Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यशिक्षणाच्या जाहिरात बघताय... सावधानता बाळगा!

शिक्षणाच्या जाहिरात बघताय… सावधानता बाळगा!

नेहा जोशी: मुंबई ग्राहक पंचायत

“अगं, माधवी किती दिवस झाले तू भेटलीच नाहीस; कुठे आहेस, कुठे?” नीताने भाजी घेता घेता भेटलेल्या आपल्या मैत्रिणीला विचारले. “नीता, तुला तर माहितीच आहे, सईची बारावी आहे. मी अगदी तिचे वेळापत्रकच बनविले आहे. दिवसभर तिचे कोचिंग क्लास असतात त्यानुसार खाणे-पिणे. मला वेळच मिळत नाही. एकदाची तिला टॉप ३ इंजिनीरिंग कॉलेजपैकी एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली की सुटले बाई मी. ती कॉलेजेस म्हणजे १००% नौकरीची खात्रीच बघ!” दहावीच्या सुट्टीपासून तोच एक ध्यास आहे सगळ्यांचा. नीताने एका दमात सांगितले. हे असे संवाद आपल्या परिचयाचे आहेतच. दिवसेंदिवस शैक्षणिक क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि आव्हाने त्यामुळे दावणीला बांधलेले पालक आणि पाल्य हे चित्र घरोघरी दिसते आहे.

कोरोना या जागतिक महामारीमुळे मधली दोन वर्षे सारे काही ऑनलाइन असे चित्र होते. त्यामुळे शैक्षणिक संस्थांचे स्वरूपच पालटले. पूर्वी आपल्याला आपल्या शहरातील नावाजलेली शाळा, कॉलेज यांची तोंड ओळखीतून माहीत असायची. अभ्यासक्रमही ठरावीकच होते. आता बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमातही विविधता आली. ऑनलाइन आणि ऑफलाइन संस्था निर्माण झाल्या. साहजिकच त्यांच्यातही नामांकनाची स्पर्धानिर्माण झाली. थोडक्यात शिक्षण क्षेत्र ही सेवा न राहाता व्यवसाय झाला आहे. अर्थातच व्यवसाय म्हटले की, ग्राहक आला आणि त्यापुढे जाता ग्राहकाला आकर्षित करणाऱ्या जाहिरातीही ओघाने आल्याच. सध्या शिक्षणसेवा हा देशातील दुसऱ्या नंबरचा आर्थिक उलाढाल असलेला व्यवसाय आहे. ऑनलाइन तंत्रज्ञान वापरून शिक्षण देणाऱ्या संस्था एव्हढ्या आहेत की, साहजिकच विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेण्यासाठी त्यांच्यात चढाओढ आहे. त्यामुळे त्यांनी दिशाभूल केलेल्या जाहिरातींचे प्रमाण खूप आहे. जाहिरातदार पालकांची आणि मुलांची मानसिकता, त्यानुसार होणारी वर्तणूक त्यांची आगतिकता अचूक हेरतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शिक्षण हे सर्वोच्च उल्लंघन करणाऱ्या जाहिरात क्षेत्रांपैकी एक आहे. ASCI (The Advertising Standards Council of India) च्या वार्षिक तक्रार अहवाल २०२२-२०२३ नुसार एकूण जाहिरातींपैकी १३.८% जाहिराती ह्या शिक्षण क्षेत्रातील ASCIच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत आणि शिक्षण क्षेत्राचा त्याबाबतीत दुसरा क्रमांक लागतो.

शिक्षण क्षेत्राची वाढती व्यापकता लक्षात घेऊन ASCIने काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ती पुढीलप्रमाणे आहेत.

१. शैक्षणिक संस्थांनी कुठलेही दावे करताना त्याला सबळ पुरावे देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था त्या नंबर १ आहेत. याचा नेमका अर्थ काय? कशावरून? त्यांच्याकडे त्या शहरातील उत्तम शिक्षक आहेत का?, त्यांना काही पुरस्कार मिळाले असतील, तर त्याची सर्टिफिकेट्स, त्यासाठी झालेले सर्वेक्षण, त्यासाठी वापरात आलेली प्रश्नावली हे सादर करू शकतील का? हे प्रश्न ग्राहक म्हणून आपल्याला पडायला हवेत.

२. जेव्हा एखादी शैक्षणिक संस्था १००% जॉबची खात्री असे जाहीर करते तेव्हा त्यांनी त्याखाली भूतकाळातील नोंदी भविष्यातील खात्री देऊ शकत नाहीत, असे अस्वीकारण लिहिणे/ दाखवणे आवश्यक आहे.

३. विद्यापीठांसह, महाविद्यालये, शाळा, कोचिंग क्लासेस आणि एजुटेक प्लॅटफॉर्म ह्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच तराजूत (स्टिरिओटाइप) तोलता कामा नये. जाहिरात करताना जाहिरातदारांनी आणि वाचताना ग्राहकांनी हा मुद्दा लक्षात घ्यावा. उदाहरणार्थ चष्मा लावणारी मुले म्हणजे हुशार मुले असे अधोरेखित होऊ नये.

४. जाहिरात ही मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करणारी नसावी. एखाद्या जाहिरातीमध्ये शालेय विद्यार्थी अभ्यासासाठी झोपेशी तडजोड किंवा जेवणाच्या चुकीच्या सवयी अमलात आणताना दाखवले जाते; परंतु परिणामी आरोग्यासंबंधी हानिकारक सवयी लागू शकतात.

५. कमी मार्क मिळवणे म्हणजे अपयश असे दर्शवू नये किंवा अपयश आले म्हणून त्याला किंवा तिला शिक्षक, मित्र, पालक हिणवत आहेत आणि त्यामुळे ती मुले निराश किंवा दुखी आहेत, असे दाखवू नये. ही नकारात्मकता जाहिरातीत नसावी.

६. जाहिरातीमध्ये तातडीची निकड नसावी. उदाहरणार्थ जर वेळेत ॲडमिशन नाही घेतली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशी भीती पालक आणि विद्यार्थी या दोहोंमध्ये निर्माण केलेली नसावी.

७. जाहिरात करताना मुलगा-मुलगी असा भेदभाव नसावा. काही विषय ही फक्त मुलांची किंवा मुलींची मक्तेदारी असे दाखवू नये.

८. जाहिरात करताना अतिशयोक्ती टाळावी. उदारणार्थ काही शैक्षणिक ॲप असा दावा करतात की, त्यांच्या काही अभ्यासक्रमांमुळे एकाग्रता वाढते. असेच काही नसते. आपल्याला जे आवडते ते करूनही एकाग्रता वाढते.

पुढे येणारे युग हे जाहिरातींचे आहे हे आपण मान्य केले आहे आणि त्याची माध्यमे पण बदलत जाणार आहेत तेव्हा जाहिरातींकडे सजगपणे बघणे आणि मुलांनाही त्याबद्दल डोळस बनवणे आपले ग्राहक म्हणून कर्तव्य आहे. मित्रमैत्रिणींच्या दबावाला बळी न पडता मुलांना आपली गरज ओळखून शैक्षणिक संस्थांची सत्यासत्यता पडताळून मगच पुढचे पाऊल उचलण्यास शिकविले, तर आपण आर्थिक आणि मानसिक फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकू.

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -