Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमनं तृप्त करणारी ‘मराठी’ बहरावी

मनं तृप्त करणारी ‘मराठी’ बहरावी

  • विशेष: प्रा. प्रवीण दवणे, सुप्रसिद्ध लेखक

रिवाजाप्रमाणे मराठी राजभाषा दिन साजरा करणे ही उत्तम परंपरा असली तरी, आता ही परंपरा पुढे नेणारी पिढी आपण घडवत आहोत का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. नवीन पिढीची मराठीप्रती अनास्था पाहून राजभाषेचा हा ध्वज येणाऱ्या पिढीकडे कसा सुपूर्द करणार, हा प्रश्नच पडतो. मराठी शाळांची खालावणारी स्थितीही भाष्य करून जाते. पण तरीही आशा कायम आहे.

२७ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा मराठी राजभाषा दिन हा प्रत्येक मराठी भाषिकासाठी आनंददायी दिवस असतो. मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक मनाने तो साजरा करणे गरजेचे आहे. ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिन साजरा केला जातो. ‘मराठी गौरव दिन’ अशीही या दिवशीची ओळख आहे. पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे, या विचाराने प्रेरित होऊन मराठी भाषा दिन साजरा केला जातो. पण ही परंपरा कितीही थोर असली आणि त्यामागील विचार उदात्त असला तरी खरोखर या साजरीकरणाने काही साधते की ती जीवरक्षक प्रणालीवर असणाऱ्या वा कोमात गेलेल्या रुग्णाचा वाढदिवस साजरा करण्याइतकी व्यर्थ बाब आहे, याचा विचार होणेही गरजेचे आहे.

मी अनेक स्नेहसंमेलनांना, साहित्यिक कार्यक्रमांना उपस्थिती लावतो. शाळा-कॉलेजांमध्ये फिरतो. तेव्हा लक्षात येते की, आताशा मराठीतील साधी सोपी वाक्य वा संकल्पनादेखील मुलांना कळेनाशा झाल्या आहेत. खरे तर ही सगळी मराठी आई-वडिलांची मुले आहेत. तडजोड करून ते मुलांच्या गळी मराठी उतरवण्याचा प्रयत्नही करत आहेत. पण ही मुले अगदी नाईलाज असेल तेव्हाच मराठी बोलताना दिसतात. हा नाईलाज अलीकडे मला अत्यंत त्रासदायक वाटू लागला आहे. या पुढच्या पिढीची मातृभाषा इंग्रजीच असणार, यात शंका नाही कारण त्यांचे माता-पिताही इंग्रजी माध्यमातूनच शिकले आणि त्या संस्कारांतमधूनच मोठे झाले आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडे आधीच मराठी शब्दांचा संग्रह कमी असून पर्यायी मराठी शब्दांची तर पुरती वानवा आहे. थोडक्यात, भाषेसंदर्भातली सध्याची स्थिती पूर्वीच्या तुलनेत ३६० अंशांमध्ये बदलली आहे. भाषण करताना, व्याख्यान देताना ‘उत्कटता’ हा शब्द आला तर आता ‘इन्टेंसिटी’ असा इंग्रजीतील प्रतिशब्द सांगितल्याखेरीज मुलांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पुसले जात नाही. ‘संवेदना’ हा शब्द उच्चारताच ‘सेन्सिटिव्हिटी’ असे सांगावे लागते. असे असताना या दिवसाच्या साजरीकरणाने नेमके काय साधते, हा प्रश्नच आहे.

ही पिढी हाती असणारे पालक आणि शिक्षकही भाषेच्या दृष्टीने अत्यंत मागास आहेत. एका कार्यक्रमाला गेलो असताना निवेदिका सांगत होती, रसिकांनी ‘स्थानबद्ध’ व्हावे. लवकरच कार्यक्रम सुरू होत आहे. खरं तर तिला ‘स्थानापन्न’ म्हणायचे होते. मी जवळ बसलेल्या अध्यक्षांकडे पाहिले तर ते म्हणाले, ‘बघा ना, इतके सांगूनही लोक ‘स्थानबद्ध’ होतच नाहीत…!’ असे प्रसंग अनुभवल्यानंतर मला येणारी निराशा मराठीवर खरे प्रेम करणारेच समजू शकतील. महाराष्ट्राला ज्ञानेश्वर, तुकोबांची थोर परंपरा आहे, पण अशी परिस्थिती असल्यामुळे आता ती न रुजणे हीच खरी खंत आहे. उद्या नवीन पिढी घरातील ज्ञानेश्वरी आणि दासबोध रद्दीत टाकू लागली, तर केवळ परंपरा असण्याचा उपयोग तो काय राहिला? त्यामुळेच आता केवळ परंपरेच्या अभिमानावर मराठी जगू शकणार नाही. त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी खूप काम करण्याची आवश्यकता आहे, हे समजून घ्यायला हवे. इथे लेखकांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरेल. अलीकडेच अखिल भारतीय साहित्य संमेलनाला गेलो असता पाहिले की, पुस्तकांना खप आहे पण ती पुस्तके पाकशास्त्र वा ‘संगणक कसा वापरावा?’ अशा स्वरूपाची आहेत. म्हणूनच स्वत:चे आणि व्यवसायाचे पोट भरेल अशाच पुस्तकांना चांगली मागणी दिसून येत आहे. मात्र मन भरेल असे त्यात काहीही नाही. ही स्थिती चिंताजनक म्हणावी लागेल.

आपण आता इतके इंग्रजांधळे झालो आहोत की, मातृभाषेला डावलून काही चुकत आहे हेही कळेनासे झाले आहे. हे मी मराठीच्या प्रेमापोटी बोलत नाही. येथे प्रेमासाठी प्रेम नाही तर तो संबंध संवेदनांशी आहे, जगण्याशी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये भूतकाळापासून आरत्या, कहाण्या, दंतकथा, बोधकथा प्रचलित आहेत. अशा हजारो प्रवाहांनी आपल्यावर मूल्यसंस्कार केले आहेत. हा संपन्न वारसा आपण विसरत चाललो आहोत. पण, आता अनेक मुलांना धड मराठीही येत नाही आणि धड इंग्रजीही येत नाही. विशेष म्हणजे त्याच्या पालकांनाही याचे काही वाटत नाही. ‘आमची मुले वाचत नाहीत’ अशी तक्रार पालक करतात. ही त्यांची तक्रार म्हणायची का विजयाचा आनंद म्हणायचा, असा प्रश्न पडतो. २० वर्षांपूर्वी या पालकांनी इंग्रजीच्या अनाठायी आग्रहापोटी पेरले त्याचीच अशी फळे त्यांना आता दिसत आहेत. म्हणूनच आपण पेरले त्याची अशी फळे मिळाल्याचा आनंद या पालकांना होत असावा, असे म्हणण्यास वाव आहे; परंतु पालकांच्या इंग्रजीच्या अट्टहासापायी आता ही मुले ना मराठी उरली आहेत, ना इंग्रजी! त्यांचा रोबो झाला आहे. अशा पराभुतांचा लोंढा यापुढे पाहायला मिळणार आहे. रशिया, जपान अशा देशांमध्ये मराठी भाषा दिन साजरा करणे एक वेळ समजून घेता येईल; परंतु महाराष्ट्रात मराठी भाषा दिन साजरा करावा लागण्याचा विचार खरोखर विचार करायला लावणारा आहे. ती अभिमानस्पद बाब नक्कीच नाही. या साऱ्या परिस्थितीत उत्कृष्ट मराठी भाषा येणारी पिढी निर्माण करणे, मराठी भाषा रुजवणे अशा पद्धतीचे ‘नकारात्मक’ कार्य करावे लागेल.
इथे नकारात्मक कार्य म्हणण्यामागील कारण म्हणजे एखादे झाड फुलवण्यासाठी मदत करणे वेगळे आणि एखादे झाड मरते आहे असे लक्षात आल्यावर त्याला वाचवण्यासाठी मदत करणे वेगळे! हे कार्य एका दृष्टीने नकारात्मक ठरते. मराठी भाषा रुजवण्यासाठी आता अशाच स्वरूपाचे नकारात्मक कार्य करावे लागणार आहे. इथे आणखी एक किस्सा सांगावासा वाटतो. एकदा एका शाळेच्या स्नेहसंमेलनाला गेलो होतो. त्या शाळेत प्रवेश केल्यानंतर मुले म्हणाली, ‘वेलकम सर’. त्यावर मी त्यातील काही मुलांना या शब्दांचा अर्थ विचारला. त्यांना तो सांगता आला नाही. त्यावर मी शिक्षकांना म्हणालो, ‘तुम्ही मुलांना म्हणण्यास सांगता त्याचा अर्थ तरी सांगत जा…’ नंतर स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली. त्यावेळी मुलांनी एक गाणे सादर केले. त्या गाण्याचे बोल होते, रेन रेन गो अवे… ते ऐकून मी संस्थेच्या प्रमुखांना म्हणालो, ‘जगात सर्वाधिक पाऊस इंग्लंडमध्ये पडतो. त्यामुळे कदाचित त्यांना पावसाची गरज नसेल; परंतु महाराष्ट्रात दुष्काळी स्थितीमुळे पावसाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन तुम्ही मुलांना ‘ये रे ये रे पावसा’ हे गाणे का शिकवले नाही?’ अर्थातच या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही. आज खेड्यापाड्यातीलही अनेक मुले आईला ‘मम्मा’ म्हणत आहेत. आईला ‘आई’, ‘माय’ म्हणण्यात ममतेचा, प्रेमाचा ओलावा आहे तो ‘मम्मा’ या शब्दातून कसा येणार? परंतु असे म्हणण्यात मुलाला भूषण वाटते आणि ऐकण्यात आईलाही धन्यता वाटते; परंतु या इंग्रजाळलेल्या मुलांनी याच मम्मा-डॅडांना वृद्धपणी घराबाहेर काढले तर त्यांना कळणारही नाही की, आपण मुलाला आई-बाबा म्हणायला शिकवले नाही, याचा हा परिणाम आहे!

हल्ली मुलांना बहिणाबाईंच्या कविता, ओव्या ऐकवल्या जात नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘जन्मठेप’ हे पुस्तक वाचायला दिले जात नाही. थोर महापुरुषांच्या कथा सांगितल्या जात नाहीत. या साऱ्या संस्कारांपासून मुले वंचित राहात आहेत. मग त्यांना या भाषेची, या भाषेतील साहित्याची गोडी कशी लागणार, हा खरा प्रश्न आहे. आता व्याख्याने देतानाही मराठी माणसांपुढे केवळ मराठीत कसे बोलायचे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाचे भाषण इंग्रजीत करा, असा आग्रह धरणारेही पाहायला मिळत आहेत. या परिस्थितीत मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषेचे महत्त्व पटवून सांगणे हा एक दिवसाचा कार्यक्रम असता कामा नये. खरे तर शासनानेही स्वातंत्र्योत्तर काळातील भाषेची जपणूक हे विकासाचे साधन मानले पाहिजे. प्रत्येकात मातृभाषेचे प्रेम विरघळले पाहिजे. कारण भाषेच्या छटा कळल्या नाहीत तर जीवनाच्या छटा कळत नाहीत. आपल्या भाषेतील साहित्यात एका एका शब्दाचा विचारपूर्वक वापर केला जातो. तोही लक्षात घेतला जायला हवा. उदाहरण द्यायचे तर ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का?’ या काव्यपंक्तीत डोळे या शब्दाला नयन, नेत्र असे समानार्थी शब्द घेता आले असते. अन्य कोणत्याही समानार्थी शब्दाचा वापर करता आला असता; परंतु ‘डोळे’ या शब्दात जे भरलेपण असते, जो ओलावा असतो तो अन्य समानार्थी शब्दांमधून प्रकट होत नाही.

आपल्याकडील ‘आरती’ या शब्दातही आर्तता असते. विश्वभाषा म्हणून इंग्रजी यायला हवी. त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही; परंतु मातृभाषा आलीच पाहिजे. आपली बोलीभाषा, त्यातील विविध प्रकारचे साहित्य, संत वाङ्मय हे सर्व मातृभाषेचे वैभव आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा मनापासून आनंद घ्यायला हवा. मराठी भाषेचा प्रसार सर्वतोपरी व्हावा, अशी कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांची तीव्र इच्छा होती; परंतु अशा एखाद- दुसऱ्या व्यक्तीचे प्रयत्न कितपत यशस्वी ठरणार, हा प्रश्न आहे. त्यामुळेच त्याला सगळ्यांनीच टेकू देणे गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -