Home टॉप स्टोरी ‘अटल’ पर्वाचा अस्त

‘अटल’ पर्वाचा अस्त

0

भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता असलेले ‘भारतरत्न’ अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.

नवी दिल्ली- भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी अनेकांगी ओळख असलेले ‘भारतरत्न’ अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयींच्या निधनामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला असून त्यांच्या रुपाने भारतीय राजकारणातील समन्वयी महापर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, वाजपेयी यांचे पार्थिव गुरुवारी रात्री दिल्लीतील कृष्णा मेनन मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता अंत्ययात्रा सुरू होणार असून वाजपेयी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात राष्ट्रीय स्मृतीस्थळावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भाजप मुख्यालयातील ध्वज अर्ध्यावर आणण्यात आला असून दिल्लीतील सर्व शाळा-महाविद्यालयांना शुक्रवारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. वाजपेयी यांच्या निधनानंतर केंद्र शासनाने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर असलेल्या वाजपेयींची प्रकृती वयोमानानुसार खालावली होती. किडनीला झालेल्या संसर्गामुळे मागील ९ आठवडय़ांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने रात्री त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. एम्समधील डॉक्टरांचे पथक त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र वाजपेयींचे शरीर उपचारांना प्रतिसाद नव्हते. अखेर गुरुवारी संध्याकाळी ०५ वाजून ०५ मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याचे एम्सच्या डॉक्टरांनी जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री रुग्णालयात जावून वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, रेल्वेमंत्री पियूष गोयल, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री विजय गोयल, मुख्तार अब्बास नक्वी, भाजप खासदार मीनाक्षी लेखी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, गृहमंत्री राजनाथ सिंह, फारुख अब्दुल्ला, अशोक गेहलोत, राज बब्बर, मायावती आदींनी बुधवारी रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची माहिती घेतली होती.

अटल बिहारी वाजपेयी २००९ पासून आजारी होते. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागत होता. वाजपेयी डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंश या आजाराने ग्रस्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते कोणत्याही सभेत किंवा भाजपाच्या कार्यक्रमातही दिसलेले नव्हते.

स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासात स्व-कर्तृत्वावर वेगळी उंची गाठणा-या मोजक्या नेत्यांपैकी वाजपेयी एक होते. भारतीय जनता पक्षाचे ते पहिले पंतप्रधान होते. गेले सुमारे दशकभर राजकारणापासून दूर असूनही राजकीय वतुर्ळात, विशेषत: भाजपमध्ये ते सतत चर्चेत होते. इतके त्यांचे नेतृत्व प्रभावशाली होते. कवी मनाच्या वाजपेयींबद्दल सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये आत्मीयतेची भावना होती. डझनभर पक्षांना सोबत घेऊन त्यांनी चालवलेले आघाडी सरकार हा भारताच्या राजकीय इतिहासातील चमत्कारच ठरला होता. वाजपेयी यांनी देशाच्या राजकारणात अनेक महत्त्वाची पदं भूषवली. विरोधी पक्षात असतानाही त्यांनी देशहितासाठी अनेक जबाबदा-या पार पाडल्या होत्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले होते.

जनता पक्षाच्या प्रयोगानंतर फाटाफूट झालेल्या जनसंघापासून ते केंद्रात भाजपाच्या पहिल्या सरकारचे पंतप्रधान असा वाजपेयांचा राजकीय प्रवास झाला. त्यांनी तीनवेळा पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडली. संघपरिवारातील भारतीय जनता पक्षाच्या उभारणीतील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. कृष्णबिहारी वाजपेयी व कृष्णादेवी वाजपेयी यांचे ते पुत्र होते.

किशोरवयात असताना त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला व ते तुरुंगात गेले. काही काळ त्यांनी कम्युनिस्ट विचारप्रणालीलाही जवळ केले. परंतु नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले व शेवटपर्यंत संघ परिवाराचा अतूट हिस्सा राहिले. अटलबिहारी वाजपेयी हे तीन वेळा भारताचे पंतप्रधान होते. १९९८ मध्ये ते केवळ तेरा दिवस पंतप्रधान होते. त्यानंतर दुस-यांदा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचे सरकार १३ महिने टिकले. त्यांची तिसरी पंतप्रधानपदाची कारकीर्द मात्र पूर्ण मुदतीची होती. मे १९९८ मध्ये अमेरिकेसह विकसित देशांचा रोष पत्करून पोखरण येथे अणुचाचण्या करण्यामागे पंतप्रधान म्हणून वाजपेयींनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती.

अत्यंत कसोटीच्या अशा कारगिलच्या युद्धाच्यावेळीही वाजपेयीच पंतप्रधान होते. अत्यंत कसोटीच्या या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धूळ चारली आणि तेव्हापासून गेल्या १९ वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताविरोधात तशा प्रकारची लढाई करण्याची हिंमत दाखवलेली नाही.

वीरश्रीयुक्त काव्य असो वा देशभक्तीने ओथंबलेली गीते असोत, मानवतावादाला महत्त्व देत काश्मीरचा प्रश्न प्रेमाने सोडवण्याची घातलेली साद असो वा पाकिस्तानशी सौहार्दाचे संबंध ठेवण्यासाठी सुरू केलेली लाहोर बस किंवा समझोता एक्स्प्रेस असो, त्याचप्रमाणे ‘रग रग से हिंदू हूँ’ म्हणणारा हिंदुत्ववादाचा हुंकार असो वा सर्व धर्माच्या नागरिकांना समान वागणूक देणारा राजधर्म पाळण्याचा सर्वधर्मसमभावाचा विचार असो अटल बिहारी वाजपेयी जीवनाच्या प्रत्येक स्तरावर अग्रणी राहिले आणि आप्तेष्टांसह विरोधकांचेही प्रेम त्यांनी मिळवले.

‘भारतरत्न’ पुरस्कार
२५ डिसेंबर २०१४ रोजी वाजपेयींच्या जन्मदिनी भारताच्या राष्ट्रपतींनी वाजपेयींना ‘भारत रत्न’ पुरस्काराची घोषणा केली. भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. २७ मार्च २०१५ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी वाजपेयींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. वाजपेयींचा जन्मदिवस हा देशात सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो.

थक्क करणारा प्रवास
वाजपेयी यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली होती. ते आयुष्यभर अविवाहित राहिले. तीन वेळा देशाचे पंतप्रधान, जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८ ते १९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५ ते १९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७ ते १९८०), भाजपचे अध्यक्ष (१९८० ते १९८६) आणि भाजप संसदीय पक्षाचे नेते (१९८० ते १९८४, १९८६, १९९३ ते १९९६), ११व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच, २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री ही पदे त्यांनी भूषविली.

दीड एकरावर स्मारक
अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात राष्ट्रीय स्मृतीस्थळावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या परिसरात दीड एकर जागेवर त्यांचे स्मारक बनविण्यात येणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.

‘भारतरत्न’ पुरस्कार
२५ डिसेंबर २०१४ रोजी वाजपेयींच्या जन्मदिनी भारताच्या राष्ट्रपतींनी वाजपेयींना ‘भारत रत्न’ पुरस्काराची घोषणा केली. भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. २७ मार्च २०१५ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी वाजपेयींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. वाजपेयींचा जन्मदिवस हा देशात सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो.

विमान अपहरण, संसदेवरील हल्ल्याचा आघात
१९९९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये रालोआला पुन्हा घवघवीत यश मिळाले आणि वाजपेयींनी सलग तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. हा कार्यकाळ संमिश्र ठरला. सरकार सत्तेत आले त्याचवर्षी तालिबानी दहशतवाद्यांनी भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण केले. हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूहून दिल्लीला निघाले होते. दहशतवाद्यांनी हे विमान कंदहारला नेते. वाजपेयी सरकारवर त्यावेळी विमानाच्या बदल्यात तीन दहशतवाद्यांना सोडण्याची नामुश्की झेलावी लागली. २००१ मध्ये दहशतवादी अफझल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ७ भारतीय सुरक्षा रक्षक मारले गेले. वाजपेयी सरकारसाठी हे दोन मोठे आघात ठरले.

पंतप्रधानपदाचे उमेदवार
ऑपरेशन ब्ल्यू-स्टारला भाजपचा पाठिंबा होता, मात्र इंदिरा गांधी यांची अंगरक्षकाकडून हत्या झाल्यानंतर दिल्लीमध्ये ज्या शीख विरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वाटय़ाला केवळ २ जागा आल्या. तरीही भाजपा देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले. भाजपवरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता. त्यातूनच विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला भाजपने राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा अग्रभागी होता. पुढे ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेमुळे देशात जातीय हिंसाचार उसळला. तरीही देशाच्या राजकारणातला भाजपचा प्रभाव कायम राहिला. १९९५च्या मार्चमध्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला चांगले यश मिळाले. त्याचवेळी भाजपच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५च्या अधिवेशनात आडवाणी यांनी वाजपेयी यांचे नाव १९९६च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.

..अन् वाजपेयींनी दिला राजीनामा
१९९६च्या लोकसभा निवडणुकीत भाजप १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोटय़ा पक्षांच्या यशामुळे १९९६ची लोकसभा त्रिशंकू राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पण लोकसभेत बहुमताचा आकडा भाजपला गाठता आला नाही. त्यामुळेच बहुमताच्या अग्निपरीक्षेला सामोरे न जाताच वाजपेयींनी तेराव्या दिवशी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तो दिवस होता १ जून १९९६. त्यानंतर १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ पर्यंत वाजपेयी पंतप्रधान होते. वाजपेयींनी यशस्वीपणे आघाडीचं सरकार चालवलं. इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर ते सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले बिगर काँग्रेसी नेते ठरले.

एका मताने कोसळले सरकार
१९९६ ते ९८ दरम्यान तिस-या आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे अल्पकाळ राहिली. १९९८च्या निवडणुकांत भाजपने पुन्हा चांगले यश मिळवले. भाजपने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली आणि वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार विराजमान झाले. १९९८च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांनी एनडीएचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासदर्शक ठरावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. त्यावेळी विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही आणि अखेर देश पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले.

देशभरातून हळहळ

त्यांच्या निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांनी अटलजींच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. वाजपेयींना तुम्ही-आम्ही जाहीर कार्यक्रमांत पाहून आता जवळपास नऊ वर्षे झाली. २००९ सालापासून ते अंथरुणाला खिळून होते. सभा, मैफली आपल्या अमोघ वक्तृत्वाने गाजवणारा हा नेता अचानक समाजापासून एकाकी पडला. तब्बल एक दशक त्यांना असे बेडवर पडून काढावे लागले. या अफाट व्यक्तिमत्त्वाला ज्या आजाराने जखडले त्या आजाराचे नाव आहे डिमेन्शिया अर्थात स्मृतिभ्रंश. डिमेन्शिया पीडित रुग्णांमध्ये आढळणारे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे शॉर्ट मेमरी लॉस. वयाची साठी ओलांडली की डिमेन्शियाची शक्यता बळावत जाते. वयपरत्वे माणसाची स्मरणशक्ती कमीच होते. पण अलजायमर या मेंदूशी निगडीत रोगामुळे डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते. अलजायमरमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते आणि त्यात डिमेन्शियाची भर पडली की परिस्थिती गंभीर बनते.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी

देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असणारा भारतरत्न हा पुरस्कार अटलबिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मार्च २०१५ मध्ये प्रदान करण्यात आला. शासकीय शिष्टाचार बाजूला ठेवून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दिल्लीतील कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी जाऊन त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदी मान्यवरही उपस्थित होते.

तीन वेळा देशाचे पंतप्रधान

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व करताना वाजपेयींनी तीन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले. १९९६ मध्ये आलेले त्यांचे सरकार फक्त तेरा दिवस टिकले. त्यानंतर १९९८ ते ९९ मध्ये ११ महिन्यांसाठी ते पंतप्रधानपदी होते. १९९९ मध्ये देशातील जनतेने पुन्हा एकदा वाजपेयींना संधी दिली. त्यांच्या या सरकारने १९९९ ते २००४ हा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते.

मनमिळावू स्वभाव

२५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वालेरमधील एका मध्यमवर्गीय़ ब्राम्हण कुटुंबात वाजपेयी यांचा जन्म झाला. ग्वालेर आणि कानपूरमधून त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कानपूरच्या दयानंद वेदीक महाविद्यालयातून त्यांनी एमएची पदवी संपादन केली. त्यानंतर १९५१ मध्ये भारतीय जनसंघाच्या माध्यमातून वाजपेयींच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या वाजपेयी अत्यंत प्रभावी वक्ते होते. वकृत्व हा वाजपेयींच्या व्यक्तीमत्वातील एक महत्वाचा पैलू होता. आपल्या वकृत्वाने वाजपेयींनी अनेक सभा गाजवल्या. संसदेत विरोधकांचा समाचार घेताना कधीही त्यांचा संयम सुटल्याचे, तोल ढळल्याचे उदहारण नाही. उलट विरोधकही त्यांच्या वाणीने प्रभावित होत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुही वाजपेयींच्या वकृत्वाने प्रभावित झाले. एक दिवस वाजपेयी देशाचे पंतप्रधान होतील असे भाकीत त्यावेळी नेहरुंनी वर्तवले होते.

वाजपेयींनी सर्वप्रथम १९७७ मध्ये मंत्रीपद भूषवले. आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आले. त्यावेळी काँग्रेस विरोधातील सर्वपक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली होती. त्यात भारतीय जनसंघाचाही समावेश होता. मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. सरकार कोसळेपर्यंत त्यांनी दोनवर्ष परराष्ट्र खात्याचा कार्यभार संभाळला.

त्यानंतर १९८० मध्ये भारतीय जनता पार्टी भाजपची स्थापना झाली. त्यावेळी वाजपेयी पक्षाचे अध्यक्ष झाले. लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंह शेखावत यांच्या साथीने त्यांनी भाजपला संपूर्ण देशात पोहोचवले. आज भाजपचा जो विस्तार, विकास झाला आहे त्यात वाजपेयींचे मोठे योगदान आहे. मनमिळावू स्वभावामुळे स्वपक्षाइतकेच प्रतिपक्षातही वाजपेयींचे अनेक मित्र होते.

अटलजींचे महाराष्ट्राशी नाते

स्वातंत्र्यवीर सावरकर हा अटलबिहारी वाजपेयी, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे यांना जोडणारा समान दुवा होता. अंदाजे १९८६-८७ चे वर्ष असावे. पुण्यात बिंदु माधव जोशी यांनी सावरकर महोत्सवाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात अटलजींचे मुख्य भाषण होते. व्यासपीठावर सुधीर फडके, पु. ल. देशपांडे होते. सर्वानीच अटलजींचे तोंडभरून कौतुक केले. शेवटी अटलबिहारी वाजपेयी बोलायला उभे राहिले. सुरुवातीलाच त्यांनी त्यांच्यासाठी अतिथी हा शब्द वापरण्यास आक्षेप घेतला.

पुण्यात एवढय़ा वेळा आलोय की, आता पाहुणा राहिलो नाही. मी तुमच्यातलाच आहे, असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि पहिल्याच वाक्यात त्यांनी सभा जिंकली.

वाजपेयींना मराठी उत्तम कळत असे. ते मराठी बोलतही असत. वाजपेयी कवी आणि लेखक असल्याने त्यांना मराठी साहित्य आणि लेखकांबद्दल अतिशय आदर होता. वाजपेयी पुण्यात आले की हमखास मराठी नाटके बघायला जात. ज्येष्ठ गायक सुधीर फडके, विख्यात साहित्यिक पु.ल. देशपांडे यांच्याशी त्यांची खास मैत्री होती. स्वातंत्रवीर सावकर हा या तिघांना जोडणारा समान दुवा होता. सावरकरांच्या काही मराठी कवितांचा वाजपेयींनी हिंदीत अनुवाद केला होता.

सावरकर म्हणजे ‘तीखा पण.’ मराठी माणसांना तिखटपणाबद्दल फारसे सांगावे लागत नाही असेही वाजपेयींनी आपल्या भाषणात सांगितले. ग्वाल्हेरचा असल्याने मराठीशी परिचय झाला. तिथल्या मराठीचा एक वेगळाच बाज आहे. ‘वरचा मजला खाली आहे’ असे ग्वाल्हेरमध्ये म्हटले जाते. असे सांगत त्यांनी मराठी भाषा कशी व्दिअर्थी आहे हे उलगडून दाखवले होते.

पुलं देशपांडे हे मोठे साहित्यिक आहेत. त्यांचे भाषण ऐकायचे होते त्यामुळेही मी पुण्यात आलो असे वाजपेयी म्हणाले. पुलं दिल्लीत असताना त्यांची भेट व्हायची. त्यांनी दिल्ली सोडल्याने दिल्लीतल्या साहित्यिक वर्तुळात पोकळी निर्माण झाली आहे. पुलंसारखे साहित्यिक मिळणे हे भाग्याचे आहे असे सांगत त्यांनी पुलंचे मनापासून कौतुक केले होते.

गीतरामायणाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमातही वाजपेयी पुण्यात आवर्जुन आले होते. एकदा पंडित भीमसेन जोशी यांनी वाजपेयींसाठी खास कार्यक्रमही केला. त्यांना शास्त्रीय संगीताचीही आवड होती. भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांची गाणीही त्यांना खूप आवडायची. त्याचबरोबर मराठी जेवण त्यांना आवडत असे. पुरणपोळी आणि आमरस हे त्यांचे खास आवडीचे पदार्थ होते.

मोदींना करून दिली होती राजधर्माची आठवण
अटल बिहारी वाजपेयी यांनी २००२ मध्ये नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलीवरून राजधर्माची आठवण करुन दिली होती. वाजपेयींचे ते पत्र अजूनही मोदींसाठी अडचणीचे ठरत आले आहे. गुजरात दंगलीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले होते. गुजरात दंगलीनंतर एका पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतानाही त्यांनी मोदींना राजधर्माची आठवण करुन दिली होती. जात, वर्ण किंवा धर्माच्या आधारे भेदभाव व्हायला नको, असे वाजपेयींनी म्हटले होते. पंतप्रधान वाजपेयींनी या पत्रातून गुजरात सरकारने दंगलीनंतर राबवलेल्या उपाययोजनांवरही नाराजी व्यक्त केली होती. दंगलीचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागांमधील नागरिक पुन्हा त्यांच्या घरी परतण्यास घाबरत आहे. या नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. दंगलीतील अनेक मृतांच्या कुटुंबियांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. मृतदेहाची ओळख न पटल्याने मदत मिळण्यास विलंब होत आहे. तसेच बेपत्ता व्यक्तींचे अर्ज निकाली काढण्याचा वेगही संथ आहे. हा सर्व प्रकार चिंताजनक आहे, असेही वाजपेयींनी पत्रात म्हटले होते.

इंदिरा गांधींना विरोध करण्यासाठी बैलगाडीतून संसदेत आले वाजपेयी
अटल बिहारी वाजपेयी यांनी विरोधात असताना अनेकवेळा सरकारला अडचणीत आणले होते. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराच्या मुद्यावरून वाजपेयी यांनी ४५ वर्षांपूर्वी विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधी सरकारवर याच मुद्यावरून हल्ला केला होता. पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे वाजपेयींनी बैलगाडीत संसदेत येऊन आपला विरोध नोंदवला होता. न्यूयॉर्क टाइम्सने १२ नोव्हेंबर १९७३ रोजी प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना संसदेत विरोधी पक्षाच्या संतापाला तोंड द्यावे लागले होते. वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दरामुळे त्यावेळी डावे आणि इतर विरोधी पक्षांनी इंदिरा गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. जनसंघाचे नेते असलेले वाजपेयी आणि इतर दोन सदस्य बैलगाडीत संसदेत आले होते. त्याशिवाय अनेक खासदार हे सायकलवर संसदेत आले होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या कमतरतेमुळे बग्गी (घोडा गाडी) यात्रेला त्यांनी विरोध केला होता. नागरिकांना पेट्रोल वाचवण्याचा संदेश देण्यासाठी इंदिरा गांधी यांनी बग्गी यात्रेचे आयोजन केले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version