Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वटेलिफोनिक फसवणूक ठकदारांचा नवीन अंदाज!

टेलिफोनिक फसवणूक ठकदारांचा नवीन अंदाज!

  • मुंबई ग्राहक पंचायत: नेहा जोशी

‘सर, कृपया तुमचा वन टाईम पासवर्ड (OTP) केवायसी (KYC- Know Your customer)साठी देता का, नाहीतर अर्ध्या तासात तुमचे बँक खाते निष्क्रिय होईल.’ ‘इन्शुरन्स कंपन्यांचा केवायसी संदर्भात आता नवीन नियम अस्तित्वात आला आहे, त्यासाठी तुमचा वन टाईम पासवर्ड शेयर करा’ ‘तुमची केवायसी माहिती बँकेला तुमचे बँक अकाऊंट अद्ययावत करण्यासाठी त्वरित हवी आहे; त्यासाठी खालील लिंक क्लिक करा.’ असे फोन कॉल्स किंवा SMS आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी आले असतील; किंबहुना ती एक नित्याची बाब झाली आहे. नाण्याला जशा दोन बाजू असतात तसेच तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबर त्यातील धोकेही अधोरेखित होत आहेत. त्यामुळे गरज आहे ती फसवणूक होऊ नये म्हणून काही शासकीय यंत्रणा आहे का? ती कसे काम करते किंवा त्यात काही त्रुटी आहेत का? जागृत ग्राहक म्हणून हे समजून घेण्याची गरज आहे.

अनेक दृष्टीने ऑनलाइन व्यवहार सोयीस्कर असले तरीही मनात कुठेतरी एक धाकधूक असते, जसे की, ‘झाले असतील ना पैसे ट्रान्स्फर, मी सर्व बरोबर केले आहे ना! थोडक्यात ऑनलाइन व्यवहार करताना मानसिक दडपण येते आणि हीच खरी तर फसवणूक होण्यामागची मेख आहे. फसवणूक करणारे भामटे बरोबर हीच मानसिकता हेरतात. जेव्हा असे खोटे फोन, येतात तेव्हा फसवणूक करणारे भावनिक ताण निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण करतात. जसे की, तुमचे बँक खाते निष्क्रिय होईल, तुमची पॉलिसी रद्द होईल. काही वेळा फोनवर तुम्हाला बोलण्यात गुंतवले जाते, जेवढे तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत जाता, तेवढे तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकत जाता आणि नकळत तुमची वैयक्तिक माहिती देऊन बसता. एकदा का तुम्ही त्यांना OTP दिलात किंवा लिंकवर क्लिक केले की, तुमचे बँक खाते त्यांच्या ताब्यात जाते आणि मग पैसे खात्यातून काढून घेतले जातात. अशा प्रकारचे फोन कॉल्स हे फक्त बँक, पॉलिसी यांच्याशी निगडित असतात असे नाही, तर त्यातही अनेक वेगवेगळी आमिषे दाखवून उदाहरणार्थ नोकरी मिळवून देतो, कर्ज मिळवून देतो, असे सांगून वैयक्तिक माहिती काढून घेतली जाते. या माहितीच्या आधारे ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात.
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI)च्या अंतर्गत DND (Do Not Disturb) नावाची यंत्रणा आहे, ज्यामध्ये हे अनाहूत कॉल नंबर्स रजिस्टर्ड असतात, ज्यामुळे असे अनाहूत कॉल्स या यंत्रणेमार्फत ग्राहकापर्यंत पोहोचण्याच्या आधीच थोपवले केले जातात. ट्राय अनसॉलिसिटेड कमर्शिअल कम्युनिकेशन (UCC) मार्गदर्शकाप्रमाणे DND नोंदणी यादी असते. याच यंत्रणेच्या अंतर्गत असे फसव्या कॉल करणाऱ्यांना १,००० रुपये ते १०,००० रुपये दंड आकारण्याची तरतूद देखील आहे, पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा ही यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असेल. गेल्या काही वर्षांमध्ये वित्तीय क्षेत्रात आर्थिक फसवणुकीच्या ग्राहक तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. या तक्रारी अनेक प्रकारच्या असतात. जसे की व्यवहारात अपारदर्शकता, बनावट व्यक्ती/संस्था, ग्राहकांच्या माहितीचा गैरवापर, सक्तीने केली जाणारी ग्राहकांच्या माहितीची चोरी वैगेरे. त्यामुळे ग्राहकांचा वित्तीय क्षेत्रातील संस्थांवरचा विश्वास डळमळीत होत आहे. खरे बघायला गेले तर आपल्या देशात प्रत्येक फोन नंबर, सीम कार्ड देताना केवायसी घेणे बंधनकारक आहे तरीदेखील या अपराध्यांपर्यंत यंत्रणा पोहोचू शकत नाही. याचे प्रमुख कारण सीम कार्ड हरवले, खराब झाले म्हणून जेव्हा बदलून दिले जाते, तेव्हा परत केवायसी माहिती घेतली जात नाही. अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने टेलिकॉम क्षेत्राला सीम कार्ड बदलून देताना केवायसीचे नियम कडक करण्याची आणि असे नंबर्स ‘हॉटलिस्ट’ म्हणून संबोधून त्याचा डाटाबेस तयार करण्याची सूचना केली आहे.

सध्या तरी असे हॉटलिस्टेड नंबर्स ज्यावरून ग्राहकांची फसवणूक होते आहे त्यांना ब्लॉक करण्याची मध्यवर्ती यंत्रणा अस्तित्वात नाही. यावर उपाय म्हणून टेलिकॉम क्षेत्राने लवकरात लवकर असा डाटाबेस बनविणे अपेक्षित आहे, जेणेकरून टेलिकॉम कंपन्यांना असे नंबर्स/सीम कार्ड्स ब्लॉक करणे सोपे जाईल. तसेच वित्तीय संस्थांनी देखील आपली जोखीम यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठी वित्तीय संस्था हा मध्यवर्ती हॉटलिस्टेड डाटाबेस वापरून अशा नंबर्सना त्यांच्या क्रेडिट सिस्टीम किंवा आर्थिक प्रणालीत प्रवेश नाकारू शकतात. असे धोके कमी करण्यासाठी हे नंबर्स कमीत कमी २ वर्षे व्यवहारात येता कामा नयेत. अशा प्रकारची फसवणूक होताना साखळी अस्तित्वात असते. ही साखळी तोडणे आवश्यक असते. काही महत्त्वाची माहिती देण्यासाठी बँक काही सुविधा पुरवण्यासाठी उदारहणार्थ ऑनलाइन पैसे ट्रान्सफरसाठी SMS, त्यासाठी काही चार्जेस असतात ते कापले गेल्याचे बँक SMS द्वारे ग्राहकाला कळविते. हे SMS घाऊकरीत्या केले जातात. त्यासाठी टेलिकॉम कंपन्या त्रयस्थ एजन्टची मदत घेतात. त्यांना सर्व्हिस प्रोव्हाडर्स असे म्हणतात. त्यांच्याकडे हे SMS टेम्पलेट्स साठवलेले असतात. अशी एक शक्यता असते की फसवणूक करणारे भामटे या सर्व्हिस प्रोव्हाडर्समध्ये कामाला असतात आणि टेम्पलेट्स चोरून ते फसवणूक करतात. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते जर ट्रायने हॉटलिस्टेड डाटाबेस तयार केला आणि सातत्याने नोंदणीकृत SMSची
तपासणी केली, तर टेलिकॉमच्या आधारे होणारी फसवणूक ९० टक्क्यांनी कमी होऊ शकते. जोडीला DND यंत्रणा त्वरित कार्यरत करणे आवश्यक आहे. ट्राय घोटाळे रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची मदत घेण्याचा प्रयत्न करत आहे.

येत्या काळात तंत्रज्ञान प्रगल्भ होत जाईल, यात शंका नाही, पण सजग ग्राहक म्हणून अशा कुठल्याही भावनिक दबावाला बळी न पडता सतर्क राहणे, मनात सतत ‘जागो ग्राहक जागो’चा नारा चालू ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे. तरच खऱ्या अर्थाने ग्राहक राजा ठरेल आणि आर्थिक ठकदारांना आळा बसेल.

Email : mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -