Home देश अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा सूत्रधार अबू इस्माइलचा खात्मा

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा सूत्रधार अबू इस्माइलचा खात्मा

0

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू इस्माईलसह एका दहशतवाद्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले आहे.

नवी दिल्ली- लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू इस्माईलसह एका दहशतवाद्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले आहे. श्रीनगरमधील नौगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत इस्माईल मारला गेल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

मूळचा पाकिस्तानी असलेला अबू हा अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. या दहशतवादी हल्ल्यात सहा महिला भाविकांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. तर १९ जण जखमी झाले होते. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इस्माईलच्या शोधासाठी सुरक्षा दलाने विशेष मोहीम हाती घेतली होती.

दक्षिण काश्मीरमध्ये त्यासाठी विशेष शोध मोहिम राबवण्यात आली होती. या वर्षी अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. लष्कर-ए-तोयबाने हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले होते. अबु इस्माईलने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली होती. गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागलेल्या सांकेतिक भाषेतील संभाषणाच्या आधारे अबुचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते.

काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाया यशस्वी ठरल्या आहेत. ‘लष्कर’चे अनेक दहशतवादी या कारवायांमध्ये ठार झाले आहेत. त्यात कमांडर बाशिर लष्करी, संघटनेचा काश्मीरमधील टॉप कमांडर अबू दुजानाचाही समावेश आहे. दुजाना मारला गेल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरची सूत्रे अबु इस्माईलकडे सोपवल्याचे सूत्रांनी सांगितले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version