Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीनाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना विषबाधा?

नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना विषबाधा?

पोलादपूर येथे सहल; २८ जणांना उलटी-जुलाब अन् थंडी-ताप

पोलादपूर : नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमधील विद्यार्थी सहलीसाठी आले असता किल्ले रायगडावरील ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यानंतर पोलादपूर शहरातील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहाच्या ‘एमटीडीसी’च्या मान्यताप्राप्त राहण्याच्या ठिकाणी वास्तव्यास थांबले. मंगळवार रात्रीच्या भोजनानंतर यापैकी काही विद्यार्थ्यांना थंडी-ताप व उलटी-जुलाब होऊन अस्वस्थ वाटू लागले. या सर्व बाधित विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये बुधवारी तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले व दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सर्वांना रुग्णालयामधून सोडून दिल्यानंतर सर्व विद्यार्थी नियोजित सहलीसोबत मार्गस्थ झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पोलादपूर येथील सभागृहात नाशिकमधील भोसला मिलिटरी स्कूलच्या दोन बसेसमधून १०३ विद्यार्थी व कर्मचारी सहलीसाठी आले होते. रात्रीच्या मुक्कामासाठी थांबल्यानंतर भोजनाची व्यवस्थाही तिथेच करण्यात आली होती. मात्र, भोजनानंतर १०३ पैकी २८ विद्यार्थ्यांना उलटी व जुलाबाचा त्रास झाल्याने अस्वस्थ वाटू लागले. सकाळी ८ वाजता पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघतकर व आयुष डॉ. सलागरे यांनी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले. या घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो. नि. युवराज म्हसकर, उपनिरीक्षक उदय धुमासकर यांच्यासोबत सर्व पोलीस कर्मचारी या रुग्णालयात दाखल झाले. यावेळी मिलिटरी स्कूलच्या सहलीचे समन्वयक संतोष जगताप यांनी बाधित विद्यार्थ्यांनी रात्रीच्या भोजनानंतर स्टिंग व इतर शीतपेयांचे सेवन केल्याने तसेच दिवसभराच्या अतिप्रवासामुळे हा त्रास झाल्याचे सांगितले. बाधित विद्यार्थ्यांचे उलटी व शौचाचे नमुने तपासणीसाठी पाठविले जाणार असून, या विषबाधेची कारणमिमांसा झाल्यानंतर दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलादपूर येथील कॅप्टन मोरे सभागृहालगत आइस्क्रीम तसेच बियरशॉपी आणि चणेफुटाणे तसेच लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या शीतपेयांची दुकाने आहेत. त्यामुळे रात्री बाधित विद्यार्थी यापैकी कोणत्या दुकानाचे ग्राहक झाल्याने ही दुर्घटना झाली, याबाबत पोलीस तपासात अधिक माहिती उघडकीस येणार आहे.

महाड उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर बानापुरे व पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच बुधवारी १०३ पैकी ७५ विद्यार्थ्यांसह काही कर्मचारी पुढील सहलीसाठी रवाना झाले. तर उर्वरीत २८ विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता ग्रामीण रुग्णालयामधून सोडण्यात आल्यानंतर पुढील १ तास कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर डॉ. भाग्यरेखा पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील प्रवासाला जाण्यास त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने अनुकूलता दर्शविली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -