Tuesday, May 14, 2024
Homeताज्या घडामोडीWater shortage : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांवर येणार पाणीकपातीचे संकट

Water shortage : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांवर येणार पाणीकपातीचे संकट

दोन महिने आधीच आली राखीव पाणीसाठा मागण्याची वेळ

मुंबई : मार्च महिन्यापासून मुंबईकरांना (Mumbaikars) १० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून केवळ ४८ टक्के पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा अशी मागणी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने (BMC) राज्य सरकारकडे (Maharashtra Government) पत्राद्वारे केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास मुंबईकरांसाठी पाणी कपात (Water cut) अटळ असणार आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणात राखीव साठा मिळून सध्या केवळ ४८.९५ टक्के पाणीसाठा जमा आहे. हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरणार नसल्यामुळे १० टक्के पाणी कपात करावी लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भातसा आणि उर्ध्व वैतरणा या धरणातील राखीव पाणीसाठा मिळावा अशी मागणी पालिका प्रशासनाने राज्य सरकारला पत्र पाठवून केली आहे. याबाबतचे पत्र जलविभागाने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मान्यतेसाठी पाठवले आहे.

दरवर्षी ऑक्टोबरमध्येही पाऊस पडतो, पावसाचे पाणी धरणक्षेत्रात झिरपत येत असते. यंदा मात्र ऑक्टोबरपूर्वीच पाऊस थांबल्यामुळे धरणातील पाणी वेगाने आटले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली. यामुळे राखीव पाणीसाठ्याची गरज भासत आहे.

मे ऐवजी मार्चमध्येच मागावा लागतोय राखीव पाणीसाठा

एखाद्या वर्षी पाणीसाठा कमी झाला तर राखीव साठ्यातून पाणी मिळावे याकरीता पालिका प्रशासन मे महिन्याच्या आसपास राज्य सरकारला पत्र पाठवले जाते. यंदा मात्र ही वेळ मार्च महिन्यातच आली आहे. जून २०२३ मध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे पालिकेने राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली होती. त्यामुळे पाणी कपात टळली होती. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे जुलै २०२३ मध्ये अखेर १० टक्के कपात करावी लागली होती. पाणीसाठा ८१ टक्के झाल्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये ही पाणीकपात रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे.

तीन वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून ७ लाख ८ हजार ४५९ दशलक्षलीटर म्हणजेच ४८.९५ टक्के पाणीसाठा आहे. यापूर्वी २०२३ मध्ये तो ५४.४१ टक्के इतका होता तर २०२२ मध्ये ५६.८६ टक्के इतका होता. यंदा ही टक्केवारी फारच खाली घसरली आहे. त्यामुळे दहा टक्के पाणी कपात टाळता येईल इतका राखीव पाणीसाठा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -