Home देश आझम खान यांच्यावर पाकिस्तानी राजकारणाचा प्रभाव

आझम खान यांच्यावर पाकिस्तानी राजकारणाचा प्रभाव

0

दादरी प्रकरणाचे राजकारण करण्यात येत असून आझम खान हे पाकिस्तानी असल्याचा आरोप भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी केला आहे.

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील दादरी गावात गोमांसाच्या संशयावरून झालेल्या हत्याकांडानंतर या मुद्दय़ावरून सध्या चांगलेच राजकारण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या हत्याप्रकरणाचा तपास संयुक्त राष्ट्रांनी करावा अशी मागणी करणा-या आझम खान यांच्यावर पाकिस्तानी राजकारणाचा प्रभाव असून ते पाकिस्तानी आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.

भाजपाची सत्ता आल्यानंतर भारताला हिंदू राष्ट्र करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या संशयावरुन झालेल्या हत्येमागेही भाजपाचाच हात आहे, असा आरोप यापूर्वी आझम खान यांनी केला होता. तसेच या प्रकरणी संयुक्त राष्ट्रांनी लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर साक्षी महाराजांनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आझम खान यांचा भारतातील नव्हे, तर पाकिस्तानातील राजकीय प्रभावावर विश्वास आहे, असे वक्तव्य केले.

‘आम्हाला आमच्या आई इतकीच भारतमाता आणि गोमाता आदरणीय आहे. दादरी प्रकरणाचे राजकारण करण्यात येत असून ते निषेधार्ह आहे. आझम खान पाकिस्तानी असून त्यांच्यावर तेथील राजकारणाचा प्रभाव आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत अनेकांवर अत्याचार झाले, त्यांना हिंसेला सामोरे जावे लागले, त्या कोणालाच कधीही नुकसान भरपाई मिळाली नाही, मग अशा प्रकारची दुटप्पी भूमिका आत्ताच का?’ असा सवालही साक्षी महाराज यांनी यावेळी उपस्थित केला.

घरात गोमांस साठवून खाल्ल्याच्या अफवेनंतर उत्तर प्रदेशमधील दादरी येथे जमावाने मोहम्मद इकलाख या शेतक-याच्या घरावर हल्ला केला होता. या घटनेत इकलाख यांचा मृत्यू झाला होता, तर त्यांचा मुलगा दानिश हा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर देशभरात या घटनेचे प्रतिसाद उमटले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version