Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजP. L. Deshpande : ‘मॅड सखाराम’बाबत भाईंना पत्र

P. L. Deshpande : ‘मॅड सखाराम’बाबत भाईंना पत्र

  • विशेष : भालचंद्र कुबल

सत्तरीच्या दशकात विजय तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाईंडर’ या नाटकावर बराच गदारोळ झाला. नव-नाटककारांनी उभे केलेले प्रश्न आणि परंपरावादी नाटककारांनी जाहीर केलेला निषेध ही त्या संघर्षाची मूळ कारणे होती. अशा वेळी
पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले ‘मॅड सखाराम’ हे टीकानाट्य प्राकाशित होऊनसुद्धा रंगभूमीवर येऊ शकले नव्हते. आताच्या पिढीने रंगमंचावर सादर केलेले ‘मॅड सखाराम’ हे नाटक म्हणजे नाट्यनिर्मितीतील ही क्रांतीच म्हणावी लागेल. या पार्श्वभूमीवर पुलंना लिहिलेले हे पत्र…

प्रिय भाई,
सदोदित तुमच्या आठवणीत जगणारे आम्ही अजूनही तुम्हाला अधाशासारखं वाचत, ऐकत असतो. तुमचं अक्षर अन् अक्षर वाचून काढलंय. पण काही लिखाण अजूनही गुलदस्त्यातच आहे. परवा कुणीतरी बोललं की, तुमच्या श्रुतिका, नभोनाट्ये, बालनाट्ये अजूनही प्रकाशित नाहीत म्हणून…? खरंय का? तुमचं लिखाण दुर्लक्षित तर होऊच शकत नाही; परंतु ते जर सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचलेलंच नाही, तर मात्र आजही तुमचे फॅन्स तत्काळ आॅन होऊन तुमच्या लिखाणाची पानं या ना त्या मार्गाने सर्वदूर पोहोचवतातच. त्यातही जर तुमचे एखादे नाटक अप्रकाशित (प्रयोगाच्या दृष्टिकोनातून, प्रकाशनाच्या नव्हे) असेल तर कुतूहल, उत्सुकता आणि अविश्वसनीयता या तिन्हींतून जो कुठला भाव निर्माण होत असेल तो होतो आणि मग ते नाटक आम्ही चढेल भावानेही बघायला उद्युक्त होतो. परवा हे असंच काहीसं झालं. माझा रुईयातला मित्र आहे मंगेश सातपुते नावाचा. अधनं-मधनं बघणेबल नाटकं येत असतात त्याची रंगभूमीवर. खूप बघतो, वाचतो, चर्चा करतो, एकंदरीत नाटक जगतो. त्याने कुठूनसं तुमचं रंगभूमी न पाहिलेलं नाटक शोधून काढलं आणि प्रयोगाला लावलं. ‘मॅड सखाराम’ नावाचं.

भाई तुम्ही समकालीन लेखकांवर कधी फारशी टीका केलेली वाचनात नाही. एकदा कधीतरी गाडगीळांच्या विनोदावर तोंडसुख घेतलं होतंत. पण एक गांधीबाबा सोडला, तर तुम्ही तुमच्या लेखणीची नीब फारशी कुणाला टोचली नाही. विजय तेंडुलकर आम्हा नवनाट्यविचार प्रवर्तकांसाठी तसं आदराचं स्थान. मराठी रंगभूमीने घेतलेले आधुनिक वळण हे याच विजयस्तंभापासून सुरू होते, असे जाणकार ठणकावतात. मात्र भाषा हे हत्यार भाई तुमच्याकडे परजून ठेवलेल्या विनाम्यान दुधारी शस्त्राप्रमाणे हातातच असल्याने ‘मॅड सखाराम’द्वारा ‘सखाराम बाईंडर’ची शकले झाली असावीत. मॅड सखाराम हे विडंबन नाट्य नसून ते टीकानाट्य अधिक वाटते. मराठी रंगभूमीला टीकानाट्याची बिलकूल सवय नाही. आपले लेखक कथाबीजाला एपिसोडमध्ये रूपांतरित करून यथेच्छ रद्द लिहितील. मात्र तुम्ही केलेला टीकानाट्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा. नाही म्हणायला दळवींच्या पुरुष नाटकावर हृषिकेश कोळीने असाच एक चांगला प्रयत्न करून पाहिला होता. पण नंतर मात्र नाही कुणी सरसावला. आजकाल तर प्रत्येक समीक्षक आणि नाटककार “तुझ्या गळा माझ्या गळा” म्हणतंच नाटके प्रसवताहेत. असो… तर काय सांगत होतो, विजय तेंडुलकरांचा घोडा पहिल्या-वहिल्या लेखन प्रक्रियेपासूनच आविष्कार करीत चौखूर उधळला असताना, सखाराम बाईंडर ही त्यांची महत्त्वाची पागा होती. अबलख घोड्यावर स्वार झालेल्यांच्या नाकातोंडात राजकीय आणि सामाजिक धूळ गेली; परंतु कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हे किती अश्लाघ्य आहे यांची बोंब परिवर्तनवाद्यानी मारली. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने घेतलेल्या आक्षेपांचाही समाचार ज्या पद्धतीने घेतलात त्यामुळे तुम्ही इकडचे की तिकडचे कळायला मार्गच उरत नाही.

लक्ष्मी आणि सखारामच्या संभाषणात लक्ष्मीला सांगून आलेल्या एका स्थळाचे वर्णन करताना तुम्ही लिहिता…

लक्ष्मी : चांगला होता हो, लग्ना-मुंजीची, संक्रांतीची, पुढाऱ्यांच्या स्वागताची, कुठे लढाई आली, तर ‘पुढे चला, पुढे चला’ची गाणी लिहायचा. सरकारातून नेमणूक झाली. नाटकातलं अश्लील हुडकायला… त्याचीच कावीळ झाली की हो त्याला. रोजचं वर्तमानपत्र देखील वाचताना अश्लील अश्लील म्हणून ओरडायला लागला, मला बुरख्यात घातलं, घरातल्या कुत्र्यालादेखील तुमान घालून न्यायचा… कोंबड्यांना झबली चढवली पाहिजेत म्हणायचा. कुणीतरी घोडागाडीला टांगा म्हणाले, त्याच्यावर अश्लील बोलतो म्हणून धावला. शेवटी एका काॅलेजातल्या पोरीकडून मारदेखील खाल्ला.

सखाराम : का?

लक्ष्मी : अहो टेप घेऊन धावायचा पोरींच्या मागून – त्यांच्या झग्याची लांबी मोजायला.
किंवा डायरेक्ट वार करताना तुम्ही चंपा आणि सखारामच्या संभाषणातही सेन्साॅरचे संदर्भ आणता…

चंपा : अभिनेत्री? पक्की छत्री ती-ती बी आन् त्यो बी, पक्की बारा——— (सखाराम कानात बोटं घालतो) गावचं पानी प्यालेली.

सखाराम : ठीक आहे – हे वाक्य सुटेल.

चंपा : कशातून सुटेल?

सखाराम : नाटक, तमाशा, रास, कविता, मेळा – पूर्व परीक्षण मंडळाच्या कात्रीतून…!

सततच्या कोपरखळ्या आणि कोट्यांनी भरलेला हा नाट्यप्रयोग म्हणजे मेजवानी होती. भाई, तेंडुलकरांनी वापरलेल्या काही काही प्रतीकांचा तुम्ही विपर्यास करून जो फज्जा उडवलात त्याला तोड नाही. उदा. पारंपरिक मृदंग या वाद्याच्या ऐवजी भिकाऱ्यांच्या हाती असलेली छोटी एकतारी सखारामच्या हाती दिलीत. तिचा वापर करताना तोंडातून ‘टँव’ असा आवाज काढून निळूभाऊंना प्रत्यक्ष मृदंग वाजवायला न लावता ध्वनिमुद्रित ध्वनिसंकेताच्या वापराची उडवलेली फार सूक्ष्म आहे; परंतु याचे सारे श्रेय मंगेश सातपुतेंना जाते. हे सर्व तुम्हाला पत्र लिहून कळविण्याचा अट्टाहास एवढ्याच साठी की, हे नाटक म्हणजे “भगवान श्री सखाराम बाईंडर” विपर्यासी टीकानाट्य प्रायोगिक आविष्कार करू पाहणाऱ्यांना नक्कीच झोंबले असणार. त्याचे व्यावसायिक रूप प्रेक्षकांपर्यंत का पोहोचले नाही, याचे कारण सापडते. मुळात स्वतःचे असे एकतरी नाटक लिहा, असा आरोप तुमच्यावर सदोदित होत असतो. त्यामुळे तुमचे हे टीकानाट्य वर्मी नाही लागले, तरच नवल..! “बाईंडरचे दिवस” सांगता सांगता नौकेचा भरकटलेला सुकाणू आम्ही वाचला आहे. कप्तानाने तर त्यात राजकीय रंग भरले होते. मात्र तुम्ही त्या प्रयोगामुळे उद्भवलेले राजकीय पडसाद टाळलेत हे बरे केलेत. समाजाची माथी भडकवणारा गणेशपूजेचा प्रसंग, चंपाचा बहुचर्चित साडी बदलण्याचा प्रसंग, चंपाचे दारू पिणे असे अनेक असांस्कृतिक प्रसंग मूळ नाटकात तेंडुलकरांनी लिहून ठेवले आहेत. आपल्याला नाटक या माध्यमातून नेमके कुठले स्वातंत्र्य अपेक्षित आहे? हा केवळ विचार तुम्ही सळसळणाऱ्या कानेटीसारखा सोडून देता आणि मग दोष तरी आम्ही कुणाला द्यायचा? या व्यवस्थेने विणलेल्या जंजाळात फसत जातो.

बऱ्याच वर्षांनी तुमची अस्खलित मराठी ऐकून धन्य झालो. सुनील जाधव नामक नटाने सखाराम लकबींसह नेटाने सादर केला… आणि भाई तुमचं रूप मोने, कदम, परचुरेंबरोबर श्रेयस वैद्य ही छान सादर करतो. श्रेयसचा मला “भाई” म्हणा हा अाविर्भाव बिलकूल नव्हता, हे त्याच्या अभिनयाचे वैशिष्ट्य. तिच गत लक्ष्मीची आणि चंपाची. टीकानाट्याला अनुसरून अनुष्का बोहाडे आणि किरण राजपूत अचूक पंच काढतात. फक्त चंपा थोडी कमी लिहिलीत हा प्रश्न मला अभिनेत्रींच्या वतीने विचारावासा वाटतो (कृपया त्यास आंबटशौकिन हे विशेषण लावू नये.) मूळ नाटकात दोनच बाया असताना मुद्दाम तिसरी आणून सखारामाच्या स्त्रीलंपट प्रारब्धाबद्दल जे काही भाष्य केलंत, ते खरंच टोकाचं आहे त्यामुळे प्राजक्ता पवारही लक्षात राहिली भाई…!

बाकी नेटका प्रयोग सिद्धीस न्यायला अमोघ फडके, संदेश बेंद्रे, महेश शेरला आणि मंदार कमलापूरकर आदी खंदे वीर समर्थ आहेतच.

नाटकाच्या शेवटी हा पूर्णतः भक्तिमार्गाला लागलेला सखाराम प्रेक्षकांना दिसतो, त्याचे वर्णन करताना तुम्ही लिहिता, “भगवान श्री सखारामाचे सोज्वळ आयुष्य सुरू होते. आता इथून पुढे कसे पवित्र पवित्र..! उगीचच निषेध ओढावून घेणे नाही, बंदी नाही. म्हणजे म्हटलं तर काही नाही आणि न म्हणता सगळं काही आहे.” ही जी काही इकडचाही नाही आणि तिकडचाही नसण्याची भूमिका टीकाकारांनी शिकण्यासारखी वाटली…! म्हणूनच हा पत्रप्रपंच. भाई तुमची आठवण काढणारे आजही हयात आहेत आणि पुढल्या पिढीसाठी आम्ही तुम्हाला असेच जिवंत ठेऊ, याबाबत निश्चिंत राहा..!

तुमचाच मसालेवाईक,
कुबलांचा भालचंद्र

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -