Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआंब्यांच्या गावात आंबाच हरवलाय...!

आंब्यांच्या गावात आंबाच हरवलाय…!

  • माझे कोकण : संतोष वायंगणकर

कडक उन्हाळा, पाऊस मध्येच गारवा अशा वातावरणामुळे फळांचा राजा मात्र हिरमुसला आहे. कोकणची अर्थव्यवस्था मासे, आंबा, काजू, कोकम यांवर अवलंबून असते. हे सगळं निसर्गावरतीच अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत निसर्गाची अनियमितता इतकी आहे की, सगळंच बेभरवशाचं झालेलं आहे. कशाचीही कुणाला खात्री देता येणारी नाही. कोरोना काळापासून आंबा विक्रीची एक नवी व्यवस्था तयार झाली. फार पूर्वी फक्त आंबा विक्री ही दलालांच्याच हातात होती. यामुळे कोकणातून जाणारा आंब्याचा दर दलाल ठरवतील तोच असायचा. दलालांकडून पाठवलेल्या आंब्याची किती पट्टी येईल हे काही ठरलेलं नसायचं. सगळा अर्थव्यवहार हा रुमालातून चालायचा. रुमालाखालच्या बोटांचा खेळ व्यावहारीदृष्टी कधीच शेतकऱ्यांचा विचार करून किंवा त्यांना न्याय देणारा नव्हती. जे काही होतं ते सगळं दलाल ठरवतील तोच दर ठरलेला असायचा. आंबा बागायतदार शेतकऱ्यांकडेही आंबा विक्रीची दुसरी कोणतीच व्यवस्था नव्हती. जेणेकरून आंबा दलालांच्या विळख्यातून शेतकरी बाहेर येईल. आंब्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचे जाळे निर्माण व्हायला हवे होते; परंतु तसे घडले नाही. प्रक्रिया उद्योगांकडे फारसे कोणी लक्षच घातले नाही.

शासकीय स्तरावरही आंबे, मासे हा फक्त त्यांच्या पानात असावा यासाठी त्यांचा आग्रहच राहिला; परंतु आंबा, मासे यांचे उद्योग उभे राहण्यासाठी शासकीय स्तरावर कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. सहकार क्षेत्रातूनही आंब्यासाठी काही केले गेले नाही. मात्र, ‘महामँगो’ संस्थेच्या निर्मितीतून प्रयत्न झाला. आंबा परदेशात पाठविण्याचा तो प्रयत्न झाला. या महामँगोसाठी सहकार क्षेत्रातील अग्रणी शिवरामभाऊ जाधव आणि स्व. प्रा. डी. बी. ढोलम यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले; परंतु आंबा परदेशी पाठवण्याच्या नियोजनात ज्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक घोळ घालून महामँगो संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेला प्रयत्न मोडीत काढण्यात आला. यात नाबार्डसह काही अधिकाऱ्यांनी हे जाणीवपूर्वक केले. यामध्ये पडद्याआडून आंबा व्यवसायातील दलालांची भूमिका होती. एकदा का महामँगोचा प्रयोग यशस्वी झाला असता तर आंबा दलाल हा फळ बाजारातला दलाल बाजूला पडणार होता. यामुळे दलालांना आंबा व्यवसाय आपल्या हातून दुसरीकडे द्यायचा नव्हता. यासाठी त्यांची तेव्हा आणि आजही धडपड सुरू आहे. एकीकडे आंबा विक्री व्यवसाय हा अशा पद्धतीने अडचणीत असताना यावर्षी आंबा उत्पादनच मंदावले आहे. कोकणात जो अवकाळी पाऊस पडला त्याचबरोबर मार्च महिन्यात ३८,३९ अंश सेल्सिअस तापमान झाले. यामुळे छोटी-छोटी फळं गळून पडली. आंबा गळण्याचे प्रमाण इतके होते, यातच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही आंबा तयार झाला; परंतु त्यानंतर आता एवढ्यात आंबा तयार होण्याची शक्यता कमी आहे. देवगड, नाणार, कुंभवडे या भागात कामानिमित्ताने जाण्याचा योग आला. ज्या आंबा बागायतदारांच्या दारात आंब्याची रास पडलेली दिसायची; परंतु यावेळी मात्र डझन-दोन डझन आंबाही नजरेस पडला नाही. काही आंबा बागायतदारांच्या बागेतील झाडावर आहे; परंतु हा आंबा झाडावरून पेटीत बंद होईपर्यंत कोणतीही शाश्वती नाही. यातच फळमाशांच्या प्रादुर्भावाने हाता-तोंडाशी आलेले आंबा पीक या फळमाशीने वाट लावल्याचे दिसते. ऋतुचक्रातील सतत होणाऱ्या बदलाचा हा परिणाम दिसतो. कधी आकाश भरून आलेले असते म्हणजेच काही बदल हे घडतच असतात. यामुळे बागेतला आंबा घरात येईपर्यंत काय घडेल, हे आजच्या घडीला कोणत्याच शेतकऱ्याला काही ठामपणे सांगता येणार नाही.

आंबा बागायतदार असलेल्या अ‍ॅड. अजित गोगटे, सदाशिव ओगले, संदीप प्रभुदेसाई, संदेश देसाई, प्रसाद देसाई, मनोहर देसाई या आंबा व्यवसायात असणाऱ्यांशी बोलल्यावर एक बाब स्पष्ट जाणवली की, कोकणातील आंबा व्यवसाय फारच बेभरवशाचा झाला आहे. जर-तर वरचाच हा व्यवसाय बनला आहे. मनाशी बांधलेले आडाखे खरे ठरतीलच हे सांगणे अवघड झाले आहे. या आंबा व्यवसायावर अवलंबून असणारे ट्रक, टेम्पोचालक, आंबा काढणे, आंबा पेटी भरणे हे काम करणारा मजूर, आंबा बॉक्स बनवणारा कारखानदार अशा सर्वांनाच याचा मोठा फटका बसला आहे. याचा मोठा परिणाम झालेला दिसतो. यात जसा आंबा बागायतदाराचा तोटा आहे, तसाच तो या आंबा व्यवसायाशी संबंधित आहे. सर्वांनाच त्यातून त्यांचे-त्यांचे आर्थिक गणित बिघडवणारेही आहे. हे नुकसान कितीतरी पातळीवरचे आहे. शेवटी आंबा व्यवसायातून येणारा पैसा बाजारात फिरत असतो. ती बाजारातली उलाढालच थांबली आहे. सुरुवातीला ज्यांच्या बागेत आंबे झाले त्यांना चांगले पैसे मिळाले; परंतु आताचा हा मधला कालावधी आंबा व्यवसायाच्या दृष्टीने नुकसानकारक ठरला आहे. शाळा-कॉलेजमध्ये शिकणारी गोरगरीब, सर्वसामान्य मुलं आंबा हंगामात वर्षभरात लागणाऱ्या वह्या-पुस्तके, कपड्यांसाठी मजुरी करून या पैशांची व्यवस्था करायचे. सुट्टीत काम करणाऱ्या मुलांची संख्याही काही कमी नव्हती; परंतु यावर्षी काहीच काम नाही अशीच त्यांची स्थिती आहे. यामुळे शाळा-कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. निसर्गाच्या या विचित्र हवामान अवस्थेचा परिणाम कोणा-कोणावर आणि कशा पद्धतीने होतो आहे, हे दिसून येत आहे. निसर्गापुढे कोणीही कितीही गावगप्पा मारल्या तरीही त्यांना फार मोठ्या मर्यादा आहेत. निसर्गाची कृपा झाली तरच यावर्षी पुढच्या पंधरवड्यात बाजारात कोकणचा हापूस आज दिसणार! कोकणबाहेरच्या ‘देवगड हापूस’ म्हणून दिसणाऱ्या आंब्यावरच समाधान मानावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -