Home क्रीडा अधिबानचे आव्हान संपुष्टात

अधिबानचे आव्हान संपुष्टात

0

भारताचा ग्रॅँडमास्टर बी. अधिबानला रविवारी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील तिस-या फेरीच्या दुस-या डावातही अव्वल प्रतिस्पर्धी हिकॅरू नाकामुराविरुद्ध पराभूत व्हावे लागले.

ट्रॉम्सो (नॉर्वे)- भारताचा ग्रॅँडमास्टर बी. अधिबानला रविवारी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील तिस-या फेरीच्या दुस-या डावातही अव्वल प्रतिस्पर्धी हिकॅरू नाकामुराविरुद्ध पराभूत व्हावे लागले. सलग दोन पराभवांमुळे अधिबानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. याबरोबरच भारतीयांचे स्पर्धेतील आव्हान संपले. मात्र या स्पर्धेत भारताकडून अधिबान सर्वात यशस्वी ठरला. भारतीयांमधून जी. आकाश आणि परिमार्जन नेगी यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपले होते. पाठोपाठ कृष्णन शशीकिरणलाही दुस-या फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

दुस-या डावात काळी मोहरी घेऊन खेळताना अधिबानला विजय गरजेचा होता. त्यादृष्टीने त्याने काही नियोजनात्मक चालीही खेळल्या. त्याने किंग्ज इंडियन डिफेन्सचा अवलंब केला. नाकामुरानेही आठव्या चालीला वजिरावजिरी करणे पसंत करत आक्रमक सुरुवात केली होती. हळूहळू दडपण वाढत चाललेला अधिबानच्या चाली योग्य होत नव्हता. याउलट भक्कम तयारी असलेला नाकामुराने विजयाची एकही संधी गमावली नाही. त्याने ४०व्या चालीत अधिबानला पराभव मान्य करावा लावला.

तिस-या फेरीत बाद झाल्याने अधिबानला १६ हजार डॉलरची (जवळपास १० लाख रुपये) कमाई करता आली. मात्र नियमाप्रमाणे त्यातील २० टक्के रक्कम त्याला फिडेला द्यावी लागणार आहे.

अन्य मानांकितांचे निकाल

जागतिक क्रमवारीत दुसरा मानांकित असलेला आर्मेनियाच्या लेवॉन अरोनियानचेही तिस-या फेरीत आव्हान संपुष्टात आले. पहिल्या डावात रशियाच्या इवेग्नी ट्रोमाश्वेस्कीविरुद्ध पराभव झालेला अरोनियानला दुस-या डावात बरोबरीवर समाधान मानावे लागले. अरोनियानला दुस-या डावात विजय गरजेचा होता. मात्र काळी मोहरी घेऊन खेळताना त्याला ३७व्या चालीत बरोबरी पत्करावी लागली.

रशियाच्या अलेक्झांडर ग्रिशुकने तिस-या फेरीतील दुस-या डावात व्हिएतनामच्या क्वांग लियामविरुद्ध विजय नोंदवल्याने त्याचे आव्हान शिल्लक राहिले. पहिल्या डावात ग्रिशुकला पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्यांच्यात रॅपिड टायब्रेकर खेळण्यात येईल.

इस्रायलच्या बोरिस गेलफॅँडनेही पहिल्या डावात विजय नोंदवल्यानंतर दुस-या डावात युक्रेनच्या अलेक्झांडर मोसीन्कोला २२ चालींत बरोबरीत रोखत चौथी फेरी गाठली.

हॉलंडच्या १९ वर्षीय अनिश गिरीलाही त्याच्यापेक्षा रेटिंगने कमी असलेला पेरूचा प्रतिस्पर्धी ज्युलियो ग्रॅँडा झुनिगाकडून दुस-या डावात ४७ चालींमध्ये पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या डावात अनिशने बाजी मारली होती. आता यांच्यातही टायब्रेकर होईल.

अमेरिकेच्या गाटा कॅम्स्कीने नॉर्वेच्या जॉन लुडविक हॅमरविरुद्ध पहिल्या डावातील विजयाच्या जोरावर अंतिम १६मध्ये प्रवेश केला. त्याने दुसरा डाव बरोबरीत सोडवला. रशियाचा पीटर स्विडलर आणि अझरबैजानचा तैमूर राद्याबॉव यांच्यात झालेला दुसरा डाव ४० चालींमध्ये बरोबरीत संपला. मात्र पहिल्या डावातील विजयाच्या जोरावर स्विडलरने आगेकूच केली.

टायब्रेकरवर गेलेल्या मानांकितांच्या अन्य लढती

फॅबियानो कॅरुआना (इटली) वि. व्लादिमिर मॅलॅखोव (रशिया), सर्जी कार्याकिन (युक्रेन) वि. पॅवेल एलानोव (युक्रेन), व्हॅसिली इवानचूक (युक्रेन) वि. युरी क्रिवोरुश्को (युक्रेन), अलेक्झांडर मोरोझेविच (रशिया) वि. निकिता विटिगोव

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version