Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वम्हाडा राज्यभरात बांधणार तब्बल १२ हजार ७२४ घरे

म्हाडा राज्यभरात बांधणार तब्बल १२ हजार ७२४ घरे

मुंबईत २ हजार १५२ घरे बांधण्याचे प्रस्तावित

म्हाडा अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मान्यता

मुंबई ( प्रतिनिधी ): महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पाला म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात प्राधिकरणाच्या मुंबई, पुणे, कोंकण, नाशिक, नागपूर,औरंगाबाद,अमरावती या प्रादेशिक मंडळांतर्फे १२ हजार ७२४ घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ५८००.१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात २ हजार १५२ घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ३६६४.१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

म्हाडा प्राधिकरणाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये म्हाडा प्राधिकरणाचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. प्राधिकरणाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प १०१८६.७३ कोटी रुपयांचा तर २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प ६९३३.८२ कोटी रुपयांचा आहे. यामध्ये २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात शून्य तूट तर सन २०२२-२३ च्या सुधारित अर्थसंकल्पात ११३६.४७ कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. म्हाडाने राज्यभरात घरे बांधण्यासाठी भरीव तरतूद केली असून इतर प्रकल्पांसाठीही मोठी तरतूद केली आहे.

मुंबई मंडळाने बीडीडी चाळींचा पुनर्विकास योजनेसाठी २२८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच अँटॉप हिल वडाळा येथील गृहनिर्माण योजनेसाठी २४ कोटी रुपये, बॉम्बे डाईंग मिल वडाळा योजनेसाठी ३० कोटी रुपये, कोपरी पवई येथील गृहनिर्माण योजनेसाठी १०० कोटी रुपये, कन्नमवार नगर विक्रोळी येथील योजनेसाठी २१३.२३ कोटी रुपये, मागाठाणे बोरिवली येथील योजनेसाठी ५० कोटी रुपये, खडकपाडा दिंडोशी येथील गृहनिर्माण योजनेसाठी १८ कोटी रुपये, पहाडी गोरेगाव येथील गृहनिर्माण योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. गोरेगांव सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपये, धारावी पुनर्विकास प्रकल्प टप्पा १ ब साठी ५९ कोटी रुपये, गोरेगांव मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी १० कोटी रुपये, पोलिस गृहनिर्माण प्रकल्प वसाहतीच्या पुनर्विकासासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कोकण मंडळ ५ हजार ६१४ घरे बांधणार

कोंकण मंडळाअंतर्गत ५ हजार ६१४ घरांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी अर्थसंकल्पात ७४१.३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंडळांतर्गतच्या विरार बोळींज गृहनिर्माण प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात १० कोटी रुपये, बाळकुम ठाणे गृहनिर्माण प्रकल्पासाठी ३३ कोटी रुपये, माजिवाडे ठाणे संयुक्त भागीदारी प्रकल्पासाठी ३५ कोटी रुपये, मिरारोड टर्न की प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

पुणे मंडळ ८६२ घरे बांधणार

पुणे मंडळाअंतर्गत ८६२ घरांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ५४०.७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नागपूर मध्ये १ हजार ४१७ घरे

नागपूर मंडळाअंतर्गत १४१७ सदनिकांचे बांधकाम प्रस्तावित

नागपूर मंडळाअंतर्गत १४१७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ४१७.५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

औरंगाबाद मंडळ १ हजार ४९७ घरे उभारणार

औरंगाबाद मंडळाअंतर्गत १४९७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात २१२.०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये ७४९ घरे

नाशिक मंडळाअंतर्गत ७४९ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ७७.३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अमरावतीमध्ये ४३३ घरे

अमरावती मंडळाअंतर्गत ४३३ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १४६.२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -