Home महामुंबई अटलबिहारी वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक

अटलबिहारी वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई – माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अटलजींचे मुंबईशीही अतूट नाते होते. त्यांचे स्मारक मुंबईकरांना प्रेरणा देईल, असेही ते म्हणाले.

माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश बुधवारी मुंबईत आणण्यात आला. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील-दानवे यांना हस्तांतरित केला. तसेच मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांना भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अटलजींचा अस्थिकलश हस्तांतरित केला. दानवे व शेलार नवी दिल्ली येथून विमानाने मुंबई येथे अटलजींचा अस्थिकलश घेऊन आले.

विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कलशांना वंदन करण्यात आले. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, बंदरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष खा. अमर साबळे व आ. प्रसाद लाड उपस्थित होते.

सायंकाळी एनसीपीए येथे श्रद्धांजली सभा झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अटलजी यांचे नेतृत्व सर्वसमावेश होते. पक्ष संघटन मजबूत करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. पंतप्रधान म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी केलेले काम मोठे होते. मुंबईशी त्यांचा असलेला स्नेहबंध लक्षात घेऊन त्यांचे भव्य स्मारक मुंबईत उभारण्यात येईल. हे स्मारक कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देत राहील, असेही ते मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version