Saturday, May 18, 2024

अर्थहीन

डॉ. मिलिंद घारपुरे

सकाळी सकाळी ऑफिस बॅगेची चेन खराब. सहा महिन्यांपूर्वी घेतलेली. वैतागत शोधत निघालो. एकही दिसेना. शेवटी सापडला एकदाचा.

छोट्या खोपटात एक दुकान. मशीनवर फाटकी बॅग शिवत असलेला आणि तितकाच फाटका दिसणारा ढीगाऱ्यात लपलेला माणूस. बॅग दाखवली. आता तीन-चारशेला तरी फटका. मी मनातल्या मनात… “चेन खराब झालीय जरा बदलता का?” मी.

चेन बघत… “साहेब कशाला बदलता, चांगली आहे. फक्त पिन खराब आहे, बसा दहा मिनिटं” तो.

“किती झाले”
“पंचवीस”

तीन-चारशे रुपये खर्च करायची मानसिक तयारी झालेली अडचणीतला मी, ते पंचवीस रुपये देताना उगाचच चुकल्याचुकल्यासारखं वाटलं.

दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ. एका ठिकाणी व्हिजिट. फक्त दहा मिनिटांचे काम. परत आलो, कारला भला मोठा जॅमर. ‘हट साला!’ नो पार्किंग न बघता गाडी लावलेली…

आरटीओ आता एकदम प्रोफेशनल. कार हँडलमध्ये छान फोन नंबर, नाव टाइप केलेली चिट. फोन केला. पांढऱ्या खाकी कपड्यातले ट्रॅफिक हवालदार साहेब. काय शिकले-सवरलेले माणसं तुम्ही, बोर्ड बघत नाही का? वगैरे चार शब्द मुकाटपणे ऐकले. आता पाचशे रुपयाला तरी नक्की फटका. बघू दोन एकशेमध्ये ऐकतोय का?? मी मनातल्या मनात.त्याने बिल पावती काढली. बोलता-बोलता त्याला कळलं मी डॉक्टर आहे.

“किती झाले”… मी.

“तसे तीनशे होतात साहेब. पण राहू द्या. एखाद्या पेशंटला तेवढी औषधे कमी द्या आणि जरा बोर्ड बघून गाडी लावा”…. आणि तो गेला.

परत एकदा तेच फिलिंग, चूकल्याचुकल्यासारखं…

अखिल जगतात, कोणताही आणि कोणाचाही अर्थार्जनाचा व्यवसाय हा एक तर तुमची अडचण, समस्या सोडवणारा असतो किंवा तुमच्या शारीरिक मानसिक गरजेची पूर्तता तरी करणारा असतो. (टाटा, बिर्ला, अंबानींपासून कोपऱ्यावरच्या शहाळे, चहावाल्यापर्यंत) समोरच्याची समस्या, गरज हेच आपल्या कमाईचे साधन समजून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांच्या या जगात, असे “अर्थहीन” अनुभव अमूल्यच!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -