणात समुद्राच्या ओढीने येतात. परंतु, या पर्यटकांच्या जीविताच्या रक्षणाची कोणतीही यंत्रणा महाराष्ट्र सरकारने अगर जिल्हा प्रशासनाने कोकणाच्या किना-यावर उभारलेली नाही. कोकणातील सिंधुदुर्गातील मालवण-वायरी समुद्रात शनिवारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. गतवर्षीही मालवण-तारकर्ली समुद्रात पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा- वेळागर, उभादांडा-सागरेश्वर, मोचेमाड, तसेच देवगड या समुद्र किना-यांवरही यापूर्वी पर्यटकांचे बुडून मृत्यू झालेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा तर अत्यंत धोकादायक आहे. गणपतीपुळेच्या समुद्रातही यापूर्वी अनेक भाविक पर्यटकांचा दुर्देवी बुडून मृत्यू झाला आहे. गुहागर समुद्रात दोन वर्षापूर्वी सहा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. तसेच रायगड जिल्ह्यातील मुरूड समुद्रात तीन वर्षापूर्वी तेरा जणांचा मृत्यू झाला होता.

समुद्रात बुडून मृत्यू पावणा-या पर्यटकांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, बेळगांव येथील पर्यटकांचा समावेश आहे. येथील पर्यटक समुद्राच्या ओढीने येतात. समुद्र कसा असतो त्याचे अंतरंग काय, त्याच्या भरती-ओहोटीचे परिणाम काय होतात, प्रत्येक ठिकाणच्या समुद्र किना-याची रचना, त्याची खोली, त्याचा उतार, याचा अंदाज त्या पर्यटकांना असण्याचा पश्नच नसतो. अशाप्रकारे समुद्राच्या अंतरंगाबाबत, त्याच्या भरती-ओहोटीच्या दुष्परिणामाबाबत अज्ञानी, अनभिज्ञ असलेले पर्यटक मोठय़ा संख्येने कोकणात दरवर्षी येतात. कुठच्याही बीचवर थांबतात आणि समुद्रस्नान करण्यासाठी उतरतात. काही पर्यटकांचा अतिउत्साह, अतिआत्मविश्वास आणि त्यांच्यामध्ये समुद्रस्नानाबद्दल अज्ञान किंवा अनभिज्ञता असूनही केवळ मजा करायची ही बेफिकीर वृत्ती यामुळे काही पर्यटक विशेषत: तरूण पर्यटक समुद्राच्या लाटेबरोबर समुद्रात ओढले जाऊन बुडतात. त्यापैकी काही वाचतात. तर काही मृत्यू पावतात. अशाप्रकारे पर्यटक बुडण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र, पर्यटन विकासाच्या नावाने नेहमीच केवळ फुकाच्या वल्गना करणा-या आणि त्यासाठी कोणत्याही सोयी सुविधा निर्माण न करणा-या नाकर्त्यां महाराष्ट्र शासनाला अगर राज्यकर्त्यांना पर्यटकांच्या बुडून मरण्याबाबतचे काहीही सोयरसुतक आहे, असे वाटत नाही. कुठे दुर्घटना घडली की त्याक्षणापुरती सरकारी प्रशासकीय यंत्रणा हलते. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी घटनास्थळी भेट देतात. थोडे नक्राश्रू ढाळतात. काही उपाययोजना करण्याची आश्वासने देतात अन् मग कालांतराने पुढील दुर्घटना घडेपर्यंत ती विसरूनही जातात. असा प्रकार गेली अनेक वर्षे चालला आहे. म्हणूनच समुद्र पर्यटन करण्यासाठी येणा-या पर्यटकांचे मृत्यू हे सरकारी प्रशासकीय अनास्थेचे बळी आहेत.

मालवणातील वायरी-भूतनाथ समुद्रात बेळगावच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांच्या बुडून झालेल्या मृत्यूमुळे सागरी पर्यटन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी अशा दुर्घटना घडूनही महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची गंभीर दखल घेतली गेलेली नाही. अगर ठोस उपाययोजना केली गेली नाही.
हौशी, अतिउत्साही पर्यटक समुद्रात बुडू नयेत. तसेच बुडणा-यांना वाचविण्यासाठी समुद्रात तात्काळ धावून जाणारी यंत्रणा सरकारकडून उभारण्यात आलेली नाही. यापुर्वीच्या सर्वच दुर्घटनांमध्ये जे पर्यटक वाचले ते स्थानिक मच्छिमार बांधवांनी जीवावर उदार होऊन त्यांना वाचविल्यानेच समुद्रात बुडून मृत्यू पावणा-यांची शवही बाहेर काढण्याचे काम स्थानिक मच्छिमार बांधवच कर्तव्यभावनेने करत असतात.

अशा दुर्घटना यापुढे तरी घडू नयेत म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यत: जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विभागाने कोकणातील सर्वच बीचवर गोवा राज्याच्या धर्तीवर ‘बीच सेफ्टी सिस्टीम’ निर्माण करायला हवी. कोकणातील समुद्रकिनारे विशेषत: पर्यटक ज्या बीचवर मोठय़ा संख्येने जातात त्या बीचचे सर्वेक्षण करून त्याठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेची सर्व उपाययोजना निर्माण करायला हवी. त्याठिकाणी सुसज्ज यंत्रणा उभारायला हवी. जे धोकादायक किनारे आहेत तेथे सूचना व माहिती फलक तसेच सुरक्षा गार्ड आणि जीवरक्षक आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात करायला हवेत.

समुद्राच्या अंतरंगाच्या अनभिज्ञतेतूनच बुडून मृत्यू

कोकणच्या समुद्रात बुडून मृत्यू पावणा-या पर्यटकांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, बेळगाव आदी भागातील पर्यटकांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे. शनिवारी बुडून मृत्यू पावलेले विद्यार्थी पर्यटक बेळगावचे होते. गतवर्षी मालवण-तारकर्ली समुद्रात पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. ते पर्यटक इचलकरंजी, तासगांव, अकोला, अमरावती येथील होते. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, बेळगांव येथील पर्यटकांना समुद्राच्या भरती-ओहोटीच्या परिणामांची माहिती नसते. समुद्राची रचना, त्याची खोली, त्याचा उतार, लाटांपासून निर्माण होणारा धोका याची काहीच कल्पना नसते. मात्र, अतिउत्साहात केवळ मौजमजा करण्याचा अट्टाहास यातून समुद्राच्या बाबतीत अनभिज्ञ असूनही ते समुद्रस्नानाला उतरतात आणि बुडतात.

बेळगाव येथील मराठामंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ८ विद्यार्थी वायरी येथे बुडाले. त्यामध्ये या महाविद्यालयातील प्रा. महेश कुडूचकर यांचाही समावेश आहे. प्रा.कुडूचकर हे पट्टीचे पोहोणारे होते. त्यांची उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून ओळख होती. अनेकांना त्यांनी पोहायला शिकवले असा उल्लेख एका बातमीत करण्यात आला आहे.
प्रा.कुडूचकर हे पट्टीचे पोहोणारे आणि जलतरणपटू होते परंतु ते कुठे? समुद्रातील नव्हते तर सपाट जमिनीवरून वाहणारी नदी, तलाव अगर जलतरण तलावातील ते पट्टीचे पोहोणारे असतील. परंतु समुद्रातील पोहणे वेगळे असते. समुद्राच्या लाटांवर कसे स्वार व्हावे? त्या लाटांच्या समुद्रातील ओढीपासून स्वत:चा कसा बचाव करावा? याचे एक तंत्र आहे. हे समुद्रकिना-यावरील मच्छिमार बांधवांना चांगले अवगत असते. याचे भान बाळगण्याची गरज असते. याची जाणीव समुद्रसफर आणि स्नानासाठी येणा-या पर्यटकांना करून देणे आवश्यक आहे.

कोकणातील किनारपट्टीवरील काही बीचवर तेथील स्थानिक ग्रामपंचायतींनी व नगरपंचायतीनी एखाद दुसरा सुरक्षा रक्षक नेमलेला आहे. परंतु ते पर्यटकांना केवळ सूचना देण्याचे काम करतात. बुडणा-या पर्यटकांना वाचविण्याची यंत्रणा त्यांच्याकडे नसते. ग्रा.पं. न.प.च्या तुटपुंज्या उत्पन्नात चांगले प्रशिक्षित कुशल जीवरक्षक नेमणे शक्य होणार नाही. ते शासनाच्या वतीनेच नेमावे लागतील.

पर्यटकांच्या जीवित रक्षणासाठी गोव्यातील सज्जता

नजीकच्या गोवा राज्यात समुद्रकिना-यावरील प्रत्येक बीचवर पर्यटकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी, अतिउत्साही पर्यटकांच्या उत्साहीपणाला आळा घालण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अहोरात्र कार्यरत व तैनात असते. तेथे बीच सेफ्टी सिस्टीमची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे गोवा राज्यातील समुद्रात कोणी पर्यटक बुडून मृत्यू पावत नाहीत. गोवा राज्यात दर एक किलोमीटरवर वॉच टॉवर उभारण्यात आलेले आहेत. ते किनारपट्टीवरील अगर समुद्रात उतरलेल्या पर्यटकांवर लक्ष ठेवून असतात. प्रत्येक बीचवर उच्च प्रतिचे प्रशिक्षित, कुशल सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक (लाईफगार्डस्) समुद्रात बुडणा-यांना वाचविण्यासाठीच्या साधनसामुग्रीसह सज्ज असतात. समुद्रस्नान करणा-या पर्यटकांवर त्यांचे दुर्बीणीद्वारे बारीक लक्ष असते. त्याशिवाय गोवा पोलिसांची पथके वाळूवरून चालणा-या टायरच्या जीपमधून सतत गस्त घालत असतात. अतिउत्साही पर्यटकांवर त्यांची नजर असते. कोणी पर्यटक समुद्रस्नान करताना धोक्याची पातळी ओलांडत असतील तर समुद्रकिनारपट्टीवर गस्त घालणारे पोलीस स्पीकरवरून त्यांना सक्त सूचना देतात. तरीही कोणी ऐकत नसेल तर त्यांच्यावर नाईलाजाने अटकेची कारवाई करावी लागेल असेही सूनावतात. समुद्रात बोटींग अगर वॉटरस्पोर्टस् करणा-या पर्यटकांनी त्यांच्या गाईडनी लाईफजॅकेट घालणे तेथे कायद्याने बंधनकारक आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, याकडेही कटाक्षाने लक्ष दिला जातो. समुद्रकिना-यावरील पर्यटन बीचवर सूचनाफलक, भरती-ओहोटीची वेळ, मार्गदर्शक फलक लावलेले असतात. एकंदरीत गोवा राज्यात पर्यटकांच्या जीवितरक्षणाची काटेकोरपणे काळजी तेथील सरकारी यंत्रणा घेते. त्यासाठी ती कायम सज्ज असते. कोकणच्या किनारपट्टीवर मात्र यातील कोणतीही सुरक्षा यंत्रणा नाही. त्यामुळे कोकणातील समुद्रकिनारे धोकादायक व पर्यटकांचे बळी घेणारे बनले आहेत. हा समुद्राचा अगर ठिकठिकाणच्या बीचचा दोष नाही तर तो सरकारी अनास्थेचा व बेफिकीरपणाचा आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version