Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीManoj Jarange Patil : ज्या मागणीसाठी उठाव नव्हता ती मागणी मान्य केली!

Manoj Jarange Patil : ज्या मागणीसाठी उठाव नव्हता ती मागणी मान्य केली!

मनोज जरांगे अजूनही असमाधानीच! उद्या ठरवणार पुढील आंदोलनाची दिशा

जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर राज्य सरकारने (Maharashtra Government) आज विशेष अधिवेशन बोलावलं होतं. यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ केलं आहे. आज विधीमंडळात पास झालेल्या विधेयकानुसार मराठ्यांना नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये १० टक्के आरक्षण मिळणार आहे. पण आम्ही ही मागणी केलीच नसून सगेसोयऱ्यांच्या बाबतीत निर्णय व्हावा, असं मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलं आहे. सरकारच्या निर्णयाबाबत जरांगे अजूनही असमाधानीच असून ते उद्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.

सरकारने मराठा आरक्षणासंबंधीचा जीआर पास केल्यानंतर काही दिवसांतच म्हणजे १० फेब्रुवारीला जरांगेंनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. यानंतर सरकारने तात्काळ हालचाली करत विशेष अधिवेशन बोलावत आज अखेर मराठ्यांना आरक्षण देऊ केलं आहे. शिवाय हे आरक्षण कोर्टात टिकणारं असेल, अशी हमीही दिली आहे. मात्र, जरांगेंचं या निर्णयाने समाधान झालेलं नाही.

सगेसोयऱ्यांच्या बाबतीत निर्णय न झाल्याचं कारण देत जरांगेंनी उपचार घेणं थांबवलं आहे. त्यांची मुख्य मागणी ही स्वतंत्र आरक्षणाची नसून सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची आहे, असं ते म्हणाले. सरकारच्या या निर्णयाविरोधात त्यांनी उद्या आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक बोलावली आहे. मराठ्यांनी मोठ्या संख्येने बैठकीसाठी यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

जरांगे नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे म्हणाले की, आज मंजूर झालेला कायदा गोरगरीब मराठ्यांमुळे मंजूर झाला आहे. आम्ही या आरक्षणाची मागणी केलेलीच नाही. तरीही दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं नाही तर मराठ्यांच्या उद्रेकाला सरकारला सामोरं जावं लागेल. सगेसोयऱ्याच्या बाबतीत आज निर्णय घ्यायला पाहिजे होता. ज्या मागणीसाठी उठावच नव्हता ती मागणी मान्य केली आहे. ज्यांना आजच्या आरक्षणाची गरज होती त्यांच्यासाठी सरकारने निर्णय घेतला. त्यांना गोरगरीब मराठ्यांची गरज नाही, असंच यातून दिसून येत आहे, असं जरांगे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -