Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखman ki baat: ‘मन की बात’ बनली आता दिल की बात

man ki baat: ‘मन की बात’ बनली आता दिल की बात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(man ki baat) च्या १०३व्या कार्यक्रमातून रविवारी देशवासीयांशी संवाद साधला. मन की बात हा एकतर्फी संवादाचा कार्यक्रम असल्याची टीका नेहमीच विरोधकांकडून केली जाते; परंतु मन की बात हा दिल की बातचा कार्यक्रम कसा आहे, हे यावेळी दिसून आले. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो पत्ररूपाने प्रतिसाद मिळाला आहे, तो पाहून पंतप्रधानही भारावून गेले आहेत. त्यातील काही पत्रांचा उल्लेख आवर्जून करता येईल. नुकतीच हज यात्रा पूर्ण केलेल्या मुस्लीम महिलांनी ही पत्रे लिहिली आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक अर्थाने विशेष मानला पाहिजे. यात अशा महिला आहेत ज्यांनी कोणत्याही पुरुष सोबत्याशिवाय किंवा मेहरमशिवाय हजयात्रा केली आणि ही संख्या चार हजारांपेक्षाही जास्त आहे. पूर्वी, मुस्लीम महिलांना मेहरमशिवाय ‘हज’ करण्याची परवानगी नव्हती. सौदी अरेबियाच्या सरकारनेही मेहरमशिवाय हजला जाणाऱ्या महिलांसाठी, खास महिला समन्वयकांची नियुक्ती केली होती. मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत हज धोरणात जे बदल केले गेले आहेत, त्याचा फायदा मुस्लीम महिलांना होत आहे. हा एक मोठा बदल आहे. ‘हज यात्रा’ करून परदेशातून परत आलेल्या लोकांनी विशेषतः माता-भगिनींनी पत्रे लिहून जे आशीर्वाद दिले आहेत, ते खूपच प्रेरणादायी आहेत, असे मोदी यांचे म्हणणे आहे.

जम्मू-काश्मीरच्या तरुणांना अमली पदार्थांपासून वाचवण्यासाठी कसे अनेक अभिनव प्रयत्न केले गेले आहेत, याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’(man ki baat) या कार्यक्रमातून दिली. तिथे संगीत संध्या (म्युझिकल नाईट), मोटारसायकल प्रवास (बाईक रॅलीज) सारखे कार्यक्रम होत आहेत. चंदिगडमध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी स्थानिक क्लब्सना/मंडळांना त्याच्याशी जोडण्यात आले आहे. पंजाबमध्ये असे अनेक क्रीडा गट देखील तयार केले गेले आहेत, जे फिटनेसवर/तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि व्यसनमुक्तीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. नशेविरुद्धच्या या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग खूप उत्साहजनक आहे. या सर्व प्रयत्नांमुळे भारतातील अमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहिमेला बळकटी मिळणार आहे.

अमली पदार्थ आणि तरुणाईविषयी बोलताना मध्य प्रदेशमधील एका प्रेरणादायी प्रवासाबद्दल त्यांनी हितगुज केले. हा प्रवास आहे मिनी ब्राझीलचा. मध्य प्रदेशात मिनी ब्राझील कुठून आले? असा विचार मनात येईल. हीच तर गंमत आहे. मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यामध्ये बिचारपूर नावाचे एक गाव आहे. बिचारपूरलाच मिनी ब्राझील म्हणतात. मिनी ब्राझील म्हणायचे कारण म्हणजे आज हे गाव फुटबॉलच्या उगवत्या ताऱ्यांचा बालेकिल्ला बनले आहे. साधारण दोन अडीच दशकांपूर्वी बिचारपूर गावाचा मिनी ब्राझील होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. त्या काळात बिचारपूर गाव अवैध दारूचा अड्डा म्हणून कुप्रसिद्ध होते, नशेच्या आहारी गेले होते. या वातावरणामुळे सर्वात जास्त नुकसान येथील तरुणांचे होत होते. माजी राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक रईस अहमद यांनी या तरुणांची प्रतिभा ओळखली. रईसजींच्याकडे फारशी संसाधने नव्हती; परंतु त्यांनी संपूर्ण समर्पण वृत्तीने तरुणांना फुटबॉल शिकवायला सुरुवात केली. काही वर्षांतच इथे फुटबॉल इतके लोकप्रिय झाले की तीच बिचारपूर गावाची ओळख बनली. आता येथे फुटबॉल क्रांती नावाचा एक उपक्रमही चालू आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि त्यांना प्रशिक्षण दिले जाते. हा उपक्रम इतका यशस्वी झाला आहे की बिचारपूरमधून ४० राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ही फुटबॉल क्रांती आता हळूहळू आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशात पसरत आहे. शहडोल आणि त्याच्या आजूबाजूचा मोठ्या परिसरात १२००हून अधिक फुटबॉल क्लब तयार झाले आहेत. येथून बरेच असे खेळाडू उदयास येत आहेत जे आता राष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत,
ही कौतुकास्पद बाब आहे.

‘अमृत महोत्सवा’च्या निमित्ताने देशभरात सुमारे दोन लाख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट अगदी जवळ आला आहे, तेव्हा देशात आणखी एक मोठी मोहीम सुरू होणार आहे. हुतात्मा झालेल्या वीरांना आणि वीरांगनांना आदरांजली देण्यासाठी ‘मेरी माती मेरा देश’-‘माझी माती माझा देश’ अभियान सुरू होणार आहे. या अभियानाअंतर्गत देशभरात आपल्या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. या विभूतींच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशातील लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेख देखील स्थापित केले जातील. या अभियानात देशभरात ‘अमृत कलश यात्रा’ ही काढण्यात येणार आहे. देशातील कानाकोपऱ्यांतून, गावागावांतून ७५०० कलशांमध्ये माती घेऊन ही ‘अमृत कलश’ यात्रा देशाच्या राजधानी दिल्लीत पोहोचेल. ही यात्रा आपल्यासोबत देशाच्या विविध भागातून रोपेही आणेल. ७५०० कलशातून आलेली माती आणि ही रोपे मिळून, नंतर राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ ‘अमृत वाटिका’ निर्माण करण्यात येणार आहे. ही ‘अमृत वाटिका’, म्हणजे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या अभियानाचे भव्य प्रतीक बनेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी, ‘हर घर तिरंगा अभियाना’च्या निमित्ताने जणू संपूर्ण देश एकत्र आला होता, त्याच पद्धतीने यावेळीही प्रत्येक घरात तिरंगा फडकवायचा आहे आणि ही परंपरा पुढे निरंतर चालवायची आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिल्या गेलेल्या असंख्य बलिदानांची जाणीव होईल आणि स्वातंत्र्याचे मूल्य कळेल. त्यामुळे प्रत्येक देशवासीयाने या प्रयत्नात अवश्य सहभागी झाले पाहिजे, असे ‘मन की बात’(man ki baat) मधून देशातील जनतेला आवाहन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -