अनुत्तरित

0

‘‘देवाने अनुकूल कौल दिला की त्यांना बरं वाटतं. धीर येतो. आत्मविश्वास मिळतो. जगण्यावरचा विश्वास दृढ होतो त्यांचा आणि कौल प्रतिकूल मिळाला तर येणा-या दु:खापासून, संकटापासून ते सावध होतात. येणा-या संकटाला सामोरे जाण्यासाठी, त्याचा सामना करण्यासाठी ते सिद्ध होतात, त्यासाठी तोच त्यांना शक्ती देतो. शेवटी श्रद्धेच्या शिदोरीवरच माणूस जगत असतो.’’

कोकणात आमच्या वाडे या गावी, श्री विमलेश्वराचं पुरातन मंदिर आहे. कातळाच्या मोठया डोंगरात कोरून खोदून बांधलेलं हे देऊळ शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. हे पांडवकालीन मंदिर असल्याची आख्यायिका आहे. पांडवांनी अज्ञातवासात असताना एका रात्रीत हे मंदिर बांधलं आणि बांधून होताच पहाट झाली, म्हणून ते पांडव तिथेच स्थानापन्न झाले, अशी दंतकथाही, आम्ही लहानपणी ऐकलेली आहे. देवळाच्या वरती, मधे भीम आणि दोन्ही बाजूला, धर्म, अर्जुन, नकुल, सहदेव अशा मूर्ती आजही तिथे पहायला मिळतात. मंदिराच्या दोन्ही बाजूला हत्ती आहेत आणि त्यावर बसलेले माहुत आहेत.

मंदिराच्या समोर, जिवंत झ-याचे स्वच्छ पाणी, छोटया नदीच्या रुपात वहात असते. वरती दगडी बांधकामाची पाण्याची कुंडं आहेत. त्यातून आलेलं हे पाणी पुढे गोमुखातून खाली पडतं. गुरव हे या मंदिराचे पुजारी. देवळासमोर या गुरव मंडळींची पन्नासेक घरं आहेत. या पाण्यावरच ही घरं रहात आली आहेत. मंदिरात येण्यासाठी या नदीवर भक्कम दगडी पूल आहे.

कुंडातून हातपाय धुवून, वरती आलं की एक धर्मशाळा आहे. या धर्मशाळेत पूर्वी साधूसंत वगैरे अतिथी वास्तव्याला असत. बाहेर एक पिंपळाचा जुना वृक्ष आहे, त्याला भक्कम चौथरा बांधलेला आहे.

मंदिराच्या परिसरात तुलसीवृंदावन, श्री काळभैरव, श्री गणेश, अशी मंदिरं आहेत. देशातच नव्हे, तर जगात, कोणत्याही शिवमंदिरात आपण गेलात तर मंदिरात प्रवेश केल्यानंतर, मुख्य गाभा-यात शंकराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी, आपल्याला आत खाली उतरून जावे लागते. पण जगात फक्त हे एकच शिवमंदिर असे आहे की इथे मुख्य गाभा-यात पिंडीचे दर्शन घेण्यासाठी वर पाय-या चढून जावे लागते. आमच्याकडे एकदा थोर साहित्यिक आणि इतिहासप्रेमी श्री. गो. वि. दांडेकर आले होते. ही पिंडी पाहिल्यानंतर ते चकित झाले होते. ते म्हणाले होते, ‘‘या पिंडीचा दगड, हा, काशिविश्वेश्वराच्या मंदिरातील पिंडीचा दगड आहे!’’

कालानुरूप आता कातळात कोरलेल्या या दगडी मंदिरावर सिमेंटचे थर चढले आहेत. मंदिरात विजेचे दिवे आले आहेत. पूर्वी देवापुढच्या समई नंदादीपाच्या प्रकाशात पिंडीचे दर्शन व्हायचे. अंधाराच्या त्या भव्य मंदिरात नैसर्गिक अशी धीरगंभीर विशालता असायची.

दरवर्षी महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव असतो. पालखीसह सर्व मानकरी भक्तगण या भव्य मंदिराच्या संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा करून आरती करतात. नंतर पुराण आणि मग कीर्तन रंगते. दूरदूरचे अनेक शास्री पंडित आणि ख्यातनाम प्रवचनकार, कीर्तनकार, आजवर इथे आपली हजेरी लावून गेले आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी जत्रा भरते. छोटे-मोठे दुकानदार, फेरीवाले यांचीही मोठी गर्दी असते.

मृग नक्षत्र कोरडं गेलं, पाऊस आला नाही, सारा गाव संकटात पडला, तेव्हा पावसासाठी सा-या गावक-यांनी एकत्र येऊन, श्री विमलेश्वरावर संततधार धरण्याचा केलेला संकल्प मी अनुभवला आहे. श्री विमलेश्वराच्या पिंडीवर संततधार धरून पावसासाठी देवाला साकडे घालण्याच्या या कार्यक्रमात सारा गाव सामील झाला होता. खालून कुंडातून पाण्याच्या घागरी भरून मंदिरात आणण्याचं काम आम्ही केलं आहे. ब्रह्मवृंदाच्या रुद्रावर्तनाच्या घोषात, पिंडीवर गळती धरली गेली. एक दिवस गेला. चौवीस तास होऊन गेले तरी अखंडपणे संततधार चालू होती. समोर बाहेर मंडप घालून गावातली भजनी मंडळी अखंडपणे भजने आळवीत होती.

‘पाऊस दे’ या एकाच आर्त हाकेने सारा गाव व्याकूळ झाला होता आणि दुसरे दिवशी रात्री उशिरा, अचानक, आकाशात ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागला. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि बघता बघता मुसळधार पाऊस पडू लागला. सा-या गावक-यांनी त्या कोसळत्या पावसातच चिंब भिजून, आनंदाने उत्साहात महाआरती केली आणि श्री विमलेश्वराच्या त्या कृपाप्रसादाने सारा गाव धन्य झाला.

मंदिराच्या सभामंडपातून, वर पिंडीकडे गाभा-यात जाताना, उजव्या हाताला एक नंदी आहे. अनादिकालापासून या नंदीला कौल लावण्याचा इथला प्रकार फार प्रसिद्ध आहे. हा कौल मंदिराचे पुजारी गुरव लावतात. त्यासाठी दूरदूरहून आलेले भक्तगण इथे गर्दी करून बसलेले असतात.

भक्तांचा प्रश्न गुरव देवाला विचारतात, त्याचे उत्तर नंतर, गुरव हा नंदी हातानी उचलतात, त्यातून मिळते. प्रश्नाचे उत्तर अनुकूल असेल तर तो नंदी इतका हलका होतो की गुरव तो नंदी अगदी बोटांनीही उचलू शकतात. त्या‘‘फुलाऽऽ सारखो ये देवा ऽऽ’’ पण प्रश्नाचे उत्तर देवाकडून प्रतिकूल असेल तर हा नंदी इतका जड होतो की कितीही जोर लावला तरी गुरवाला तो हलत नाही.

मात्र गाभा-यातील पिंडीवर ब्राह्मणाचा अभिषेक चालू असेल, वेदमंत्रांचे पठण चालू असेल, तर त्यावेळी कौल लावण्याचा हा प्रकार बंद असतो अशी इथली शिस्त आहे.
एकदा एका इथल्या वडिलधा-या व्यक्तीला मी विचारलं, ‘‘खरंच तुमचा विश्वास आहे का हो या कौलावर?’’

त्यावर ते म्हणाले, ‘‘तुमचा आमचा विश्वास असण्यानसण्यावर, या शक्तीचं अस्तित्व अवलंबून नसतं. ही शिवशक्ती आदिम आहे!’’

मी म्हटलं, ‘‘पण ही सारी सुशिक्षित मंडळी असून इथे का येतात कौल मागायला?

ते म्हणाले, ‘‘आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे का जातो?’’

‘‘बरं होण्यासाठी..’’

‘‘तशीच ही माणसं बरं वाटण्यासाठी इथे येतात. देवाने अनुकूल कौल दिला की त्यांना बरं वाटतं. धीर येतो. आत्मविश्वास मिळतो. जगण्यावरचा विश्वास दृढ होतो त्यांचा. आणि कौल प्रतिकूल मिळाला तर येणा-या दु:खापासून, संकटापासून ते सावध होतात. येणा-या संकटाला सामोरे जाण्यासाठी, त्याचा सामना करण्यासाठी ते सिद्ध होतात, त्यासाठी तोच त्यांना शक्ती देतो. शेवटी श्रद्धेच्या शिदोरीवरच माणूस जगत असतो.’’

जरा थांबून ते म्हणाले, ‘‘इथे येण्यासाठी मात्र एक अट आहे, ती म्हणजे, इथे येणा-याकडे श्रद्धेची श्रीमंती असावी लागते, तरच इथल्या प्रसादासाठी तो पात्र असतो.’’

माझ्या पाठीवर हात ठेवीत ते म्हणाले, ‘‘मला एक सांगा, परिक्षेचा पेपर देण्यासाठी निघालेला एक मुलगा, तुम्हाला नमस्कार करायला तुमच्यासमोर येतो, त्यावेळी तुम्ही त्याला आशिर्वाद देता, चांगलं यश मिळू दे, अशा शुभेच्छा देता. याला आपण अंधश्रद्धा म्हणणार का?’’ माझ्याकडे याला उत्तर नव्हतं.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version