Home अखेरचा जय महाराष्ट्र! आंबवणे वाडा आणि एक नंबर शाळा

आंबवणे वाडा आणि एक नंबर शाळा

0

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्राथमिक शिक्षण कर्जतमध्ये झाले. ‘बाळ केशव ठाकरे’ या विद्यार्थ्यांच्या नावाची नोंद आजही कर्जतच्या एक नंबर शाळेत केलेली आहे.
नेरळ – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्राथमिक शिक्षण कर्जतमध्ये झाले. ‘बाळ केशव ठाकरे’ या विद्यार्थ्यांच्या नावाची नोंद आजही कर्जतच्या एक नंबर शाळेत केलेली आहे. मात्र, काळाच्या ओघात या शाळेची अवस्था जीर्ण झाली आहे.

प्रबोधनकार ठाकरे हे १९३८ ते १९४२ मध्ये कर्जतच्या टिळक चौकात असलेल्या आंबवणे वाडय़ात राहायला आले. या वाडय़ात सहा खोल्या होत्या. त्यापैकी एका खोलीत प्रबोधनकार राहत होते. या घरात प्रबोधनकारांसमवेत पत्नी, तसेच श्रीकांत, बाळ आणि सुशीला अशी तीन भावंडे राहत होती. बाळासाहेब आंबवणे वाडय़ापासून १०० मीटरवर असलेल्या कर्जतच्या एक नंबर मराठी शाळेत शिक्षण घेत होते. इयत्ता चौथीतले विद्यार्थी म्हणून बाळ केशव ठाकरे या नावाची नोंद आजही या शाळेत आहे. ‘आमच्या शाळेत प्रबोधनकारांचे चिरंजीव बाळासाहेब शिकले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,’ अशी नोंद त्यावेळच्या मुख्याध्यापकांनी करून ठेवली असल्याचे येथील जुनेजाणते रहिवासी सांगतात.

सध्या असलेल्या नगरपालिका कार्यालयासमोरील जागेत प्रबोधनकार ठाकरे त्या काळात गुरुपारायण करत असत. लोकांना मार्गदर्शन करीत, प्रवचनांचा कार्यक्रम होई, त्यावेळी कर्जतकरांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असे. सुरुवातीच्या काळात प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्याच्याशी खंबीरपणे लढा देण्याची शिकवण याच घरात बाळासाहेबांना वडिलांकडून मिळाली. या घराजवळ राहणारे अन्य शेजा-यांमधील जुनीजाणती मंडळी आजही प्रबोधनकार ठाकरे व छोट्या बाळासाहेबांच्या आठवणी सांगतात. हा आंबवणे वाडा पुढे चिंतामण चिंचाड यांनी १९७४ मध्ये विकत घेतला. त्या आधी २० वर्षे चिंचाड हे देखील भाडेकरू म्हणूनच राहत होते. पुढे चिंतामण चिंचाड यांचे पुत्र धनंजय चिंचाड चार वेळेस कर्जतचे नगराध्यक्ष झाले. चिंचाड आजही आपण प्रबोधनकार आणि बाळासाहेबांनी वास्तव्य केलेल्या घरात राहत असल्याचे अभिमानाने सांगतात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version