Monday, June 17, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखमुंबई पूरमुक्त व्हावी, हीच अपेक्षा...

मुंबई पूरमुक्त व्हावी, हीच अपेक्षा…

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. देशात अनेक छोटी राज्ये आहेत, त्यांचा जेवढा अर्थसंकल्प असतो, त्यापेक्षा मोठ्या रकमेचा मुंबईचा अर्थसंकल्प दर वर्षी सादर होतो. गोव्यासारख्या एखाद्या छोट्या राज्याच्या अर्थसंकल्पापेक्षा मुंबई महापालिकेचा सुमारे ४० हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांचा अर्थसंकल्प आहे. या मुंबापुरीवर गेली तीस वर्षे सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेच्या राजवटीत पावसाळ्यात मुंबईतील अनेक सखल भागात नुसते पाणी तुंबते, नव्हे तर येथे जलमय स्थिती दर वर्षीच निर्माण झाली आहे. “नेहमीच येतो पावसाळा” या म्हणीप्रमाणे मुंबईकरांनाही रस्त्यावरील पूरग्रस्त स्थितीची सवय होऊन गेल्यामुळे, कधी त्यांनी सत्ताधाऱ्यांना दोष दिला नाही. समुद्राच्या बेटावर मुंबई वसलेली असल्याने हे पाणी तुंबते, असा ढोबळ समज मुंबईकरांनी करून घेतला आहे. दर वर्षी पावसाळ्याच्या आधी नालेसफाई केली जाते. त्यावर मुंबई महापालिकेचा मोठा खर्च आहे. दर वेळी एप्रिल-मेपर्यंत पूर्ण कामे झालेली असतात. मात्र, यावेळी नालेसफाईची कामे उशिरापर्यंत पूर्ण झाली नाहीत. गेल्या दोन दिवसांत मुंबईत पाणी साचले, त्याचे कारण याला काही अंशी मानता येईल. मुंबईतील हिंदमाता सिनेमागृह परिसर, सांताक्रुझ मिलन सबवे, सायन अशी काही ठिकाणी आहेत. ज्या ठिकाणी थोडा पाऊस पडला की, कमरेइतपत पाणी साचल्याची उदाहरणे मुंबईकरांना नवीन नाहीत. हिंदमातासारख्या ठिकाणी पालिकेने पम्पिंग व्यवस्था केल्याने साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा झाला. त्यामुळे यंदा हिंदमाता या ठिकाणी पाणी साचले नाही म्हणून सत्ताधारी शिवसेनेची नेतेमंडळी स्वत:चे कौतुक करत आहे, तर मग मुंबईत २५ ते ३० ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होते, मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकादरम्यान पाणी साचते, असे स्पॉट माहीत असूनही त्यावर मुंबई महापालिकेत सत्तेत असताना दुर्लक्ष का केले? असा प्रश्न उपस्थित होतो.

मुंबई महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त इक्बाल सिंह चहल हे सध्या काम पाहत आहे. महापालिका बरखास्त केल्यानंतर आयुक्त म्हणून चहल हे मुक्तपणे काम करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भेट देऊन मुंबईतील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड व ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. राज्य सरकार व मुंबई महापालिकेने पावसाळ्याला तोंड देण्यासाठी चांगली तयारी केली आहे, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचे कौतुक केले आहे. मात्र मुंबईतील याआधीच्या पावसाळ्यात इमारत, दरड कोसळण्याच्या घटना पाहता, मुंबई महापालिका प्रशासनाने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. धोकादायक इमारतींमधील नागरिकांनी त्वरित जागा खाली करावी व पालिकेने त्यांची पर्यायी व्यवस्था करावी. दर वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास रेल्वे मार्गावर २५ ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे रेल्वेसेवा ठप्प होऊन प्रवासी, महिला रेल्वेत तासनतास अडकून बसतात. त्यांच्याजवळ प्रवासात पैसे असल्यास घरी जाण्यासाठी टॅक्सी, रिक्षा यांना जास्त भाडे भरून घर गाठणे अवघड होते. त्यामुळे त्या रेल्वे प्रवाशांना त्रासापासून दिलासा देण्यासाठी व त्यांना लवकरात लवकर घरी जाण्यासाठी बेस्ट, एसटी बस सेवा आणि नाश्त्याची व्यवस्था करावी. दूर अंतरावर राहणाऱ्या लोकांसाठी पालिका शाळेत राहण्याची व्यवस्था करावी. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन रेल्वेसेवा ठप्प झाल्यास रेल्वे प्रवासात अडकलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी बेस्ट, एसटी बस सेवा आणि नाश्त्याची व्यवस्था करता येईल का? याचा विचार मुंबई महापालिकेने करायला हवा.

मुंबईत हजारो जुन्या मोडकळीस इमारतींची संख्या मोठी आहे. या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना तत्काळ घरे खाली करायला सांगून त्यांची संक्रमण शिबिरात पर्यायी व्यवस्था करावी. मालमत्तेपेक्षाही जीवाचे मोल जास्त असते. तसेच दरड कोसळण्याच्या ठिकाणी नागरिकांना वाचविण्यासाठी तेथील घरे खाली करून त्यांना तत्काळ आवश्यक पर्यायी ठिकाणी स्थलांतरित करणे गरजे आहे. मात्र मुंबई महापालिकेकडून स्थलांतरित व्हावे म्हणून ज्या संक्रमण शिबिरात पाठवले जाते, तेथे नागरी सुविधा नसल्याने अनेकदा रहिवासी तेथे जाण्यास नाखूश असतात. या शिबिरात गेल्यानंतर चांगल्या शाळेत मुलांना शिकण्याची संधी मिळत नाही. जवळपास चांगली हॉस्पिटल्स नसल्याने आरोग्य व्यवस्थेबाबत त्यांच्या मनात भिती असल्याने अनेक नागरिक या कारणाने स्थलांतरित जागेत जाण्यास तयार होत नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील, अशा ठिकाणी संक्रमण शिबिरे उभारावीत. जेणेकरून मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास होईपर्यंत त्यांना आपल्या कुटुंबासह राहता येता येईल.

मुंबईला आमच्या सरकारच्या कार्यकाळातच पूरमुक्त करणार आहोत. त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे, अशी ग्वाही नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना दिली आहे. याआधी भाजपने पहारेकरीची भूमिका घेतली होती. नागरी सुविधेच्या कामातील अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची भाजपने पोलखोल केली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप युतीच्या कार्यकाळात मुंबईकरांना पूरमुक्त मुंबईचे नवे रूप पाहावयास मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -