आंध्रप्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्याच्या वाकाटिप्पा गावातील फटाका कंपनीत झालेल्या स्फोटात ११ जण ठार झाले तर सात जण जखमी झाले.
हैदराबाद -आंध्रप्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्याच्या वाकाटिप्पा गावातील फटाका कंपनीत झालेल्या स्फोटात ११ जण ठार झाले तर सात जण जखमी झाले.
सोमवारी दुपारी २.४५ मिनिटाच्या सुमारास उप्पडा कोथापल्ली येथील फटाका उत्पादन कंपनीत मोठा स्फोट झाला. यामध्ये या कंपनीतील एकूण ११ जण ठार तर सात इतर जखमी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला त्यावेळी १८ कामगार कंपनीत काम करत होते. स्फोटात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये नऊ महिलांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, फटाका बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाला. दरम्यान, या घटनेबाबतचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक एम.रवीप्रकाश यांनी दिली.