Narmada pattern : पर्यटन विकासाचा ‘नर्मदा’ पॅटर्न…!

Share

गुजरात राज्यातील नर्मदा नदी (Narmada pattern) आणि या नर्मदा नदीच्या काठावर गरुडेश्वर हे धार्मिक, अाध्यात्मिक मन:शांती देणारे माणगाव (सिंधुदुर्ग) येथील जन्मस्थान असलेले प.पू. टेंबेस्वामींचे समाधी स्थान. यामुळे गुजरात राज्यातील गरुडेश्वर व कोकणचं एक वेगळच नातं आहे. महाराष्ट्रातील, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातील प.पू. टेंबेस्वामींचे भक्तगण गरुडेश्वरला जातातच.

यामुळे गरुडेश्वरला जाऊन प.पू. टेंबेस्वामींच्या समाधीस्थळी नतमस्तक व्हावं हा विचार अनेक वेळा येऊन गेला; परंतु मागील महिन्यातच हा योग आला. गुजरात राज्यातलाही हा पहिलाच प्रवेश आणि प्रवास होता. महाराष्ट्रावर अन्याय करत गुजरात राज्यामध्ये उद्योग प्रकल्प नेले किंवा गेले म्हणून फारच कांगावा केला जातो; परंतु असं का घडत असावं, हा प्रश्नही मनात सतत टोचत होताच. दादर-एकतानगर रेल्वेने एकतानगर रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीजनची सहज कल्पना येऊन जाते. बडोदा, सूरत रेल्वे स्टेशन पार करत सकाळी ७ वाजता ही रेल्वे एकतानगरला पोहोचते. रेल्वे प्रवासात आपण नेहमी ऐकलेली सूरत, बडोदा ही स्थानकं झोपेत असतानाच केव्हाच निघून जातात. सूरत शहराचे नाव तर गेल्या दोन महिन्यांपूर्वी फारच चर्चेत आले होते. कापड व्यावसायाचा किंवा कापड खरेदीचा विषय आला तरीही कापडातले फार काही कळलं नाही तरीही ‘सूरतला कापड स्वस्त’ एवढं सहज कोणीही बोलून मोकळा होतो. तसंच बडोदा शहराबद्दल मराठी मनाचे राजे सयाजीराव गायकवाड या राजघराण्यामुळे आणि शास्त्रीय संगीतातील अनेक घराणी या बडोदा शहराशी जोडलेली आहेत. नर्मदा परिक्रमेमुळे नर्मदा नदी किती राज्यांना वळसा घालून जाते, याची चर्चाही आपण करत असतो; परंतु गुजरात राज्यामध्ये नर्मदा जिल्हा आहे, हे माहीत नव्हतं. त्याचा परिचय गुजरातला गेल्यावर समजला. नर्मदा जिल्हा हा आदिवासी भाग असलेला; परंतु एकतानगरमधील राष्ट्रीय एकत्मतेचे प्रतीक असलेलं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसराने जगाचं जस लक्ष वेधून घेतलंय तसंच ते पर्यटकांचं एक आकर्षण असलेलं पर्यटनस्थळ झालं आहे. हजारो पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देत असल्याने नर्मदा जिल्ह्याला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. या नर्मदा जिल्ह्यातील या भागात फिरताना स्वच्छ सुंदर आणि रुंद रस्ते यामुळे प्रवास करताना सुखकर व आनंददायी प्रवास होतो. दररोज हजारो पर्यटक या एकतानगरला येत असल्याने रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे उद्योग व्यवसायाला गुजरातमध्ये रेड कार्पेट घातलेलं असतानाच पर्यटन व्यवसायातून आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्नही दिसून येतो. एकतानगरमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ८२ फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पायथ्याशी जेव्हा आपण पोहोचतो, तेव्हा त्यातली भव्यता, तो तयार करण्यासाठीचे परिश्रम आणि त्या नर्मदेच्या काठावर वसलेलं हे एक नवं श्रीमंत शहर सहज आकर्षित करतं.

कोणताही एखादा मोठा प्रकल्प उभा राहतो, तेव्हा दोन मतप्रवाह असतातच तसे ते या एकतानगरच्या भव्यतेतही जाणवले. भूमिपुत्रांचे म्हणून काही वेगळे प्रश्नही असतात. त्यांच्या म्हणून काही वेदनाही असतात; परंतु या प्रकल्पांनी रोजगार, स्वयंरोजगाराच्या एक वेगळ्या संधी निश्चितच निर्माण झालेल्या दिसल्या. गावातून एकतानगरला येणाऱ्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या रिक्षा दिसतात. या मार्गावर १०० रिक्षा धावतात. याच आदिवासी भागांतील १०० तरुणींना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण दिले गेले. आज या १०० मुली पुरुषांनाही मागे टाकतील, अशा पद्धतीने रिक्षा व्यवसाय करतात. प्रवाशांशी अदबीने वागणं, बोलणं असतं. तसेच येणाऱ्या पर्यटक प्रवाशांना नर्मदा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांविषयीची माहिती देतात. याच नर्मदा जिल्ह्यात निळकंठधाम परिसर आहे. पूर्णत: व्यावसायिकता इथे आहे. याच परिसरात स्वामीनारायण मंदिर आहे. या मंदिरातही सारा श्रीमंती थाट आहे. स्वामीनारायण ट्रस्टच्या शैक्षणिक संस्था असल्याचीही माहिती मिळते. मात्र या निळकंठधाममध्ये आपला वेळ कसा जातो कळतच नाही. इथे सार्वजनिक विश्रांती स्थळ आहेत. पोहीच्या गावात हे आहे. याच पोहीच्या मध्ये नदी पार केल्यावर कुबेरभांडारी आणि कालिका मंदिर आहे. आपल्या देशात कुबेराची दोनच मंदिरे आहेत. यातल एक मंदिर हे गुजरातमधील या नर्मदेच्या काठावर आहे. निळकंठधाम ते कुबेरभांडारी मंदिर हा प्रवासाचा जुनाट असलेल्या प्रवासाचा थरारक अनुभव शब्दांतून सांगणेही अवघडच आहे. नदीतील दगडातून ज्या सुसाट वेगाने सुमोगाड्या आदिवासी मुलं ज्या लीलया चालवतात, नव्हे पळवतात तो थरार तेथे जाऊनच अनुभवावा लागेल. नदीतील नावेचा प्रवास आणि अडीचशे पायऱ्या चढून साक्षात कुबेराचं दर्शन!

कुबेराचं दर्शन घेतल्यावर, कालिका, महालक्ष्मीचं दर्शन होतं. छोट्या मुलांसाठी त्यांचे पाच तास वेगवेगळ्या खेळांमध्ये निघून जातात. टाॅयट्रेनमधला प्रवासही छोट्या-मोठ्यांना खूप आनंद देऊन जातो. जे चांगलं आहे, बदलत आहे, त्याचा स्वीकार महाराष्ट्रानेही करायला हवा. एकतानगरमध्ये फिरताना अनेक गोष्टी पाहिल्या, त्यात एक बाब सहज जाणवली महाराष्ट्रात असंख्य पर्यटनस्थळ आहेत; परंतु ती उपेक्षितच आहेत. राज्यात सरकार कोणाचंही असू देत; परंतु राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, विकासातून जनतेला काय मिळणार आहे, जनतेचं आयुष्य बदलणार आहे का? याचा विचार खरं तर व्हायला हवा. महाराष्ट्राच्या दुर्दैवाने असा विचार फार कधी होताना दिसला नाही. कोकणाचाच विचार करताना कोकणातील पर्यटनातून महाराष्ट्राच्या तिजोरीला मोठा हातभार लागेल; परंतु कोकणातील पर्यटनस्थळांकडे ज्या मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे आवश्यक आहेत. त्याकडे पाहिले जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकिल्ले घटका मोजत आहेत. त्यावर लक्ष केंद्रित केलं तरीही बरंच काही होईल; परंतु तेवढी विधायक दृष्टीच नाही. महाराष्ट्रानेही आपल्या राज्यात असलेल्या पर्यटनस्थळांच्या विकासाचा नवा विचार केला पाहिजे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील अनेक गावांचा मुखडा बदलला आहे. निवास न्याहारी योजना गुजरातमध्ये आहे. स्वत:च्याच घरात, शेतघरात येणाऱ्या पर्यटकांना चांगली सेवा देत आर्थिक सक्षमता आणण्याचा प्रयत्न झाला आहे. जगभरातील पर्यटक आपल्याकडे आले पाहिजेत. त्यांनी अखंड गुजरात फिरावे, पर्यटनस्थळं पाहावीत. हा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पर्यटन प्रकल्प राबविण्यात आले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने सर्व काही निसर्गाने ओंजळ भरून दिलंय. फक्त जपायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यांची एवढी मोठी अमानत दिलीय; परंतु त्याची जपणूक करण्याची मानसिकताही आपली नाही, हे खरंच दुर्दैव आहे. व्यावसायिकता आणि उद्योगीपणा गुजरातमध्ये आहेच. त्याच अनुकरण महाराष्ट्राने करायला हवे. केवळ ‘मराठी अस्मिते’च्या गावगप्पांनी आर्थिक सक्षमता आणता येणारी नाही. महाराष्ट्रात राज्यकर्ते कोणीही असले तरीही त्यांनी हा सकारात्मक विचार या पुढच्या काळात करायला हवा, तरच महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसाय वाढू शकेल. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील पर्यटन विकासातून पर्यटन विकासात नर्मदा पॅटर्न पुढे आला आहे. हा नर्मदा पॅटर्न समोर ठेवून महाराष्ट्रात काय करता येईल?, याचा विचार शासनकर्त्यांनी करावा.

-संतोष वायंगणकर

Recent Posts

Loksabha Election 2024: मतदानाआधी दिल्ली काँग्रेसला झटका, माजी प्रदेश अध्यक्ष अरविंदर सिंह लवली भाजपमध्ये

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष…

50 mins ago

Godrej: भावंडांच्या मतभेदातुन गोदरेज कंपनीच्या वाटण्या…

Godrej Family Split: गोदरेज कुटुंबाने 30 एप्रिल रोजी 127 वर्ष जुन्या कंपनीला दोन संस्थांमध्ये विभाजित…

1 hour ago

Saving Plan: दररोज वाचवा केवळ २५० रूपये आणि मिळवा २४ लाख रूपये

मुंबई: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही रक्कम वाचवत असतो. तसेच ही रक्कम अशा जागी…

2 hours ago

‘या’ तारखांना लागणार दहावी-बारावीचे निकाल…

CBSC: काही दिवसांपासुन दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत बनावट परिपत्रके समाजमाध्यमामध्ये व्हायरल होत आहेत. हा प्रकार…

3 hours ago

गुंतवणुकदारांसाठी खुशखबर, NSE देणार एका शेअरवर चार बोनस शेअर!

NSE: नॅशनल स्टॉक एक्सचेंज पात्र गुंतवणुकदारांच्या एका शेअरवर चार बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.…

4 hours ago

मनसे नेते अविनाश जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल…

मनसे नेते अविनाश जाधव यांनी झवेरी बाजारातील सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला धमकावत पाच कोटी रुपयांची खंडणी…

5 hours ago