Home महामुंबई अनधिकृत रस्त्यामुळे राजनाला कालव्यास धोका

अनधिकृत रस्त्यामुळे राजनाला कालव्यास धोका

0

 कुशिवली भागात फार्महाउसचे बांधकाम करण्यासाठी लागणारी सामग्री वाहून नेण्यासाठी राजनाला कालव्यामध्येच अनधिकृत रस्ता तयार करण्याचे काम कंत्राटदाराने केले आहे.

नेरळ – कुशिवली भागात फार्महाउसचे बांधकाम करण्यासाठी लागणारी सामग्री वाहून नेण्यासाठी राजनाला कालव्यामध्येच अनधिकृत रस्ता तयार करण्याचे काम कंत्राटदाराने केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन येणा-या – जाणा-या वाहनांमुळे कालवाच्या बांधकामास धोका निर्माण झाला आहे. तसेच कालव्यात पाणी साठून त्यात झाडेझुडपे, प्लास्टिक जमा झाले आहे. मात्र, पाटबंधारे खाते याकडे दुर्लक्ष करत आहे.

कुशिवलीच्या महाविद्यालयाजवळ फार्महाउसचे बांधकाम सुरू आहे. यासाठी बांधकाम सामग्री आणण्यासाठी जवळचा रस्ता आहे. परंतु कालवा ओलंडण्यासाठी तेथे लहान पूल नाही. त्यामुळे कंत्राटदाराने कालव्यामध्येच मातीचा भराव टाकून रस्ता तयार केला. मात्र, अवजड वाहने तेथून ये-जा करत असल्याने सिमेंटचा कालवा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नव्यानेच बांधण्यात आलेल्या या कालव्यामध्ये पाटबंधारे खात्याने पाणी सोडले आहे.

त्यामुळे मातीचा बांध घातल्यांनतर सर्व पाणी तेथेच अडून राहिले आहे. या कालव्यात पाण्यासोबत वाहून आलेली झाडेझुडपे, प्लास्टिक जमा झाले आहे. तसेच पाणी तुंबल्याने कालव्याची माती वाहून गेली आहे.

दरम्यान, पाणी सोडल्यानंतर कालवे सुस्थितीत आहेत की नाही, हे काम पाटबंधारे खात्याचे असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राजनाला कालव्याला धोका निर्माण झाला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version