Sunday, May 12, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमाधव नेत्रालय, प्रीमियम सेंटर, नागपूर

माधव नेत्रालय, प्रीमियम सेंटर, नागपूर

सेवाव्रती: शिबानी जोशी

आपल्या शरीरातील अतिशय नाजूक आणि महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळे. ज्यांना डोळ्यांचे विकार असतात, अधूदृष्टी किंवा अंधत्व असते, त्यांच्या आयुष्यातील रंगाचा बेरंग झालेला असतो. डोळे जोपर्यंत नीट काम करत असतात, तोपर्यंत आपल्याला त्याचे महत्त्व लक्षात येत नाही, परंतु डोळ्यांत साधा एखादा कण गेला तरीही आपण अस्वस्थ होतो आणि मग आपल्याला डोळ्यांचे महत्त्व लक्षात येते.

दुर्दैवाने  जन्मतःच डोळ्यांचे विकार किंवा अंधत्व असते त्यांच्या समस्या  वेगळ्या असतात, तसेच डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजारांचा ज्यांना सामना करावा लागतो त्यांच्याही समस्या वेगळ्या असतात. डोळ्यांच्या सर्व विकारांचे लवकर निराकरण होणे हे गरजेचे असते. यासाठी सर्वसामान्य रुग्णालयापेक्षा एक विशेष रुग्णालय स्थापन करावे आणि त्या ठिकाणी संशोधनही व्हावे, अशी भावना नागपुरातील काही संघ कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यातूनच सुरुवातीला नागपूरला  माधव नेत्रालय, नेत्र संस्था व संशोधन केंद्र सुरू झाले. या पहिल्या रुग्णालयाची स्थापना  गजानन नगर येथे झाली. त्यानंतर आणखी भव्य स्वरूपात संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण आणि  नेत्रतपासणी  करण्यासाठी एक सर्वंकष रुग्णालय, तसेच शिक्षण देण्यासाठी पदव्युत्तर महाविद्यालय स्थापन करण्याचा हेतू मनात ठेऊन  वासुदेव नगर परिसरामध्ये माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची स्थापना २०२३ मध्ये झाली. नागपुरातील  ब्लाइंड रिलिफ असोसिएशनने जागा उपलब्ध करून दिली.

माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर येथे दि. २२ मार्च २०२३  म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नेत्रविकाराच्या विविध तपासणीसाठी ओपीडी केंद्र सुरू झाले.  याच सेंटरच्या आवारात एक भव्य शिवमंदिर, त्याशिवाय एक अद्ययावत वाचनालय स्थापन करण्यात आले आहे. या शिवमंदिरात आजूबाजूच्या भागातील रहिवासी दर्शन घेण्यासाठी येत असतात, तसेच महाशिवरात्री सारखे सणही मोठ्या उत्साहात साजरे होतात. वाचनालयामध्ये आसपासच्या विद्यार्थ्यांना बसून अभ्यास करण्यासाठी  सोय आहे.

सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे विद्यार्थी वाचनालयात बसून अभ्यास करू शकतात, तसेच वाचनालयातील पुस्तकेही विनामूल्य उपलब्ध करून दिली जातात. वाचनालयामध्ये एअर कुलर, वॉटर कुलरची सोयही उपलब्ध करून दिली आहे. या केंद्राला खूप मोठी जागा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी गेल्या वर्षी एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला होता. माधव नेत्रालयामध्ये नेत्रदानासाठी नोंदणी करून ज्यांनी नेत्रदान केले, अशा ९२ व्यक्तींच्या नावाने ९२ झाडे लावण्यात आली आणि त्या वृक्षारोपणाला या ९२ नेत्रदात्यांचे नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बकुळ, पाम ट्री तसेच पेन्सिल पाम ट्रीची झाडे लावून प्रत्येक झाडाला त्या नेत्रदात्याचे नाव देण्यात आले आहे.

प्रीमियम सेंटरमध्ये डोळ्यांच्या विकारावरची ओपीडी सेवा संपूर्णपणे निशुल्क उपलब्ध आहे. केवळ पहिल्यांदा रजिस्ट्रेशन फी म्हणून शंभर रुपये आकारले जातात. भारतीय स्टेट बँकेच्या एसबीआय फाऊंडेशनच्या सहकार्याने या ठिकाणी अद्ययावत असे नेत्रतपासणी केंद्र सुरू झाले असून, त्याला एसबीआय आय केअर सेंटर असे म्हटले जाते. माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे नागपूरमधील सर्वात अद्ययावत अशी डोळ्यांच्या उपचारांवरील आधुनिक यंत्रसामग्री येथे उपलब्ध आहे आणि तरीही येथे विनामूल्य  सर्व वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात.

येथील प्रशस्त अशा इमारतीची बांधणी सोलार इंडस्ट्रिजच्या सहकार्याने झाली आहे.   खरेतर  २५ – २६ वर्षांपूर्वी सुरुवातीला माधव नेत्र पेढीची स्थापना  करून  कार्यकर्त्यांनी या कार्याला सुरुवात केली होती. याचा उद्देश नेत्रहिनांना दृष्टी मिळवून देणे, लोकांमध्ये नेत्रदानासाठी जनजागृती निर्माण करणे हा होता; परंतु नेत्रपेढीसाठी काम करीत असताना डोळ्यांचे विकार तसेच अंधत्व, अधूदृष्टी हे सर्व प्रश्न कार्यकर्ते तसेच डॉक्टरांना दिसू लागले आणि त्यातूनच रुग्णालयाची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले होते. तसे रुग्णालय २०१८ साली गजानन नगर येथे सुरू झाले. त्यानंतर वासुदेव नगर या भागात हे नवीन अत्याधुनिक केंद्र उभारण्यात आले आहे.

माधव नेत्रालय या संघटनेतर्फे केवळ रुग्णालयात रुग्णसेवा केली जात नाही, तर मोठ्या प्रमाणावर नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यामधील ग्रामीण भागात आरोग्य शिबीर, नेत्रविकार शिबीर, नेत्रतपासणी शिबीर आयोजित केली जातात. यासोबतच नेत्रदान करण्यासाठी,  जनजागृती करण्यासाठी, लोकांना माहिती देण्यासाठी, तसेच नेत्रदानाचे फॉर्म भरून घेण्यासाठी देखील मोठी मोहीम राबविली जाते. देशभरात नेत्रदानाप्रति जागरूकता निर्माण व्हावी आणि  कमीत कमी एक लाख लोकांनी नेत्रदानासाठी अर्ज भरावेत याकरिता माधव नेत्रालयातर्फे एक वर्ष नेत्रदान रेल यात्राही काढण्यात आली होती.

नेत्रदानाबाबत जनजागृती करता यावी, यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. मोतीबिंदूच्या तपासणीसाठी देखील ग्रामीण भागात शिबिरे घेतली जातात आणि त्यात ज्यांना उपचाराची किंवा ऑपरेशनची गरज आहे अशा रुग्णांवर उपचार देखील केले जातात. भविष्यामध्ये माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तृत आवारामध्ये एक भव्य रुग्णालय तसेच  पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेज स्थापन करण्यासाठी योजना आखली गेली आहे आणि त्यानुसार कामदेखील सुरू झाले आहे.
joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -