Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजकावळा फक्त बाईलाच का शिवतो?

कावळा फक्त बाईलाच का शिवतो?

  • मुक्तहस्त: अश्विनी पारकर

दैनिक प्रहारमध्ये नुकतीच एक सुंदर बातमी येऊन गेली. विषय होता रक्तदानानिमित्त केल्या गेलेल्या महिलांच्या सत्काराचा. मुंबईतील एका संस्थेने रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी रक्तदान करणाऱ्या १०१ महिलांचा सत्कार केला. या बातमीच्या निमित्ताने महिलांच्या मनात रक्तदानाविषयी असलेली भीती कमी होईल, अशी आशा आहे. रक्तदान करताना महिलांच्या मनात सर्वात पहिली भीती असते ती त्यांना येणाऱ्या मासिक पाळीची. मासिक पाळीतून होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे महिलांच्या शरारीरातील रक्त कमी होते. त्यामुळे रक्तदान केल्यास माझ्या शरीरातील रक्त कमी होईल, असा गैरसमज महिलांमध्ये असतो. मासिक पाळीचे पाच दिवस सोडून तुम्ही रक्तदान करू शकता, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे रक्तदानासारखे अनमोल दान करण्यासाठी महिलांनी अजिबात मागे हटू नये. ही केवळ एकच गैरसमजूत नव्हे, एकंदरितच मासिक पाळी हा विषय म्हटला की, अगणित गैरसमजुती या विषयाला जखडलेल्या आहेत. या गैरसमजुतींना जबाबदार आहे, त्या अनादी कालापासून मासिक पाळीविषयी सुरू असलेल्या रूढी. अगदी आजच्या काळातही या रूढींचे पारंपरिक स्वरूप बदललेले दिसते, पण त्या अस्तित्वात आहेतच.

काहीच दिवसांपूर्वी सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या पुण्यात अघोरी आणि हिडीस प्रकार घडला. जादूटोण्यासाठी सासरच्याच लोकांनी सुनेचे हातपाय बांधून तिच्या मासिक पाळीचे रक्त काढून घेतले. हा प्रकार गेली दहा वर्षं सुरू होता. जेव्हा तिने पोलिसांकडे तक्रार देण्याची हिम्मत दाखवली तेव्हा हा प्रकार समोर आला. इंद्राने केलेल्या ब्रह्महत्येच्या पापाची शिक्षा महिला इतक्या किळसवाण्या प्रकारांची हद्द होईपर्यंत का भोगत आहेत, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो.

तथाकथित पौरणिक कथेनुसार इंद्राने ब्रह्महत्येचे पाप केल्यानंतर त्याने झाडे, पाणी, जमीन आणि स्त्रियांना या पापाचा एक-एक भाग वाटून घेण्यास सांगितले. त्या बदल्यात इंद्रानेही प्रत्येकाला वरदान दिले. यात स्त्रीला मासिक धर्माचे वरदान मिळाले. पण, इंद्राचे पाप माथी घेतले त्यामुळे मासिक धर्माचे वरदान मिळूनही स्त्रिया मासिक पाळीच्या दिवसांत गुरूच्या म्हणजेच देवाच्या मंदिरात जाऊ शकत नाहीत, अशी या कथेप्रमाणे असलेली समजूत आहे.

स्त्रियांना मासिक पाळी कशी आली? याच्या अनेक रंजक पौराणिक कथा आहेत. पण, निर्सग आणि विज्ञान सांगते की, ज्यावेळी स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरूपात बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्राव होतो. यालाच मासिक पाळी म्हणतात. आता मासिक पाळीची इतकी सोपी व्याख्या असताना जो मासिक पाळीच्या नावाने अंधश्रद्धेचा जो डोंगर उभा केला आहे तो डोंगर पोखरण्याची नव्हे तर डायनामायीट लावून उडवण्याची गरज आहे.

मी कोकणातली आणि कोकणात शिवाशीवी या प्रकाराची गंमत आणि त्याचे किस्से न संपणारे आहेत. बाईला मासिक पाळी आली की कोकणात म्हणतात, ‘कावळा शिवला’! माझी आई माझ्या लहानपणी घराबाहेर अंगणात कोपऱ्यात बसलेली दिसली आणि मी जवळ गेली की ती म्हणायची, मला कावळा शिवलाय, जवळ येऊ नकोस. मी कल्पना करायचे की कावळा उडत-उडत आला आणि आईला चोच मारून निघून गेला. पण त्याने माझ्या आईलाच का चोच मारली. माझे बाबा, आजोबा, आजी, माझी भावंड इतकी जणं ओसरीवर येतात. अंगणात येतात. त्याला दुसरं कोणी भेटलं नाही का? माझी आईच का भेटली? आणि चला मारली त्या कावळ्याने चोच तिला तर मी हिला का हात लावायचा नाही? असे अनेक प्रश्न त्यावेळी माझ्या बालमनाला पडत. पुढे मी वयात आल्यावर मला समजले की, कावळा फक्त बाईलाच का शिवतो.

असाच आणखी एक किस्सा, एकेदिवशी आत्येच्या गावी गेले असताना खेकड्यांचं मस्त कालवण होतं. पण त्याच दिवशी माझं पोट बिघडलं. आत्याला म्हटलं, काही झालं तरी माझ्यासाठी खेकडे उरलेच पाहिजेत. मी उद्या खाईन. आत्याने माझ्यासाठी टोपात खेकडे आणि त्याचं कालवण काढून ठेवलं. पण दुसऱ्या दिवशी कालवण खराब झालं अन् घरात ही बोंबाबोंब झाली. काय? तर माझ्या गावातील वहिनीने शिवाशिवीची असताना रात्री सगळे झोपेत असल्याचे बघून खेकड्याच्या टोपाला हात लावला. त्यावेळी फ्रीज नव्हता आणि आत्या कालवण पाण्याच्या परातीत ठेवायचं विसरलेली, ही चूक आत्याने स्वत:हून सांगूनही कोणी मान्य करायला तयार नव्हतं.

मासिक पाळीत लोणचं खाल्लं तर लोणचं खराब होतं. मासिक पाळीत देवाची पूजा केली तर देव भ्रष्ट होतो. मासिक पाळीत मंदिरात गेलात मंदिर भ्रष्ट होतं. मासिक पाळीत दही खाल्ले तर पुढे मासिक पाळीच येणार नाही आणि गर्भधारणा होणार नाही. मासिक पाळीत झाडाला हात लावला तर झाड मरतं म्हणून वृक्षारोपण करायचं नाही. मासिक पाळीत इतर कोणाला शिवायचं नाही, कारणं तेही भ्रष्ट होतात. मासिक पाळीत लग्नाला जायचं नाही कारणं लग्न मोडतं (स्वत:चं की दुसऱ्याचं ते माहीत नाही), मासिक पाळीत अमुक एका रस्त्याने, अमुक एका जागेवर जायचं नाही कारण तेथे अतृप्त आत्म्यांचा वास असतो आणि त्या तुम्हाला झपाटू शकतात. मासिक पाळीत घरातल्या भांड्यांना हात लावला तर ती अशुद्ध होतात. इतकंच कशाला मासिक पाळीत जगाला शुद्ध करणाऱ्या पाण्याला हात लावला तर ते पाणीही अशुद्ध होतं.

आता मला या प्रश्नांची उत्तर द्या. मासिक पाळी दरम्यान ब्रँडेड लोणचं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये महिलांना सुट्टी मिळते का? त्यांनी त्या काळात बनवलेलं लोणचं बाटलीत सिलपॅक करून घरी आल्यावर तुम्ही ते खाता का? मासिक पाळी असताना समजा अभिनेत्रीने अमुक लोणचं तुमचा आवडता टेस्ट पार्टनर अशी जाहिरात केली, तर तुम्ही ते लोणचं खात नाही का? रोज जंगलांना वणवे लावले जातात. हजारो वृक्षांची कत्तल केली जाते त्याएेवजी मासिक पाळी असणाऱ्या महिलांचा ग्रुप करून त्यांना झाडांना जाऊन हात लावायला सांगण्याची कल्पना तुम्हाला कशी वाटते? मासिक पाळी दरम्यान महिलेचा स्पर्श होऊ नये म्हणून आंबटशौकिन गर्दीत महिलांना धक्का मारण्याचे टाळतात का? मासिक पाळी दरम्यान एखाद्या महिलेने लग्नाला हजेरी लावली आणि समजा पुढे त्या जोडप्याचा घटस्फोट व्हायचा असेल तर घटस्फोटाच्या खटल्यात न्यायालयात हे कारण ग्राह्य धरले जाते का? मासिक पाळीमुळे भूत झपाटत असेल, तर एखादी बलात्कार पीडिता भुताने झपाटल्यामुळे भुतानेच त्या गुन्हेगाराला यमसदनी पाठवले असे म्हणू शकते का? मासिक पाळी दरम्यान भांडी, पाणी भ्रष्ट होत असेल, तर त्या दिवसांसाठी घरातील कामवाल्या बाईला हक्काची सुट्टी मिळायला नको का? (स्पेनमध्ये मात्र मासिक पाळीदरम्यान महिलांना आराम मिळावा म्हणून सुट्टी दिलेली आहे). शेवटचा प्रश्न म्हणजे ज्या देवाची तुम्ही पूजा करता, ज्याला तुम्ही सृष्टीचा, निर्सगाचा निर्माणकर्ता समजता त्याने निर्माण केलेल्या निर्सगाच्या देणगीलाच तुम्ही भ्रष्ट समजता का?

मासिक पाळीविषयी गैरसमजुतींची सुरुवात मुलीच्या वयात येण्यापासून होते. तेव्हा तिच्यासोबत असते तिची आई. ती या रूढींना किती भीक घालते यावर त्या मुलीचं मासिक पाळीदरम्यानचं आणि त्यानंतरचंही निकोप आयुष्य अवलंबून आहे. त्यामुळे आयांनो बाईला पाळी आली तर पहिलं, तिला मला पाळी आली, असं म्हणायला शिकवा. माझा बर्थडे झाला, मला प्रॉब्लेम आहे, मला कावळा शिवलाय हे शब्द तुमच्या डिक्शनरीतून तिच्या डिक्शनरीत येऊ देऊ नका. सुरुवात इथून झाली तरी पुरे! पुढे तिला पीसीओडीचा सामना तिला करावा लागू नये म्हणून त्यासाठी काय काळजी घ्यावी लागते, या विषयी माहिती घ्या आणि तिला द्या. कारण, पाळीचा संबंध तुमच्या आरोग्याशी आहे ती तुम्हाला मातृत्वाचा अधिकार देते लज्जा नव्हे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -