Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमराठवाडा ‘वंदे भारत’च्या प्रतीक्षेत...

मराठवाडा ‘वंदे भारत’च्या प्रतीक्षेत…

मराठवाडा वार्तापत्र : डॉ. अभयकुमार दांडगे

जून व तत्पूर्वी दीड महिना हा सुट्टीचा कालावधी तसेच लग्नसराई व धामधुमीचा काळ असतो. त्यामुळे अनेक जण या सुट्टीचा चांगलाच फायदा घेत देवदर्शन, सहली याचे बेत आखत असतात. सध्या सुट्टीचे दिवस संपत आलेले आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या सुट्ट्या असल्यामुळे अनेक जण यादरम्यान घरात कमी काळ व बाहेरच जास्त असतात. प्रवास म्हटले की, त्यासाठी अनेक सुविधा व दळणवळणाची साधने आहेत. प्रवासासाठी स्वतःचे वाहन, एसटी बस, खासगी प्रवासी बस व रेल्वेचा प्रवास याला पसंती दिली जाते; परंतु या सर्व साधनांपैकी अनेक जण रेल्वे प्रवासाला पसंती देतात. मध्यमवर्गीय कुटुंबीयांना आर्थिक दृष्टीने परवडेल असा रेल्वेचा प्रवास असल्यामुळे तसेच सुरक्षित व जास्त सोयीचा प्रवास म्हणून रेल्वेचा आधार घ्यावा लागतो; परंतु गेल्या दीड – दोन महिन्यांपासून मराठवाड्यातील रेल्वे सेवा पूर्णतः विस्कळीत झालेली पाहावयास मिळत आहे. मराठवाड्यातून नांदेड ते मुंबई अशी वंदे भारत सेवा सुरू करण्याचे रेल्वे राज्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या रेल्वे मार्गांवर विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी जोर दिला जात आहे. हे काम कधी पूर्ण होईल याचा निश्चित कालावधी नाही. तरीही भविष्यात मराठवाड्याला वंदे भारत मिळणार याचा आनंद या भागातील जनतेला आहे.

 

सध्याला मराठवाड्यातील रेल्वेमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न खूप मोठा झाला आहे. रेल्वेच्या प्रत्येक डब्यात दररोजच चोरीचे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे साध्या डब्यातच नव्हे तर एसीच्या डब्यातही चोरांची पावले बिनदिक्कतपणे वावरत आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत रेल्वेची सुविधा आहे. या सर्वच रेल्वे स्थानकांवर सुट्ट्यांच्या काळात चोऱ्यांचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहेत. मराठवाड्यातील काही जिल्हे दक्षिण मध्य रेल्वे तसेच काही भाग मध्य रेल्वे या अंतर्गत येतो. मराठवाड्यातून सुटणाऱ्या व या भागात येणाऱ्या सर्वच रेल्वे खोळंबलेल्या अवस्थेत सेवा देत आहेत. कुठल्याही रेल्वेची वेळ तंतोतंत पाळली जात नसल्याने रेल्वे स्थानकावर तसेच अन्यत्र प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. रेल्वे स्थानकावर प्रवासी वर्ग तसेच चौकशी कक्ष या ठिकाणी दररोजच जोरजोरात बोलणे, एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. मराठवाड्याच्या शेजारी असलेल्या तेलंगणाची राजधानी सिकंदराबाद या ठिकाणाहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेला दररोजच दोन ते तीन तासांचा उशीर होत आहे. रेल्वेची अशीच अवस्था पुण्याला जाणाऱ्या मार्गाच्या बाबतीतही होत आहे. या प्रकारामुळे अचानक रेल्वेचे प्लॅटफॉर्म बदलण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर येत आहे. महिला, लहान मुले व वृद्ध नागरिकांना यामुळे खूप त्रास होत आहे.

 

मराठवाड्यातून मुंबई, पुणे, नाशिक याचबरोबर सुरत, बेंगलोर, कन्याकुमारी, जम्मू-काश्मीर, नवी दिल्ली या मोठ्या शहरांना जोडणारी रेल्वे सेवा आहे. या शहरात मराठवाड्यातून जाण्यासाठी सध्या रेल्वेची तिकिटे देखील उपलब्ध नाहीत एवढी बुकिंग झालेली आहे. नेमके याच सुट्ट्यांच्या काळात शासनातर्फे अनेक विभागातर्फे नोकरीसाठी मुलाखती आयोजित केलेल्या आहेत. त्याचबरोबर आयटी क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्या व खासगी संस्थांनी देखील या सुट्ट्यांच्या काळात मुलाखती आयोजित केलेल्या आहेत; परंतु मराठवाड्यातून ये-जा करणाऱ्या तसेच मराठवाड्यातून सुटणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकाचा ताळमेळ बिघडल्याने अनेक तरुणांना रोजगारापासून मुकावे लागत आहे. रेल्वे तासनतास उशिराने सुटत असल्याने अनेक तरुणांचे तसेच प्रवाशांचे बेहाल होत आहेत. रविवारी दुपारी ४ वाजता नांदेडहून हैदराबाद मार्गे विशाखापटणमकडे जाणारी रेल्वे रात्री ९ वाजेपर्यंत नांदेड स्थानकावरूनच सुटली नव्हती. ज्या वेळेला ती रेल्वे तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर असायला हवी तेव्हा ती गाडी नांदेड स्थानकावरच उभी होती. त्या रेल्वेने अनेक प्रवाशांना हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठायचे होते; परंतु सदरील रेल्वे पाच ते साडेपाच तास उशिराने सुटल्यामुळे परदेशात जाणाऱ्या अनेक कुटुंबीयांचे हाल झाले. रेल्वे स्थानकावरील चौकशी कक्षात याबाबत विचारणा करणाऱ्या प्रवाशांची प्रतीक्षेची सीमा संपल्याने अक्षरशः सीआरपीएफला त्या ठिकाणी पाचारण करण्याची वेळ आली होती. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड डिव्हिजन अंतर्गत दररोज किमान १५० रेल्वे गाड्यांची ये – जा सुरू असते. यापैकी ८० टक्के गाड्यांचे रेल्वेचे वेळापत्रक खोळंबले आहे. केंद्राचे रेल्वे राज्यमंत्री हे मराठवाड्यातील जालना जिल्ह्याचे आहेत. त्यांनी अशा प्रकाराकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. रेल्वे काही मिनिटे किंवा एखादा तास उशिरा असेल, तर प्रवास करणारा प्रवासी गोंधळून जातो; परंतु दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड डिव्हिजन अंतर्गत सर्वच रेल्वे गाड्या किमान दोन ते तीन तास उशिराने ये – जा करीत असल्याने हा काय प्रकार सुरू आहे, असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

 

एकीकडे रेल्वे राज्यमंत्री मराठवाड्यातील नांदेड येथून मुंबईसाठी वंदे भारत रेल्वे सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण कधी पूर्ण होईल हे सध्याच्या घडीला तर सांगता येत नाही. साध्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक दुरुस्त करून त्याचा ताळमेळ बसविण्यासाठी रेल्वे खात्यातील अधिकाऱ्यांची अडचण होत असताना ही मंडळी खरोखरच वंदे भारत रेल्वे मराठवाड्यात सुरू करू शकतील का, असा प्रश्न लाखो प्रवाशांना पडला आहे. मराठवाड्यातील रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झालेले नसताना वंदे भारतचे स्वप्न मराठवाड्यातील प्रवाशांना का दाखविले जात आहे? असाही प्रतिप्रश्न उपस्थित होत आहे .

abhaydandage@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -