Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सMarathi Natak : कोट्यधीशांचा विपर्यासी विनोद ‘राजू बन गया झंटलमन...!’

Marathi Natak : कोट्यधीशांचा विपर्यासी विनोद ‘राजू बन गया झंटलमन…!’

  • पाचवा वेद : भालचंद्र कुबल

पारंपरिक दिवाणखानी नाटकांचा मराठी प्रेक्षकांवर इतका पगडा आहे की, आजही अशा नाटकांना मरण नाही. पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, जयवंत दळवी, शं. ना. नवरे आदी सिद्धहस्त नाटककारांनी दिवाणखानी नाटकांची सवय मराठी प्रेक्षकांना लावली आणि ती डिमांड आजतागायत सुरू आहे. यात चुकीचे असे काहीच नाही. कारण दोन घटका विरंगुळा आणि मनोरंजन जर अपेक्षित असेल, तर निर्मात्यांनाही अशी नाटके काढण्यावाचून गत्यंतर नसते. अशाच पठडीतले नाटक या महिन्यात रंगभूमीवर आले आहे. कविता कोठारी निर्मित ‘राजू बन गया झंटलमन’ असे कॅची नाव असलेले नाटक बघताना ७५ ते ९० च्या काळातल्या दिवाणखानी नाटकांची आठवण होते.

कविता कोठारी या खरं तर एक धाडसी निर्मात्या आहेत कारण अत्यंत वेगळ्या विषयांवरची नाटके त्यानी आजवर मराठी रंगभूमीला दिली आहेत. “प्रपोजल”पासून “चर्चा तर होणारच”सारखी वेगळ्या वळणाच्या नाटकांची दखल मराठी रंगभूमीच्या अभ्यासकांनी या आधीच घेतलेली आहे. साधारणपणे असेच काहिसे वेगळे नाटक बघायला मिळेल अशी अपेक्षा ठेऊन गेल्यास मात्र थोडी निराशा पदरी पडते. मात्र ‘राजू बन गया…’ बघितल्यावर ती निराशा साफ दूर होते. या नाटकाची गंमत त्यातील लिखाणातही तेवढीच आहे. राजेश कोळंबकरानी शाब्दिक कोट्यांची पूर्ण नाटकात जी कसरत केली आहे, ती खरं तर आताच्या नाट्यसमीक्षकांना बिलकुल रुचणारी नाही. कारण या नाट्यभाषेला बबन प्रभू किंवा आत्माराम भेंडे यांनी लोकप्रिय केलेली प्रहसन प्रचुर भाषा असे संबोधण्यात आले आहे. तत्कालिक समीक्षकांनी यावर भरभरून टीका देखील करून झाली आहे. मात्र कालांतराने तीच भाषा टीव्ही मालिकांतील हास्यजत्रेसारख्या अतिलघुनाट्याचे प्रमुख अंग बनली व आजही त्या भाषेला, तरुणाईला, त्यांची भाषा वाटते. तेव्हा दिवाणखानी नाटकात प्रहसन प्रचुर कथानकावर बेतलेला हा एक उत्तम फार्स आहे, जो बऱ्याच कालांतराने बघायला मिळाला.

सुखात्मिका हा भारतीय रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय नाट्यप्रकार होय. भरतमूनींच्या सिद्धांतांपासून सुरू झालेली सुखात्मिकांची नाट्यपरंपरा आपल्या नसानसांत रुजली आहे. सुखात्मिका वा सुखांतिका बघायला कुणालाही आवडते. त्यातही जर ती रहस्यात्मक, उलटापलट किंवा विपर्यास घडवणारी कथाबीजाची असेल, तर हिट नाटकांच्या फाॅर्म्युलात गणली जाते. ही समीकरणे “राजू”ला देखील लागू पडतात. कोळंबकरानी हा फाॅर्म्युला अजून थोड्या पद्धतीने अभ्यासून लिहिला असता, तर अधिक गंमत साधता आली असती.

चंद्रकांत देशमुख नामक एक धनाढ्य आपल्या राजू नामक एकनिष्ठ नोकरासह जीवन व्यथित करत असताना लग्न करावे या उद्देशाने चिंगी नामक राजूच्या मामाच्या मुलीला बोलावल्यावर तिने रचलेल्या कटामुळे जे गोंधळनाट्य निर्माण होते, ते म्हणजे “राजू बन गया झंटलमन”. चंद्रकांत देशमुख, राजू, चिंगी, भय्या या चार जणांवर बेतलेले हे कथासूत्र आहे. हे कथासूत्र ना कौटुंबिक आहे, ना सामाजिक, ना रहस्यमयी, ना नाट्य (ब्लॅक काॅमेडी). आरंभापासून अंतापर्यंत प्रहसनाचे बोट धरून चालणारे हे नाटक काही प्रसंगात रहस्य अधोरेखित करतानाही गंभीर होत नाही. हेच या नाटकाचे वैशिष्ट्य आहे. राजूची भूमिका साकारणारे अंशुमन विचारे हे मराठी रंगभूमीवरील आघाडीचे विनोदी कलाकार म्हणून आपणास माहीत आहेतच. बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांची फँटसी आणि इप्टा या हिंदी एकांकिका स्पर्धेत गाजलेली सती हे दोन परफाॅर्मन्स कायमस्वरूपी लक्षात राहतील असे होते. या रंगकर्मींकडे प्रचंड टॅलेंट असून तो स्लॅपस्टिक काॅमेडीपासून ते भाषिक विनोदापर्यंतचे सर्व विनोदी प्रकार सहजगत्या पेश करू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले होते. पुढे हास्यजत्रा, फू बाई फू, काॅमेडीची बुलेट ट्रेनमुळे, तर अंशुमन विचारे अधोरेखित झाले. ही सर्व पार्श्वभूमी सांगण्याचे कारण एवढेच की, “राजू बन गया” हा द्विखांबी डोलारा आहे. उमेश जगताप आणि अंशुमन विचारे यांनी जी धमाल उडवून दिलीय त्याला तोड नाही. उमेश जगताप यांचा अॅटिट्युड विनोदी बाजाचा नाही; परंतु त्यांना विनोदासाठी प्रवृत्त करण्याची प्रक्रिया अंशुमन विचारे ज्या पद्धतीने पार पाडतात, ती बघण्यासारखी आहे. यात त्यांची शारीरिक आणि मानसिक दमछाक होत असणार यात शंकाच नाही. जगताप देखील विचारेंना योग्य तो रिस्पाॅन्स देत नाटक धावते ठेवतात. जगतापांनी साकारलेला मिल्ट्रीतल्या भावाची भूमिकाही चांगली रंगवलीय. स्टाईलाझेशनच्या नादात लेखक मात्र हे पात्र विकसित करू शकलेला नाही. कारण या देखील पात्राच्या तोंडी भरमसाट शाब्दिक कोट्यांची भरमार आहे. प्रत्येकाच्या तोंडी सततच्या शाब्दिक कोट्या ऐकल्यावर उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकताना जी आपली गत होते, तशीच या नाटकाबाबत होते. एखाद्या पात्राला शाब्दिक कोट्यांची सवय आहे या कारणादाखल आपण त्या भूमिकेला स्वीकारतो मात्र सर्वच पात्रे एकाच पद्धतीने बोलत राहिली, तर तो अतिरेकी किंवा विपर्यासी विनोद ठरतो. या विनोदाची अगदी थोडीच उदाहरणे मराठी रंगभूमीवर पाहायला मिळाली आहेत. थोडक्यात या नाटकास कोट्यधीशांचे नाटक म्हणायला हरकत नाही.

यात सहाय्यक भूमिका रंगवणारे विनम्र भाबळ आणि अमृता फडके अनुक्रमे भय्या आणि चिंगीच्या पात्रांसमावेत रंग भरताना दिसतात. प्रमुख पात्रांबरोबरच ही जोडी देखील प्रचंड एनर्जीने वावरताना जेव्हा आपण पाहतो, तेव्हा दिग्दर्शक प्रशांत विचारे यांचे देखील कौतुक करावेसे वाटते. विपर्यासी विनोदाचे प्रमुख लक्षण म्हणजे रंगमंचावरील पात्रांच्या हालचाली सतत धावत्या ठेवाव्या लागतात. सही रे सही हे याचे उत्तम उदाहरण मानले जाते. प्रशांत विचारे यानी तोच पॅटर्न “राजू”साठी वापरल्याचे लक्षात येईल.

संदेश बेंद्रे यांनी नेपथ्याद्वारे उभा केलेला दिवाणखाना नजरेत भरण्याजोगा आहे. अमोघ फडके यांची प्रकाश योजनाही उत्तमच आहे. विशेषतः उदय सबनीसांच्या निवेदनातून पात्रांची होणारी ओळख आणि त्यानुसार फ्रेमवरील पेटणारे शो लॅम्प्स प्रकाश योजनाकाराची कल्पकता दर्शवतात. नरेंद्र केरेकर आणि संदीप कांबळे यांनी केलेल्या सहाय्यक भूमिका देखील तेवढ्याच ताकदीच्या आहेत. संदीप कांबळे हा तरुण पिढीचा गीतकार म्हणूनही नावारूपास येत आहे. त्याने लिहिलेले एक गीतही सुश्राव्य झाले आहे. राहुल रानडे यांच्या संगीताची साथ या नाटकातील अनेक मुव्हमेंट्स अधोरेखित करतात. त्यामुळे निर्माती कल्पना विलास कोठारी यांनी निर्मिलेल्या या नाटकाची भट्टी जमून आलेली आपणास दिसून येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -