Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘प्रकाश रेखा’

‘प्रकाश रेखा’

कथा : डॉ. विजया वाड

काही काम नव्हते म्हणून लिहायला बसले. सृजनशील लिखाण व्हावं ही इच्छा. आजवर कधीही न बघितलेले आजारपण अचानक उद्भवले. प्राजक्ता मोठी मुलगी! मोठी डॉक्टर आहे. निद्राविकार तज्ज्ञ M.S. M.D. तीन विषयांत भारी! भारी म्हणजे लय लय भारी वाटतं ना? ती अमेरिकन मेडिकल कॉलेजात प्राध्यापक आहे. मान उंच ना? आम्ही तिच्या M.D. च्या results ला मी नि हे वॉशिंग्टनला होतो. डॉ. रसेल मायर यांनी २२ M.D. त डॉ. प्राजक्ताची निवड करीत, ‘मला फॅकल्टी मेंबर’ हीच हवी, असे जाहीर केले नि पती-पत्नी दोघे आम्ही प्रमुदित झालो. अभिमान वाटला! आमची पोरगी चमचम चमकली याचा! निशूला तर ताई म्हणजे दैवत वाटते अगदी! बहिणी बहिणी सख्या सख्या! जीवाला जीव अगदी! निशू कधी अमेरिकेला नव्हती, तेव्हा… भरसभेत नाचली असती. इतके ताईवर प्रेम!

मला ‘एकुलत्या’ नवऱ्याची गाठ पडली. पण बिघडले नाही. कन्यारत्ने हिरकण्या निघाल्या. चमचम, विद्याक्षेत्रात उजळल्या. युनिव्हर्सिटीत रेकॉर्ड झाले. इकडची M.S. युएसची M.D. दोन्हीकडे विशेष प्रावीण्य. क्या बात है! एका आईसाठी केवढा भाग्याचा क्षण! पण तो ईश्वराने माझ्या ओटीत टाकला. धन्यता वाटली. आभारी आहे सूर्यदेवा! तुमची आराधना फळास आली आणि चोरपावलांनी आजारपण घरात शिरले. शिरले ते शिरलेच वर इस्पितळापर्यंत मजल गेली. मेंदूचा आघात. आजार! मेंदूला सूज!

अशा वेळी संपादकांनी समजून घेतले. सदर बंद! अशी बातमी नाही. केवढे हे उपकार. आयुष्यात भली माणसे भेटणे हे भाग्यच. सुकृत खांडेकर सुहृदच! प्रकाश रेखा चमकली आणि मी परत लिहिती झाले. सुकृत सरांनी ते छापले. उत्साह वाढला. लिखाणाची नवी उमेद आली. आपण अजून लिखापढी करू शकतो, हा आत्मविश्वास द्यायला कोणी तरी देवदूत असतो; तसे सुकृत सर! मी अतिशयोक्ती करीत नाही अजिबात!

पुणे ट्रिप सफल झाली. माझा आजार बळावण्याआधी पुणे ट्रिप झाली हे सौभाग्य! तशात लिखाण चालूच सदराचे. नवे नवे धुमारे फुटले कल्पनेचे. नव्या चित्रपटाचे-निशिगंधाचे! मी तिची सोबत. ती चित्रीकरणात मग्न. मी सायलेंट प्रेक्षक. कौतुकाची कमळी माझी. माझ्या दोघी पोरी बलदंड आहेत. नाजूक नि कर्तृत्वसंपन्न आहेत. ‘फॅमिली ड्रामा’ हे निशूचे व्रत आहे. उघडे वाघडे कौटुंबिक स्तरात बसत नाही ना!

कोण खरे ‘आपले’ आजारपणात कळते. असंख्य प्रेम करणारे विद्यार्थी आपले. वाचक आपले, प्रकाशक आपले, दिलीप वामन काळे आपलेच. त्यांची सलग ३१ पुस्तके काढली. कमाल ना! १५४ विक्रमी पुस्तके झाली. शरद मराठे, अशोक मुळे, अशोक सर, किती म्हणून ‘आपली’ नावे घेऊ? वाचकांचे अलोट प्रेम मला ७६ वर्षे जिवंत ठेवते आहे. याचा विसर न व्हावा देवा! अशोक कोठावळे हे मॅजिस्टिकचे मित्र. आजवर मैत्री जपलीय.

‘प्रहार’ सोडून बाकी सदर लिखाण होईना, म्हणून आपण होऊन बंद केले. माझे ‘प्रहार’चे वाचक मला धीर देतात, प्रोत्साहन देतात. माझे जगण्याचे बळ आहेत ते. आजारपण आटोक्यात आले आहे.

एक दिवस गंमत झाली. ‘गुंफण’ नावाचे अंक-मासिक घरी आले. वर ६०० रु.चा धनादेश. आनंद! आनंदी आनंद! छोटे-छोटे प्रसंग किती मौज आणतात ना जीवनात?

घरी लेखन वाचनात जीव रमला. सुकृत खांडेकर यांचा मोठा आधार लाभला. दिवाळी अंकांचे संपादक मजसाठी थांबले ही कृतकृत्यता.

प्रकाश रेखा, माझे सुंदर, शब्द जाहले, तुष्ट वाहले,
आयुष्य मोठे, लंबे लांब, शब्दांनी सुंदर झाले…
किती पुस्तके, किती लेख अन् कथा-कविता सुंदर सुंदर,
प्रतिभा जोवर जागृत जोवर सूर्य तळपतो वरती मनोहर!
तेजशलाका प्रकाश देते जोवर जागे पंख प्रतिभेचे,
दे रे देवा, दे रे देवा, असेच व्हावे,
लेणे सौजन्याचे… प्रतिभेचे… अन् प्रेमाचे,
किती स्नेहाचे देवा अमर प्रेम हे वाचकांचे!
वाचकांचे… वाचकांचे…’’

प्रिय वाचकांनो, एक विलक्षण वाचनीय अनुभव सांगते. माझी एक वाचक अत्यंत निराश, उदास, उद्विग्न होती. आत्महत्या करण्यास निघाली होती. माझा ‘हे जीवन सुंदर आहे’ लेख वाचून थांबली. जगली. वाचली. मला हे सांगायला घरी आली, तेव्हा वाटले… की आपल्या लेखणीचे सार्थक झाले.

कुणा वाचकाचा जीव आपणामुळे वाचला, याचा अभिमान नव्हे हा! हे माझ्या लेखणीचे सार्थक आहे. हा आत्मानुभव प्रत्येक लेखकाला जिवंत ठेवतो हे त्रिवार सत्य आहे.

बालवाचकांची मी लाडकी नानी आहे आता.

‘किशोर’मधून लेखन हा आत्मानंद!
प्रहारसाठी कथा लेखन हा सानंद अभिमान.
वाचकांसाठी लेखन हा जीवनगौरव!
किती वाणू? काय वर्णू! हा आनंदाभिमान?
प्रहारचे पुन्हा पुन्हा अभिनंदन…

शुभेच्छा व प्रेम…!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -