Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजProperty fraud: आयत्या प्रॉपर्टीवर नागोबा!

Property fraud: आयत्या प्रॉपर्टीवर नागोबा!

आपले वडील गेल्यानंतर या लोकांनी आपल्याला आधार दिला हे जयंत आता विसरला होता. सखाराम गेले त्याच दिवशी जयंतने प्रॉपर्टीसाठी घरात वाद केलेला होता. ज्या चुलत्याने त्याला आधार दिला होता, त्यांच्याच बायको आणि मुलांना तो आता घराबाहेर करण्याच्या मार्गावर होता.

जयंत याचे वडील लहानपणीच गेल्यानंतर त्याची आई सुशीला व जयंतला त्याच्या काकाने म्हणजेच सखाराम यांनी आधार दिला. आपल्या भावानंतर भावाचा मुलगा आणि त्याची विधवा पत्नी यांना आधारच दिला नाही, तर त्याचं शिक्षण, भरण-पोषण हे सखाराम यांनी केलं व आपल्या घरात राहण्याची सोय त्यांनी केली. जयंतचे वडील दारूसाठी त्यांच्या वडिलांकडून मिळालेले घर सगळं काही विकून मोकळे झाले होते व मरतेवेळी बायको आणि मुलाला वाऱ्यावर सोडून गेले. अशा परिस्थितीमध्ये सखाराम यांनी आपल्या भावाच्या मुलाची आणि भावजयीची जबाबदारी उचलली. एक माणुसकी त्यांनी आपल्या भावाच्या कुटुंबीयाला दाखवली. त्यावेळी सखाराम यांच्या वाट्याला एक घर आणि दुकान आलेलं होतं, तेही पगडी पद्धतीचं होतं. त्या दुकानावर ते आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करत होते. स्वतःचा मुलगा संजय आणि भावाचा मुलगा जयंत या दोघांचेही शिक्षण सखाराम करत होते. शाळा वगैरे झाल्यानंतर दोन्ही मुलं दुकानात काम करत होती. दुकानातील बारीक-सारीक गोष्टी दोघेही मुलं शिकत होती.

जयंत कमवता झाला होता, तरीही तो आपल्या आईसोबत आपल्या चुलत्याच्या घरात राहत होता. ज्यावेळी आपल्याला आधाराची गरज होती, त्यावेळी आपल्या काकांनी आपल्याला आधार दिला. आता आपण कमावते आहोत आपल्या आईला घेऊन वेगळे राहू शकतो, असं असूनही तो त्या घरात मुद्दाम होऊन राहिला. सखाराम यांचे निधन झाल्यानंतर जयंतने सखाराम यांचं राहतं घर व दुकानावर आपला दावा केला की, “दुकान आणि घर माझे आहे, तेव्हा तुम्ही या घरातून बाहेर पडा.” अशी धमकी तो सखाराम यांची पत्नी आणि मुलाला देऊ लागला. सखाराम यांचा मुलगा जयंतला बोलू लागला की, “माझ्या वडिलांनी तुला आधार दिला आणि तुझ्या वडिलांनी त्यांच्या वडिलांनी दिलेली प्रॉपर्टी विकून खाल्ली आणि तू आता आमच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून आहेस का? माणुसकीच्या नात्याने माझ्या वडिलांनी तुझा सांभाळ केलाय म्हणून २५% हिस्सा आम्ही तुला देतो.” असं तो त्याला माणुसकीमुळे बोलू लागला. जयंत म्हणाला की, “मला २५% नको मला द्यायचं असेल, तर अर्धा अर्धा द्या.”

कायद्याने बघायला गेलं, तर जयंत याचा कोणताही अधिकार सखाराम यांच्या प्रॉपर्टीवर येत नव्हता. अगोदर सखाराम यांच्या वडिलांनी त्यांची प्रॉपर्टी विभाजन करून दोन मुलांना दिलेली होती आणि जयंतच्या वडिलांनी दारूपायी आपल्या हिस्स्याला आलेली प्रॉपर्टी विकून खाल्ली होती. आता जयंत हा सखाराम यांच्या प्रॉपर्टीवर अधिकार दाखवून लागला. जयंत आणि संजय हे सख्खे भाऊ नव्हते, ते चुलत भाऊ होते. म्हणजे जयंतला संजयच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर अधिकार दाखवण्याचा अधिकार नव्हता. त्याने गुंडांना आणून संजय आणि त्याच्या आईला मारझोड केली. ज्याने आधार दिला त्यांच्यावर तो उलटा फिरला होता. स्वतःहून त्याने लघुवाद न्यायालय ट्रेनेसी ट्रान्सफरसाठी दावा केला.

संजय आणि त्याच्या आईने योग्य कागदपत्रे न्यायालयात दाखवल्यानंतर जयंतच्या विरोधात आणि संजय व त्याची आई यांच्या बाजूने निर्णय लागला आणि जयंत याचा दावा कोर्टाने फेटाळला. तरी तो दुकानावर आपला अधिकार गाजवून “दुकान माझे आहे, याच्यावर कोणाचा अधिकार नाही आणि घरावरही माझा अधिकार आहे” असं सांगू लागला. “अर्धा अर्धा हिस्सा मागत होतो आता तर संपूर्ण प्रॉपर्टी माझी आहे”, अशी तो धमकी देऊ लागला. शिवीगाळ मारझोड तो घरातील लोकांना करू लागला. न्यायालयाने दिलेला निर्णय त्याला दाखवूनही मी असल्या न्यायालयाला मानत नाही. ही माझ्यासमोर कागदाची तुकडे आहेत, असं तो घरातल्यांना बोलू लागला. संजयला धमकी देऊ लागला की, “दुकानात पाऊल ठेवायचं नाही. एवढंच नाही तर घर पण सोडून जायचं घरातही राहायचं नाही” इथपर्यंत तो संजय आणि संजयच्या आईला धमकी देऊ लागला. याचा अर्थ सखाराम हे केव्हा जातात आणि आपण यांच्या प्रॉपर्टीवर कधी अधिकार गाजवतो याची वाट जयंत बघत होता.

आपले वडील गेल्यानंतर या लोकांनी आपल्याला आधार दिला हे जयंत आता विसरला होता. सखाराम गेले त्याच दिवशी जयंतने प्रॉपर्टीसाठी घरात वाद केलेला होता. ज्या चुलत्याने त्याला आधार दिला होता, त्याच्याच बायको आणि मुलांना तो आता घराबाहेर करण्याच्या मार्गावर होता. गुंडांना आणून तो आता घरातील लोकांना मारझोड करत आहे आणि मी सर्वात मोठा गुंड आहे, असं तो तिथे आजूबाजूच्या एरियात दहशत बसवत आहे. म्हणून संजय आणि त्याच्या आईने तिच्या पोलीस स्टेशनला पुन्हा एकदा एफआयआर करून तो ऐकत नाही म्हणून आपले निवेदन पाठवलेले आहे. एवढेच नाही तर आम्हाला संरक्षण द्यावे आणि आमची प्रॉपर्टी न्यायालयाने आमची आहे असे साबित केलेले आहे, त्याच्या हक्कासाठी आता आई आणि मुलगा लढत आहे.

ज्यांनी एका अनाथ मुलगा व एका विधवा स्त्रीला आधार दिला होता. तेच लोक आता ज्यांनी आधार दिला, त्यांनाच घराबाहेर काढण्याच्या मार्गावर आहेत. जयंत आयत्या प्रॉपर्टीवर नागासारखा बसलेला आहे. संजय यांनी आपल्याच हक्काच्या प्रॉपर्टीसाठी न्यायालयीन लढा लढण्याचा निर्णय घेतलेला आहे.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -