Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीपाकिस्तानात हाहाकार, तीन कोटीहून अधिक नागरिकांना पुराचा फटका

पाकिस्तानात हाहाकार, तीन कोटीहून अधिक नागरिकांना पुराचा फटका

पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात भीषण महापूर; एक तृतीयांश भाग पाण्यात

लाहोर : पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील हा सर्वात भीषण पूर आहे. दिवसेंदिवस तेथील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. एका अहवालानुसार, पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पाण्यात बुडाला आहे. तर या पुरामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, लाखो लोक बेघर झाले आहेत. या पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अन्नधान्याचा पुरवठाही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

देशातील बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यंदा मान्सूनचा पाऊस नेहमीपेक्षा १० पट जास्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुरामुळे अन्नधान्याच्या टंचाईबरोबरच आरोग्याचेही संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तानमधील २७ दशलक्ष लोकांकडे पुरापूर्वी पुरेसे अन्न नव्हते, तर आता पुरानंतर हा धोका अधिकच वाढला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ३० ऑगस्ट रोजी एका निवेदनात म्हटले आहे की देशातील लोक अन्न संकटाचा सामना करत आहेत. त्याचवेळी टोमॅटो, कांदा या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. लोकांना अन्न पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांनी उपाशी झोपू नये हा आमचा हेतू असल्याची माहिती पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली आहे.

पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत १ हजार २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ४०० मुलांचा समावेश आहे. त्याचवेळी ३.३ कोटी लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे १६० हून अधिक पूल तुटले आहेत. ५ हजार किलोमीटरचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. ३५ लाख एकर पिके नष्ट झाली आहेत, तर ८ लाखांहून अधिक गुरांना जीव गमवावा लागला आहे. देशात अतिसार, कॉलरा, डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार झपाट्याने पसरत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -