Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमराठवाडा जलसंकटाच्या उंबरठ्यावर...

मराठवाडा जलसंकटाच्या उंबरठ्यावर…

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे

सध्या जानेवारी महिना असला तरी मराठवाडावासीयांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मराठवाड्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे, त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. मराठवाड्यात यंदा म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही. मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली नव्हती, त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरेल की नाही याबाबत शंकाच होती व तसेच चित्र आजघडीला दिसून येत आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.

लातूर जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठ्याची एकूण क्षमता १३९ दलघमी आहे. त्यात आजघडीला अवघा ९८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. मृतसाठ्यातीलही ५१ दलघमी पाणी उपसा झाला असल्याने जिल्ह्यात मार्चपासून भीषण पाणीटंचाई जाणविण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून आताच टंचाई निवारण आराखडा तयार करण्यासह ठोस उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर्षी लातूर तसेच बीड व धाराशिव जिल्ह्यांमध्ये जेमतेमच पाऊस झाला, त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांतील प्रकल्पांमधील पाणीसाठा आता अत्यल्प झाला आहे. लातूर जिल्ह्यात २ मोठे, तर ८ मध्यम व १३४ लघु, असे एकूण १४४ प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची क्षमता ८४४.६५१ दलघमी एवढी आहे. त्यातील मृतसाठ्याची क्षमता १३९.६५१ दलघमी एवढी आहे.

लातूर जिल्ह्यात आजघडीला एकूण १२९.५२३ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. मृतसाठ्यातील ९८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात प्रकल्पांमध्ये अत्यल्प साठा शिल्लक आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात सध्या ३२.७४२ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. याची टक्केवारी अवघी १८.५० आहे. या प्रकल्पावर अनेक शहरे तसेच शेकडो गावांतील पाणीयोजना अवलंबून असल्याने यातील पाणी झपाट्याने कमी होत आहे.

लातूर जिल्ह्यात असलेल्या तावरजा, व्हटी व तिरू या तीन प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. हे प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत, तर मसलगा प्रकल्पात मात्र अद्यापही ४३.२९% पाणीसाठा शिल्लक आहे. लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यांची तहान भागविणाऱ्या धरणांमध्ये अवघा १६ टक्के साठा शिल्लक आहे. भूगर्भाची पाणीपातळी खालावलेली असल्याने मागील सात वर्षांनंतर पाणीपातळीने जानेवारी महिन्यात तळ गाठला आहे. यामुळे मार्च महिन्यानंतर पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात यापूर्वी रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली होती. पुन्हा रेल्वेने पाणी आणण्याची वेळ येऊ नये, यासाठी जानेवारी महिन्यापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे वाटत आहे.

नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सध्या ६६% पाणीसाठा शिल्लक आहे. नांदेड जिल्ह्यातील मानार प्रकल्पात ७७.२४ दलघमी, विष्णुपुरी प्रकल्पात ६३.२४ दलघमी, मध्यम प्रकल्पात ६८.१९ दलघमी, उच्च पातळी बंधाऱ्यात १३९.७७ दलघमी, लघू प्रकल्पात १२८.२१ दलघमी, तर कोल्हापुरी बंधाऱ्यात ४.३१ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी नांदेड जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ७४.६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता; परंतु यंदा पाण्याच्या पातळीने तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याने येणाऱ्या उन्हाळ्यात नांदेड जिल्ह्यातही तीव्र पाणीटंचाई भासणार आहे.

जायकवाडी प्रकल्पाची सिंचन क्षमता १८ लाख ३ हजार ३२२ हेक्टर आहे. सद्यस्थितीत तेथे ३२.६८७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी ६.५१६ टीएमसी पाणी औद्योगिक वापरासाठी राखीव आहे, तर १५.५ टीएमसी पाणी रब्बी पिकाच्या आवर्तनासाठी वापरता येणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी जायकवाडी धरणात नियंत्रित स्फोट म्हणजेच ब्लास्टिंग करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सहा मीटर खोलीपर्यंत ब्लास्टिंग करावे लागणार असून, त्यासाठी किमान एक महिन्याचा अवधी लागणार आहे. ब्लास्टिंग सुरू झाल्यामुळे जॅकवेलच्या कामातील अडथळा दूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. जॅकवेलसाठी जायकवाडी धरणात १९ मीटरपर्यंत खोदकाम केले जाणार आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत छत्रपती संभाजीनगरवासीयांची पाण्याची समस्या बऱ्याच अंशी कमी होणार आहे.

बीड जिल्ह्यातील २१ तलाव जानेवारी महिन्यातच कोरडे पडले आहेत, तर ६० प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. गेल्या दोन वर्षांत बीड जिल्ह्यात शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला; परंतु गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे दीडशेच्या जवळपास सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. यंदा सुरुवातीला पावसाने हजेरी लावली मात्र निम्मा पावसाळा कोरडा गेल्याने बीड जिल्ह्यात यावर्षी नदी-नाले भरून वाहिलेच नाहीत. बीड जिल्ह्यात सध्या केवळ १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर २७ प्रकल्पांत २५ टक्क्यांहून कमी पाणी शिल्लक आहे. त्याचप्रमाणे १८ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत पाणी आहे. बीड जिल्ह्यातील २६ प्रकल्पांत ५०% हून अधिक पाणी आहे, तर १४ तलावात ७५% हून अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. बीड जिल्ह्यातील लहान, मध्यम आणि मोठे असे १६६ सिंचन प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता ९७५ दलघमी आहे. त्या तुलनेत सध्या उपयुक्त पाणीसाठा १४५ दलघमी, तर मृतसाठा १९३ दलघमी शिल्लक आहे. बीड जिल्ह्यातील १४४ सिंचन प्रकल्प तळाशी गेल्याने पाणीटंचाई भीषण होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात अगोदरच दुष्काळ, अतिवृष्टी आणि सततच्या नापिकीमुळे गंभीर परिस्थिती असते. वर्षभरात मराठवाड्यात एक हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची नोंद शासनदरबारी आहे. मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जानेवारी ते मे या काळातही अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे शिल्लक राहिलेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नसल्याने विविध कारणाने कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग निवडावा लागला. यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक २६९, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जालना जिल्ह्यातील ७४, परभणी जिल्ह्यातील १०३, हिंगोली जिल्ह्यातील ४२, नांदेड जिल्ह्यातील १७५, तर लातूरमधील ७२ व धाराशिवमधील १७१ अशा एकूण मराठवाड्यातील १०८८ शेतकऱ्यांनी वर्षभरात विविध कारणांनी आत्महत्या केली. मराठवाड्यात अशी परिस्थिती असल्याकारणाने याकडे सिंचनाच्या बाबतीत लक्ष देणे गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -