Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमाझं स्त्रीत्व - माझी जबाबदारी

माझं स्त्रीत्व – माझी जबाबदारी

स्वाती पाटणकर, सिंधुदर्ग

मॅडम, महिला दीन आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून येणार का?” असा व्हॉट्सअॅपवर मेसेज आला. मार्च महिन्याची सुरुवात दरवर्षी अशीच असते. पूर्वी मी जात असे महिलांमध्ये जरा मिसळायला मिळतं. पण हल्ली जरा टाळतेच.

आता बघा ना! वरच्या मेसेजमध्ये शुद्धलेखन आहे का? एका वेलांटीमुळे अर्थ बदलू शकतो. हेही त्यांच्या गावी नाही. अर्थात त्यांचं व्याकरण चुकलेलं होतं, तरीही महिला दीन झाल्या आहेत का? असाही विचार मनात येऊ लागला.

पुरुषांशी सततची बरोबरी करता करता महिलांची फरफट होते आहे का? हाही विचार मनात आला आणि त्याला उत्तर होकारार्थी आले. अर्थात ही परिस्थिती गेला १५ ते २० वर्षांतली आहे. बालपणापासूनच सतत दबाव. तुला काहीतरी बनायचं आहे. खूप अभ्यास कर, क्लासेसला जा. अवांतर गोष्टी शिकून घे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवं. इ. बरंच काही! आणि मग त्यातून सुरू होते उठल्यापासून झोपेपर्यंतची अव्याहत धावपळ. समोर येणाऱ्या प्रसंगांना, व्यक्तींना तोंड देत, बरेचदा तडजोडी करत काहीतरी मिळविण्यासाठीची निकड. त्यामध्ये पालकांचा दबाव खूप असतोच आणि मग बरेचदा अपेक्षित असलेलं जर गवसलं नाही, तर नैराश्य येतं. हे नैराश्य मनातच ठेवावं लागतं. बाहेर कुणाजवळ बोललं, तर निर्भत्सना होणार. आई-वडिलांना समजलं, तर त्यांच्याकडूनही अवहेलना होते आणि मग सुरू होतो, एकटीचा प्रवास. नैराश्याचा प्रवास. त्यात कुणी सहानुभूती दाखवली, तर तो हात आपलासा वाटायला लागतो आणि बरेचदा हा हात घात करतो. ती फसते. वाटेल ते सौदे करतात. शरीराची प्रचंड हानी होते. मनाची हानी समजण्यापलीकडची असते. काहीतरी साध्य करण्याच्या नादात तिचं स्त्रीत्व पणाला लागतं आणि मग कधीतरी असह्य होऊन ती सगळंच संपवते.

पोळलेले आई-वडील हताश असतात. मीडियाचा काहूर गगन भेदत असतो. अर्थात हे सारं अल्पकाळातच असतं. दुसरं आई-वडिलांच्या हातात काय उरलं? लाडक्या लेकीचं नसणं, तिच्या डोळ्यांत फुलवलेली स्वप्नं आता पोरकी असतात.

सध्या हे असं खूप ठिकाणी घडतंय. कोवळ्या मुलींचं जीवन उद्ध्वस्त होत आहे.

कुणाचं चुकतंय? आपण कधी विचार केला आहे का? नाही ना! चला आज करू या.

स्त्री-पुरुष समानता असायलाच हवी. जी कायद्यानेही आहेच. पण ही समानता बौद्धिक, शिक्षणाच्या संधी, नोकरीच्या, खेळाच्या संधी इत्यादी बाबतींत आवश्यक आहेत. पण शारीरिकदृष्ट्या स्त्री-पुरुष तुलना होऊ शकत नाही. निसर्गानेच त्या बाबतीतले फरक केलेले आहेत. जे आपण मान्य करायला हवेत, पण दुर्दैवाने हे फरक आपण मान्य करत नाही आणि हाच मुख्य मुद्दा आहे. इथे जरा गल्लत होते आहे आणि आजची मुलगी मुलांप्रमाणे होण्यासाठी धडपडते आहे. मित्र-मंडळींसोबत मौजमजा करायला जाताना काळजी घ्यायला हवी. अनेक गैरप्रकार समोर येत आहेत, यामध्ये भरडली जाते ती मुलगी.

महिलांची सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याची निकड दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात जाणवत आहे. शासनाने आम्हाला सुरक्षित ठेवायला पाहिजे, ही अपेक्षा चुकीची आहे. मुळात तुम्ही स्वत:ला सुरक्षित ठेवलं पाहिजे. आपल्या मुलींची योग्यता ओळखायला शिका. आपल्या मुलींना सुरक्षित आयुष्य द्या.

तिने शिकलं पाहिजे. वेगवेगळे छंद जोपासले पाहिजेत. तिने फिरलं पाहिजे, धीट व्हायला शिकलं पाहिजे. वेगवेगळे छंद जोपासले पाहिजेत. तिच्यात आत्मविश्वास हवा. हे सगळं खरं आहे. हे सगळं तिला तिचं अस्तित्व द्या. सर्वप्रथम तिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवा.

प्रत्येक स्त्री यशस्वी व्हावी हीच इच्छा आहे. पण यशाच्या अपेक्षेत बऱ्याचजणी मागे राहतात. त्यांच्या वेदना कुणी जाणून घेत नाही. अर्थात हे होत राहणार… हे होत राहिले तरीही आपण साऱ्या महिलांनी पुढे जायचं आहे. कष्ट करायचे आहेत. तपश्चर्या करायची आहे. यशाच्या शिखराकडे झेप घ्यायची आहे. अर्थात हे करताना आपण ठेवायचा आहे, प्रत्येक स्त्रीसाठी सन्मान. त्यासाठी आपण जपायचं आहे आपलं स्त्रीत्व. परमेश्वरानं बहाल केलेली ही लाखमोलाची देणगी ‘आपलं स्त्रीत्व.’

‘माझं स्त्रीत्व – माझी जबाबदारी’ हे स्त्रीत्व मी भरकटू देणार नाही, हा आपण निश्चय करू या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -