Monday, May 20, 2024

मनाचा खेळ!

कथा: रमेश तांबे

आज साक्षीचा भूमितीचा पेपर होता. दोन दिवस परीक्षेची तिने उत्तम तयारी केली होती. पेपरच्या दिवशीदेखील ती लवकर उठली. कामे आटोपून अभ्यासाला बसली. पण अभ्यास झालेला असल्यामुळे तेच तेच वाचायचा तिला कंटाळा आला. कालपर्यंत जो मूड होता तो आज नव्हता. तिने आईला सांगितलं. पण आई स्वयंपाक घरातूनच म्हणाली, “साक्षी काळजी करू नकोस. असं होतं परीक्षेच्या वेळी!” खरं तर आईलाच साक्षीचं खूप टेन्शन आलं होतं. कसं होईल साक्षीचं. कसा लिहील ती पेपर. आई स्वतः अनेक वेळा भूमितीत नापास झाली होती. त्यामुळे तिला खूप भीती वाटत होती. म्हणून ती साक्षीच्या पुढे आलीच नाही. इकडे साक्षीने टेबलावर डोकं टेकवलं. अन् थोड्याच वेळात तिला झोप लागली.

थोड्या वेळानं आईचं लक्ष गेलं. पाहते तर काय, साक्षी चक्क झोपली होती. हातातली कामे तशीच टाकून आई लगबगीने साक्षीकडे आली आणि डोक्यावर हलकीच टपली मारून म्हणाली, “अगं उठ, झोपा काय काढतेस. आज परीक्षा आहे ना तुझी? आणि भूमिती किती अवघड विषय आहे माहीत आहे ना तुला!” आईची घालमेल वाढली. एवढे बोलूनही साक्षी उठली नव्हती. “साक्षी, अगं ये साक्षी” आई पुन्हा मोठ्याने ओरडली. तशी साक्षी जागी झाली अन् आईकडे बघत चक्क गाणं म्हणू लागली.
त्रिकोणाला तीन बाजू
चौकोनाला चार
वर्तुळाला नसे बाजू
तो गोलाकार!

साक्षीचं गाणं ऐकून आई चक्रावली आणि म्हणाली, अगं साक्षी हे काय नवीन! गाणी काय म्हणतेस? आता मात्र साक्षी हसली. थोडी विचित्रच हसली आणि पुन्हा गाणं म्हणू लागली.
वर्तुळाचा मध्यभाग
केंद्रबिंदू ठरे
त्याच्याभोवती परिघ त्याचा
गोल गोल फिरे!
असं म्हणून साक्षी खो-खो हसू लागली. आता मात्र आई घाबरली. तिने साक्षीला पटकन छातीशी धरले. तिचे पटापटा मुके घेतले. डोक्यावरून मायेने दोन वेळा हात फिरवला आणि म्हणाली,‘‘ बेटा साक्षी असं काय करतेस. तू जरा माझ्याशी नीट बोल ना. काय झालं तुला? हे गाणं का म्हणतेस? कोणी सांगितलं तुला? बोल ना साक्षी, बोल ना!” बोलता बोलता आईचा श्वास कोंडू लागला. ती घामाघूम झाली. साक्षीची अशी विचित्र अवस्था तिला पाहवेना. साक्षी अर्धवट डोळे उघडून आईकडे बघत पुन्हा गाणं म्हणू लागली.
वर्तुळाचा परिघ सरळ
केंद्रामधून जोडा
व्यास म्हणती त्याला अर्धा
त्रिज्येसाठी तोडा!

आता मात्र आईचं डोकं गरगरू लागलं. तिने कसाबसा बाबांना फोन लावला. “अहो, अहो घरी या ना लवकर! आपली साक्षी बघा ना कशी तरी करते. तुम्ही लवकर या.” आई रडत रडत बाबांशी बोलत होती. थोड्याच वेळात बाबा आले. तशी आई त्यांच्याकडे धावली आणि रडवलेला सुरात त्यांना सांगू लागली. “बघा ना आपली साक्षी कशी करते.” तसे बाबादेखील साक्षी सारखांच गाणं म्हणू लागले.
बाजू मिळवून चौरसाच्या
परिमिती कळे
वर्ग करून बाजूचा हो
क्षेत्रफळ मिळे!

आता मात्र आई हादरलीच. दोन्ही हात डोक्यावर ठेवून हाताशपणे म्हणाली, “अरे हे काय चाललंय! ती बाबांवर जोरात ओरडली, “अहो, तुम्ही गाणं काय म्हणता. साक्षीकडे बघा आधी. ती वेड लागल्यासारखं गाणं म्हणतेय. आणि आता तुम्हीसुद्धा! अरे देवा! आता तूच वाचव यातून मला” असं म्हणून आई मटकन खुर्चीत बसली. तसे साक्षी आणि बाबा तिच्याकडे बघून हसू लागले. आता मात्र वेड साक्षीला लागलंय की, आपल्याला हेच आईला कळेना. तिने चटकन फॅमिली डॉक्टरांना फोन केला आणि घाबरत घाबरतच म्हणाली डॉक्टर, डॉक्टर आज साक्षीचा भूमितीचा पेपर आहे. पण ती अभ्यास सोडून गाणं म्हणतेय. मधेच खो-खो हसते. तिच्या बाबांना बोलावलं, तर तेही गाणं म्हणत आहेत. डॉक्टर लवकर घरी या. मला फार भीती वाटते आहे. एक तर आज भूमितीचा पेपर आणि तुम्हाला तर माहीत आहे ना डॉक्टर, भूमिती किती अवघड आहे ते! साक्षी आणि तिचे बाबा दोघेही भुताने झपाटल्यासारखं करतायेत. डॉक्टर प्लीज लवकर या.”

अर्ध्या तासातच डॉक्टर आले. तोपर्यंत साक्षी टेबलावर पुस्तकांच्या गराड्यात डोकं टेकवून झोपली होती. बाबा सोप्यावर निवांतपणे पेपर वाचत बसले होते. बेल वाजली तशी आई दरवाजाकडे धावली. तिने दरवाजा उघडला आणि डॉक्टरांना घरात न घेताच घाबरलेल्या आवाजात सांगू लागली. “डॉक्टर बघा ना, माझ्या साक्षीला वेड लागलंय. आज भूमितीचा पेपर व ती गाणं म्हणतेय. वेड्यासारखं खो-खो हसतेय. आता तिचे बाबादेखील तिला सामील झालेत.” आईला बोलता बोलता धाप लागली. चेेहरा घामाने डबडबला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करून डॉक्टरसुद्धा गाणं म्हणू लागले.
किती किती अवघड असतो
भूमितीचा पेपर
कोण शिकवेल कसा करावा
सूत्रांचा त्या वापर

आता डॉक्टरांच्या सुरात साक्षी आणि बाबांनीदेखील आपला सूर मिसळला. हे विचित्र दृश्य बघून आईचं सारं अवसानच गळून पडलं. तिने आपलं डोकं गच्च पकडलं. तिचा तोल जाऊन ती खाली पडणार, हे पाहताच बाबांनी तिला धरलं आणि सोप्यावर झोपवलं. डॉक्टरांनी घाईघाईने तिला एक इंजेक्शन दिलं. नंतर मात्र आई गाढ झोपी गेली किती तरी वेळ!

रात्री ८ वाजता आई शुद्धीवर आली. तेव्हा साक्षी तिच्या शेजारीच बसली होती. बाबा हाताची घडी घालून समोरच उभे होते. दोघांना पाहताच आई म्हणाली, “अगं साक्षी, मी कुठे आहे गं?” “काही नाही गं आई, तुला थोडी चक्कर आली होती सकाळी, म्हणून हॉस्पिटलमध्ये आणले तुला. आता तू बरी आहेस. घरी गेलं तरी चालेल असं डॉक्टर काका म्हणालेत.” आई कशीबशी उठून बसली. साक्षीनेच तिला आधारासाठी हात दिला. आई म्हणाली, “साक्षी आज भूमितीचा पेपर होता ना? कसा गेला तुला पेपर?” साक्षी हसत हसत प्रसन्न चेहऱ्याने म्हणाली, “अगं आई एकदम सोप्पा! माझा अभ्यास झालाय हे मी सकाळीच सांगितलं होतं ना तुला!”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -