Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखमोदी युगपुरूष; गरिबांचा मसिहा

मोदी युगपुरूष; गरिबांचा मसिहा

देशाचे नेतृत्व कणाहिन असेल आणि निर्णय क्षमता नसल्याने धोरण लकवा आला असेल, तर कशी बजबजपुरी माजेल, याचे उत्तम उदाहरण म्हणजे २००४ ते २०१४ या दहा वर्षांतील डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणीत यूपीएचे सरकार. या पार्श्वभूमीवर देशात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बिगरकाँग्रेसी सरकार देशात आले आणि त्यानंतर सलग सात वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये देशाने अामूलाग्र बदल घडवून जगभरात आपला दबदबा निर्माण केला. म्हणूनच नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वांत यशस्वी पंतप्रधान आहेत, असे प्रतिपादन देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या ‘डिलिव्हरिंग डेमोक्रसी’ या तीन दिवसांच्या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात काढले. मोदींच्या राजकीय कारकिर्दीला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून मोदी यांच्या शासन पद्धतीची चिकित्सा यावेळी केली जाणार आहे.

गृहमंत्री शहा यांनी यावेळी मोदी यांच्या नेतृत्वाचे, कतृत्वाचे, धाडसाचे भरभरून कौतुक केले आणि त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. शहा यांनी केलेले प्रदीर्घ भाषण म्हणजे, कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना मोदींनी देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत घेतलेली यशस्वी झेप आणि जगभरात देशाचा दबदबा निर्माण करण्याची त्यांची अद्वितीय कामगिरी यांचा घेतलेला सर्वव्यापी आढावा म्हटला पाहिजे. विशेष म्हणजे २००४ ते २०१४ या दहा वर्षांत काँग्रेस सरकारमध्ये मनमोहन सिंग यांनाच कोणी पंतप्रधान म्हणून मानतच नव्हते. इतकी अनागोंदी होती की, लोकशाही व्यवस्था कोलमडून पडेल की काय, अशी भीती लोकांना वाटू लागली होती.

संविधानकर्त्यांनी बहुपक्षीय संसदीय लोकशाही स्वीकारली. त्यानुसार प्रत्येक पक्षाची निश्चित विचारसरणी असली पाहिजे, असे मानले गेले. पण ६०च्या दशकानंतर २०१४ पर्यंत लोकांना सातत्याने ही प्रणाली टिकेल की नाही याबाबत शंका होती. ही गंभीर परिस्थिती बघून भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. लोकांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिले, मोदींची सत्ता केंद्रात स्थापन झाली. मोदींना बघून लोकांमधील आक्रोश कमी झाला, त्यांनी काँग्रेसला दूर सारत भाजपला म्हणजेच मोदींना बहुमताने निवडून दिले. संपूर्ण देशात एक सकारात्मक बदल दिसला आणि लोकांमध्ये आनंदाची लाट पसरलेली दिसली. आपली स्वप्ने, आशा-आकांक्षा पूर्ण होतील, असा विश्वास लोकांमध्ये जागला. मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत मिळवलेले केंद्रातील पहिलेच बिगरकाँग्रेसी सरकार २०१४ मध्ये स्थानापन्न झाले. यापूर्वीही वाजपेयी, मोरारजी देसाई यांची सरकारे आली, या सर्व पार्श्वभूमीवर मोदींनी देशात नवनव्या अभिनव विकास योजना राबविल्या. पूर्वी एखादी योजना राबवताना त्याचा लाभ किती जणांना होईल, ते सांगितले जात असे. पण मोदींनी प्रत्येक योजना ही देशातील तळागाळाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आखली आणि त्याची अंमलबजावणी केली. संपूर्ण देशाचा विकासाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात त्यांनी बदल करून टाकला. मग ती शौचालयांची योजना असो, पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला गॅस योजना, स्वच्छता योजना, शुद्ध पाणीपुरवठा, वीजपुरवठा योजना अशा सर्व योजनांमध्ये गरिबांचे जीवन उंचावण्याचा प्रयत्न मोदींनी केला हे निश्चित. या योजना केवळ लागू करून ते गप्प बसले नाहीत, तर त्यांची योग्यप्रकारे अंमलबजावणी कशी होईल, याची पुरेपूर काळजी घेतली.

चहावाल्याचे पुत्र असल्याने आणि सर्वसामान्य गरीब घरातून पुढे आलेल्या मोदींना गरिबांच्या वेदना कळतात. त्यांनी गरीब महिला, पुरुषांनी उपसलेले कष्ट पाहिले आहेत. त्यामुळेच विकासाचे धोरण ठरवताना ते गरिबांचा आवर्जून विचार करताना दिसतात हे नक्की. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवला. विकास म्हणजे निव्वळ आकडेमोड वा तक्ते नव्हेत. मोदी यांनी विकास मानव केंद्रित करून त्याची परिभाषा बदलली. विकासात गरिबांना स्थान दिले. मोदींनी अत्यंत कठोर निर्णय घेतले. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका असताना नोटाबंदी लागू केली. तीन तलाकचा निर्णय घेतला. उरी व पठाणकोट हल्लेखोरांना धडा शिकवणारा सर्जिकल स्ट्राइक केला. मोदींच्या कार्यकाळात राम मंदिराचा निर्णय मार्गी लागला. काश्मीरमधील अनुच्छेद ३७० व ३५ अ काढून टाकले. सगळे निर्णय धाडसाने घेतले आणि कधीही माघार घेतली नाही. राजीव गांधींसारखे नेते दबावापुढे कसे झुकले हे देशाने पाहिले आहे. मोदींनी भारताच्या पारपत्राचे मूल्य वाढवले आहे. देशाकडे बोट दाखवण्याची कोणाची आता हिंमत होत नाही. संरक्षणनीती ही नेहमीच परराष्ट्रनीती मागून जात असे. पण आता संरक्षणनीतीला स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे. मोदींनी निवडणुकांकडे पाहून निर्णय घेतले नाहीत. नेहमीच देशातील गरिबांचा विचार केला. म्हणूनच त्यांच्या आर्थिक धोरणाला मोदीनॉमिक्स म्हटले जाते. निर्णय घेतल्यानंतर त्यांनी कधी पाऊल मागे घेतलेले नाही. त्यांनी नवे युग निर्माण केले. नव्या युगातील मूल्ये बदलली, त्या पवित्र मूल्यांच्या आधारे विकास साधला म्हणूनच मोदींना युगपुरुष आणि गरीबांचा मसिहा म्हटले पाहिजे हे निश्चत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -