Sunday, May 19, 2024
Homeदेशएनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी

एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी

नवी दिल्ली (हिं.स.) : भाजपप्रणीत एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मंगळवारी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी बैठकीला पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान आणि संसदीय मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.

बैठकीनंतर जेपी नड्डा म्हणाले की, आजच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत भाजप आणि एनडीएने आपल्या सर्व घटक पक्षांसोबत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा केली. यानंतर द्रौपदी मुर्मू यांना एनडीएने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. बैठकीत सुमारे २० नावांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही विरोधी पक्षांशीही सल्लामसलत करण्याचा प्रयत्न केला, परंतु यातून काही निष्पन्न झाले नाही. यूपीएने उमेदवार जाहीर केला आहे, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षांनी संयुक्त उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवले आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून सिन्हा यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून २९ जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए संख्याबळाच्या आधारावर भक्कम स्थितीत असून, बीजेडी किंवा आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेससारख्या पक्षांचा पाठिंबा मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित मानला जातोय.

कोण आहेत द्रौपदी मुर्मू..?

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे.त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून १९९७ त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या. नंतर त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर त्या मत्स्य विभागाच्या मंत्री होत्या. तसेच २०१५ मध्ये मुर्मू यांनी झारखंडच्या पहिल्या राज्यपाल म्हणून काम केलेय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -