Saturday, May 18, 2024

माहेरपण…

  • सहजच : चन्द्रशेखर टिळक

काल सकाळी स्त्री आणि तिचे भावनिक माहेरपण याबाबत दोन अगदी टोकाचे अनुभव आले…
काल सकाळीच एका व्हॉट्सॲप गृपवर एका पुस्तकाचा परिचय वाचला. भारतीय मुलीचे परदेशात राहणाऱ्या भारतीय मुलाशी लग्न होते. पुरुषी हेकेखोरपणे तिच्या वैवाहिक आयुष्याची परिणिती तिच्या हातून तिच्या नवऱ्याची हत्या करण्यात होते. या घटनेआधीचे तिचे वैवाहिक आयुष्य आणि या घटनेनंतरची तिची कायदेशीर लढाई या दोन्ही टप्प्यांत तिला आलेले अतिशय वाईट अनुभव हा या पुस्तकाचा गाभा आहे.

दुसरा अनुभव त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात आला…
शेगांवला भक्त निवासातून मंदिरात रिक्षाने येत होतो. दसरा होऊन गेला तरी शेगांवमध्ये चौका-चौकांत अजून नवरात्रीचे मांडव होते. त्या मांडवात देवी होत्या. त्यांची पूजा-आरती सुरू होती.

परवा संध्याकाळी आणि काल सकाळी काही घरातूनही आरत्यांचे आवाज येत होते. म्हणून सहजच रिक्षावाल्या वयस्कर काकांना त्याबाबत विचारले…
“काका, नवरात्र काय, दसराही होऊन गेला ना?”
“हो गेला की…”
“मग हे मांडव, या पूजा आणि आरत्या कशा काय अजून सुरू आहेत?”
“का? तुमचा काही विरोध आहे का त्याला?” इति काका.
“नाही हो. विरोध जरा सुद्धा नाही. पण असे कधी या आधी बघितलेले नाही म्हणून कुतूहल मात्र नक्कीच वाटले.”
त्यावर काका म्हणाले, “मग काही हरकत नाही. मी उत्तर देण्याआधी एक सांगा. तुम्हाला घरी लेकी-सुना आहेत का?”
“सून आहे. लेक नाही.”
“सून नेहमी तुमच्याबरोबरच राहते का?”
“नाही.”
“मग अशी सून सणवार म्हणून तुमच्याकडे आली, तर तिला सण व्हायच्या आधी परत जाऊ द्याल का?”
“नाही. पण त्याचा तुमच्या उत्तराशी काय संबंध आहे?”
“तेच तर सांगतो आहे. अनेकजण दसऱ्याच्या आदल्या दिवशी घट विसर्जन किंवा देवी विसर्जन करतात. पण ते भावनिकदृष्ट्या बरोबर नाही.” काका म्हणाले.
“कळले नाही तुम्ही काय म्हणत आहात ते?” मी प्रश्नार्थक नजरेने म्हणालो.
“अहो, नवरात्रात आलेली देवी आपल्या घरातल्या लेकी-सुनांसारखी आहे. दसरा आपला महत्त्वाचा सण आहे. मग आलेल्या घरातल्या लक्ष्मीला… देवी, लेक, सून… सणाचे जेवल्याशिवाय कसे जाऊ द्यायचे?”
“पण दसरा तर परवाच होऊन गेला. कालचा दिवस होता की मधे?”
“साहेब, काल एकादशी होती. एकादशीचा उपास असतो. त्यादिवशी…”
“हो… माझी आजी म्हणायची घरातल्या सवाष्णीने उपासाच्या दिवशी प्रयाण करू नाही.”
“बरोबर… हेच कारण आहे. लाडा-कोडाच्या घरच्या सवाष्णी आहेत त्या! त्या काय उपासाचे पदार्थ खाऊन निघणार का प्रवासाला” काका म्हणाले.
“समजतंय…”
“आज आता द्वादशीला दुपारी उपास सुटेल. तिला खाता येईल-नेता येईल असे गोडधोड होईल. मग तिची पाठवणी…”
“खरं आहे.”
“काय आहे ना, कौतुक दोघांनाही हवे असते. हे लक्षात ठेवले की कर्तव्यही कौतुक ठरते.”
“पटले तुमचे म्हणणे…”
“साहेब, तुमची सून नक्की नशीबवान आहे याबाबतीत.”
“तुम्ही आत्ताच म्हणालात ना…”
योगायोगाने मी रिक्षात असतानाच सूनबाईचा फोन आला
आणि रिक्षावाले काका कौतुकाने हसत…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -