Saturday, May 18, 2024
Homeदेशमहाराष्ट्र व बाडेन - वूटॅमबर्गमध्ये होणार सामंजस्य करार

महाराष्ट्र व बाडेन – वूटॅमबर्गमध्ये होणार सामंजस्य करार

लाखो तरुणांना मिळणार नोकरीची संधी

स्टुटगार्ट (वृत्तसंस्था) : कौशल्य विकास, शिक्षण, पर्यटन व सांस्कृतिक देवाण-घेवाण याबाबत महाराष्ट्राशी तातडीने सांमजस्य करार करण्यास जर्मनीतील बाडेन- वूटॅमबर्ग राज्य सरकार उत्सुक आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो तरुणांना होईल आणि त्यांना जर्मनीत नोकऱ्यांची संधी मिळेल, अशी माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

कौशल्य विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारले. त्या धोरणास केसरकर यांनी गती दिली. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास व उद्योजकता विकासमंत्री मंगलप्रभात लोढा आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांचे सहकार्य मिळाले.

जर्मनीच्या दौऱ्यावर असलेले केसरकर यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण, पर्यटनाला चालना, जर्मन भाषा शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर सोमवारी (दि. १५) व मंगळवारी (दि. १६) तीन बैठकांमध्ये विविध मुद्दे मार्गी लावले. त्यातील चर्चेचे फलित म्हणून महाराष्ट्र व बाडेन-वूटॅमबर्ग राज्यांमध्ये लवकरच सामंजस्य करार केला जाईल. त्यासाठी बाडेन-वूटॅमबर्गच्या सरकारने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना रीतसर आमंत्रित केले आहे. बाडेन-वूटॅमबर्ग जर्मनीतील सर्वांत संपन्न, औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले राज्य आहे. त्याच्याशी महाराष्ट्राचे दीर्घ काळापासून संबंध आहेत. ते आता अधिक दृढ होतील, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. केसरकर म्हणाले, “भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी दाखविले आहे. सेवाक्षेत्राच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीय तरुण जगातील प्रगत देशांत जातील व आपल्या कामाद्वारे भारतीय संस्कृतीचा ठसा उमटवतील,’ असेच पंतप्रधानांना अपेक्षित आहे.

मंत्री केसरकर त्यांच्यासमवेत असलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी आणि मंगळवारी तीन महत्त्वाच्या बैठका झाल्या. स्टुटगार्ट व कार्ल्सरूह येथे झालेल्या या बैठकांना भारताचे महावाणिज्य दूत (दक्षिण जर्मनी) मोहित यादव, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण खात्याचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल उपस्थित होते. या महत्त्वाच्या बैठकांचे नियोजन जर्मनीतील मराठी उद्योजक ओंकार कलवडे यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -