Home ताज्या घडामोडी अभय कुरूंदकरच मारेकरी!

अभय कुरूंदकरच मारेकरी!

0

एका अक्षरामुळे अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचे गूढ उकलले

मुंबई – नवी मुंबईतील बेपत्ता पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकर यानेच अश्विनी यांची हत्या केल्याचा सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. मोबाईल चॅटिंगमधील केवळ एका अक्षरावरून कुरूंदकर हाच मारेकरी असल्याचे समोर आले आहे.

अश्विनी यांच्या मोबाईलवरून ‘हाऊ आर यू’ हा प्रश्न विचारताना कुरूंदकरने ‘यू’ (४) लिहिताना ‘वाय’ (८) हे अक्षर वापरले. मात्र अश्विनी कधीही ‘यू’ लिहिताना ‘वाय’ (८) वापरत नसत त्या नेहमी ‘यू’ (४) वापरत. हाच धागा पकडून गुन्हे शाखेने कुरूंदकरच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अभय करूंदकरचे नातेवाईक, मित्रांकडूनही पोलिसांनी या गोष्टीची खातरजमा करून घेतली आहे. या दरम्यान केलेल्या तपासामध्ये मित्रांशी चॅटिंग करताना कुरूंदकर ‘यू’ लिहिताना नेहमी (८) वापरत असल्याचेही पोलिसांना आढळून आले. तसेच अश्विनी यांच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली असता अश्विनी ‘यू’ लिहिताना कधीही वाय वापरत नसत, असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे समोर आले आहे.

अश्विनी यांची हत्या केल्यानंतर त्या जिवंत आहेत, असे भासवण्यासाठी कुरूंदकरने अश्विनी यांच्या मोबाईलवरून मेहुणे अविनाश गंगापुरे यांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज केला होता. मानसिक अस्वास्थ्यामुळे आपण उपचार घेण्यासाठी ५ ते ६ महिने उत्तरांचल किंवा हिमाचलला जाणार आहोत, असे या मेसेजमध्ये म्हटले होते.

अभय कुरूंदकरनेच एप्रिल २०१६ मध्ये अश्विनीच्या डोक्यात बॅट घालून तिची हत्या केली, अशी कबुली कुरूंदकरचा बालपणीचा मित्र व या प्रकरणातील सहआरोपी महेश पळणीकर याने पोलिसांना दिली आहे.

मुंबई पोलिसांनी या पूर्वीच या गुन्ह्याचा तपास पूर्ण केला आहे. त्यांनीही कुरूंदकर हाच अश्विनीचा मारेकरी असल्याचे म्हटले आहे. मात्र, आरोपी कोणतीही कबुली देत नसल्यामुळे तपास रेंगाळला होता. तसेच मुख्य आरोपी स्वत: पोलीस निरीक्षक असल्याने तपासात कोणतेही अडथळे येऊ नये म्हणून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता.

अश्विनी बिद्रे पोलीस दलात २००५ साली रुजू झाली. सांगलीत पोस्टिंग असताना तिची अभय कुरूंदकरशी ओळख झाली. पुढे दोघांत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. अश्विनी व अभय कुरूंदकर हे दोघेही त्यापूर्वीच विवाहित होते व त्यांना पत्नीसह मुले होती. कुरूंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिद्रे यांच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले त्यामुळे तिने पती राजू गोरेसोबतचे संबंध तोडले. अश्विनीला राजू गोरेपासून एक मुलगी आहे. जी आपल्या पित्याकडे राहते. यानंतर अश्विनीने अभय कुरूंदकरकडे लग्नाचा तगादा लावला.

मात्र, कुरूंदकरला अश्विनीशी लग्न करायचेच नव्हते. त्यावरूनच कुरूंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणे होत होती. मात्र कुरूंदकर पहिल्या पत्नीला व मुलांना सोडू शकत नव्हता तर बिद्रे यांनी लग्नाचा तगादा लावल्याने एकदाची कटकट संपवावी म्हणून त्यांची हत्या करण्याचा डाव रचला. यासाठी त्याने बालपणीचा मित्र महेश फळणीकर याला सोबत घेतले व अश्विनीला संपवून टाकले. या प्रकरणात या दोघांना राजू पाटील आणि कारचालक कुंदन भंडारी यांनी साथ दिली. अभय कुरूंदकरने अश्विनी बिद्रेचे अपहरण करून हत्या केली व महेश फळणीकर व राजू पाटीलच्या मदतीने वसई- भाईंदरच्या खाडीत फेकत त्याची विल्हेवाट लावली. अश्विनी बिद्रे यांची हत्या केली त्यावेळी अभय कुरूंदकर ठाणे ग्रामीण येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. कुरूंदकरला पत्नी व दोन मुलेही आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version