Home महामुंबई आक्रमक विरोधी पक्षाचा आजपासून हल्लाबोल

आक्रमक विरोधी पक्षाचा आजपासून हल्लाबोल

0

विरोधी पक्ष म्हणून जे घडायला पाहिजे होते ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी घडले आहे. फडणवीस सरकार विरोधात आक्रमक होण्याकरिता एक नव्हे, शंभर मुद्दे आहेत. 

विरोधी पक्ष म्हणून जे घडायला पाहिजे होते ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी घडले आहे. फडणवीस सरकार विरोधात आक्रमक होण्याकरिता एक नव्हे, शंभर मुद्दे आहेत. फडणवीस सरकार अधिकारावर आल्यानंतरची जी दोन-तीन अधिवेशने झाली त्या अधिवेशनात सरकारला घेरण्याची संधी विरोधी पक्षाला होती. पण सत्ता गमावल्याच्या नैराश्यातून विरोधी बाकावरील आजचे सदस्य सावरले नव्हते.

आता फडणवीस सरकार प्रत्येक दिवशी चिखलात रुतत चालले आहे. भीषण दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची भयानक टंचाई, शहरांमध्ये सात-सात दिवस पाणी नसणे, चा-यांची टंचाई, मंत्र्यांची मुजोरी, काही मंत्र्यांची उघड झालेली भ्रष्टाचारी प्रकरणे, मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाची मारहाण, वाढती महागाई असे अनेक मुद्दे या सरकारच्या विरोधात आहेत. गेली तीन अधिवेशने हे मुद्दे होते, पण आक्रमक नसलेल्या विरोधी पक्षाने संधी साधली नव्हती.

सुदैवाने या अधिवेशनात पक्षश्रेष्ठींच्या सक्त सूचना आल्या आहेत की, ‘लोकांच्या प्रश्नावर आक्रमक व्हायल पाहिजे. महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, मंत्र्यांची भ्रष्ट प्रकरणे हे विषय लावून धरेल पाहिजेत.’ प्रदेश काँग्रेसने विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांची एकत्रित बैठक घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात हल्ला कसा करायचा? याची आखणी केली. आमदारांना मार्गदर्शन करण्याकरिता माजी मुख्यमंत्री आणि अभ्यासू, आक्रमक नेते नारायण राणे यांच्यासारख्यांना आमदारांच्या बैठकीत भाषणाकरता आमंत्रित केले. विरोधी पक्षाने अभ्यासपूर्ण रितीने सरकारला कसे कोंडीत पकडावे याच्या डावपेचाची चर्चा झाली. त्याच्याकरिता एक समन्वय समिती नेमली गेली. विधानसभागृहात काँग्रेस पक्षाचा नेता विरोधी पक्षनेता आहे. विधान परिषदेत राष्ट्रवादीचा नेता विरोधी पक्षनेता आहे.

विधानसभेत आणि विधान परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीने एका विचाराने आक्रमक व्हावे यासाठी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रावादीच्या नेत्यांची भेट घेऊन एकत्रितपणे हल्लाबोल करण्याची आखणी केली. विधानसभेत या दोन्ही पक्षांचे ९० सदस्य आहेत. त्यांनी एकत्रितपणे काम केले की, या सरकारला घाम फोडता येईल. मुजोर मंत्री, त्यांची अनेक प्रकरणे, विशेषत: विनोद तावडे, खडसे, पंकजा मुंडे यांची प्रकरणे एकत्रितपणे चव्हाटय़ावर जेव्हा मांडता येतील तेव्हा सरकारला उघडं पाडता येईल. यासाठी काँग्रेस पक्ष संघटित झाला. ही अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे हे सरकार धुतल्या तांदळासारखे नाही. अवघा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे, जनावरांना चारा नाही, बेरोजगारी वाढते आहे, मंत्र्यांना फिरणे अशक्य होत आहे, या सगळ्या मुद्दय़ांना एकत्रित करून या सरकारला उघडं पाडण्याची रणनीती विरोधी पक्षाने एकत्रित बसून आखली. त्यासाठी आमदारांचा अभ्यासवर्ग झाला. नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विखे-पाटील, मोहन प्रकाश या सर्वानी गुरुवारपासून अधिवेशनात एकत्रित शक्तीचे दर्शन कसे घडवायचे, याच्या नंबरवारी सूचना केल्या. माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांना समन्वय समितीचा अध्यक्ष करण्यात आले. श्री. नारायण राणे आणि श्री. हर्षवर्धन पाटील हे दोघेही विधानसभागृहात असतील तर सरकारचे कपडे त्यांनी कसे फाडले असते? याची चर्चा काँग्रेसचे आमदार याच बैठकीत आपसात करत होते.

या आमदारांसमोर नारायण राणे यांनी बुधवारी केलेल्या भाषणाने गुरुवारपासून सभागृहात कामकाज करणा-या विरोधी बाकाला मोठी ऊर्जा मिळालेली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी भारदस्तपणे सांगितले आहे की, ‘दोन अधिवेशने संथ गेली असली तरी आता आम्ही प्रत्येक प्रश्न लावून धरणार आहोत आणि राष्ट्रवादीची त्याला साथ मिळणार आहे. जिथे राष्ट्रवादी प्रभावी मुद्दे मांडेल तिथे काँग्रेसवाले त्यांना साथ देतील.’

सरकारच्या विरोधात अशी जबरदस्त मोर्चेबांधणी झाल्यामुळे ‘गुरुवारपासून विधान सभागृहात फडणवीस सरकारचे ‘काही खरे नाही’ याची चर्चा आता सर्वत्र होत आहे. कारण हे सरकार भ्रष्टाचाराच्या गाळात अर्धेअधिक रुतले आहे. निर्णय होत नाहीत, माणसे, जनावरे तडफडत आहेत, मंत्र्यांचे दुष्काळी दौरे फोटोपुरते आहेत, मंत्र्यांना फिरणे मुश्कील झालेले आहे. आता सरकारला सभागृह चालवणे मुश्कील होईल, इतकी कडेकोट तयारी आणि दारूगोळा विरोधी पक्षाने तयार करून ठेवला आहे. हे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे यश आहे. आता पुढे काय होतेय, ते आजपासून दिसेलच!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version