Sunday, May 19, 2024
Homeमहत्वाची बातमीवेधशाळेची नवी तारीख : १८ जून

वेधशाळेची नवी तारीख : १८ जून

मुंबई (प्रतिनिधी) : न्यायालयाकडून सुनावणीदरम्यान खटल्यांना तारखांवर तारीख मिळते, त्याप्रमाणे वेधशाळेकडूनही उशिराने आगमन होणाऱ्या वरुण राजाविषयी तारखांवर तारखा जाहीर होत आहेत. वेधशाळेने वरुण राजाच्या आगमनाची नवी तारीख १८ जून जाहीर केलेली आहे.

ग्रामीण भागामध्ये बळीराजा शेतीसाठी, तर शहरी भागातील नागरिक तलावांचा साठा आटत चालल्याने वरुण राजाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. शहरी भागामध्ये पाऊस पडत असला तरी क्षणात पाऊस, तर क्षणात कडक ऊन यामुळे या बदलत्या हवामानामुळे आजार तर वाढणार नाही ना, ही चिंता शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात पाऊस पडत असला तरी शेतातील मातीही ओली झाली नसल्याने पेरणीविषयी बळीराजा साशंक आहे.

साधारणपणे मुंबईमध्ये ७ जूनपर्यंत पावसाची सुरुवात होते. अजून पावसाची सुरुवात झालेली नाही. पाऊस लांबणीवर पडल्याने मुंबईकरांसह, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई येथील रहिवाशांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पाहावयास मिळत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांचा साठा आटत चालला आहे. नवी मुंबईकरही मोरबे धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत.

गेल्या आठवड्यात मुंबई शहर, उपनगर व सभोवतालच्या नवी मुंबई, ठाणे, उरण-पनवेल भागात पावसाच्या काही तुरळक सरी पडल्या, तेव्हा सर्वांना दिलासा मिळाला. पावसाची सुरुवात झाली, पण त्यानंतर त्याने दडीच मारली. दिवसभर आकाश ढगाळ अजूनही मुंबईकराना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पूर्व मोसमीच्या कालावधीत राज्याचा सात जिल्ह्यांत एकही टक्का पाऊस झाला नाही.

या वर्षी पाऊस चांगला पडण्याबाबत वेधशाळेकडून अंदाज गेल्या महिन्यापासून व्यक्त करण्यात आला असला तरी अर्धा जून महिना उलटला तरी पाऊस फारसा पडलेला नाही. वेधशाळेकडून गेल्या आठवड्यात काळ्या ढगांच्या प्रगतीचे दाखले मिळत होते. हे काळे ढगच अचानक गायब झाल्याने पाऊस पडलाच नाही.

राज्यातील धरणामध्ये पाण्याचासाठा २२ टक्के शिल्लक आहे. राज्यातील पाण्याचा साठा घटत आहे, ही एक चिंतेची बाब आहे. कोकण व लगतच्या घाट माथ्यावर पावसाचे आगमन १८ जूनपासून मध्य महाराष्ट्रात हळूहळू पाऊस गती घेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वेधशाळेकडून पावसाची आगामी तारीख १८ जून जाहीर करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -