Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणराज्यात महाविकास आघाडी; रत्नागिरीत मात्र बिघाडी

राज्यात महाविकास आघाडी; रत्नागिरीत मात्र बिघाडी

नरेंद्र मोहिते

नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपसोबत युती करून निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेने सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. सत्तेच्या लोण्यासाठी विचार भिन्नता असलेले हे तीन पक्ष आघाडी करत एकत्र आले खरे, मात्र स्थानिक पातळीवर दोन वर्षे झाली तरी यांचे सूर जुळलेले नाहीत, हे वारंवार पुढे येत आहे. आगामी काळात होणाऱ्या नगर परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात या तिन्ही पक्षांमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला चांगलाच ऊत आला आहे. तुम्ही आमचे घेतलात तर आता आम्ही तुमचे घेणार यासाठी जणू महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्येच स्पर्धा लागल्याचे चित्र रत्नागिरी जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.

पक्ष संघटना वाढीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही कोकणात कंबर कसली असून गत सप्ताहात या दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी कोकण दौरा करत शिवसेनेला आम्हीही तुम्हाला कोकणात शह देऊ शकतो हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्यात सत्तेसाठी एकत्र आलेले हे तिन्ही पक्ष स्थानिक पातळीवर निवडणुका जवळ येऊ लागताच एकमेकांविरोधात उभे ठाकत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

कोकणात ज्यांनी शिवसेना वाढविली ते अनेकजण आता अडगळीत पडले आहेत, कारण शिवसेनेच्या लेखी आता निष्ठावानांपेक्षा उपऱ्यांनाच जास्त भाव असल्याने रामदास कदम, भास्कर जाधव, सूर्यकांत दळवी, गणपत कदम, सुभाष बने यांसारख्यांना पक्षात विशेष स्थानच नाही. त्यामुळे अनेकजण पक्ष सोडत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून खेड शिवसेना उपजिल्हा प्रमुख शंकर कांगणे, शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे, खेडचे तालुकाप्रमुख दत्ताराम गोठल व युवासेनेचे दापोलीचे उपतालुका अधिकारी विकास जाधव यांनी पक्षप्रमुखांना ई-मेलने राजीनामे पाठवत शिवसेनेला रामराम ठोकला आहे. ही संधी साधत राष्ट्रवादीने गळ टाकला आणि मग संदीप राजपुरे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी देखील पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर पक्षावर नाराज असलेल्या बेंडल यांनी आता जाधव हे शिवसेनेत गेल्याने पुन्हा राष्ट्रवादीत येत जाधव यांना चांगलाच दणका देण्याचा निर्धार केला आहे. अशीच अवस्था काहीशी रत्नागिरी, चिपळूण, लांजा, राजापुरात आहे. अनेकजण पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल होत आहेत, तर काहींसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी गळ टाकून आहे.

जिल्ह्यात शिवसेनेला सत्तेतीलच मित्र पक्ष अशा स्वरूपात दणके देऊ लागल्याने आता शिवसेनेतही अस्वस्थता पसरली आहे. मग कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी उसने अवसान आणून तुम्ही आमचे घेतलात आता आम्ही तुमचे घेणार बघाच असे धमकी वजा इशारे शिवसेनेचे मंत्री देत आहेत. प्रत्यक्षात मात्र हाती कुणीच लागत नाही, अशी सेनेची अवस्था आहे. कायमच एक हाती सत्तेच्या बढाया मारणाऱ्या शिवसेनेला निष्ठावानच दणके देत आहेत. हे रामदास कदम यांनी अनिल परब यांना कशा प्रकारे अडचणीत आणले यावरूनही पुढे आले आहे.

या संधीचा फायदा घेत राज्याची सत्ता उपभोगताना मुख्यमंत्र्यांसोबत दोन बाजूला बसून सत्तेचे गुणगाण गाणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आता कोकणात येऊन शिवसेना पोखरू लागले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीन दिवस रत्नागिरी दौरा केला. या दौऱ्यात मंडणगडपासून राजापूरपर्यंत काही पक्षप्रवेशाचे कार्यक्रम झाले आणि अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांना त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश दिला, तर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत शिवसेना आमदारांना नक्की कामे करणार असे सांगून खूश करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करत पक्षसंघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. ओबीसी कार्डचा वापर करताना जिल्हाध्यक्षपदीही ओबीसी समाजाचे अविनाश लाड यांची निवड करून भविष्यातील राजकारणाची दिशा त्यांनी स्पष्ट केली आहे, तर त्यांनीही आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत, असे सांगत शिवसेनेतील नाराजांना ऑफरच दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -