Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीJanjira fort : चला जंजिरा पहायला! किल्ल्याचे दरवाजे उघडल्याने स्थानिक व्यावसायिक व...

Janjira fort : चला जंजिरा पहायला! किल्ल्याचे दरवाजे उघडल्याने स्थानिक व्यावसायिक व पर्यटकांमध्ये समाधान

संतोष रांजणकर

मुरूड : मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला (Janjira fort) २२ एकरांवर पसरलेला असून ४० फूट उंच भिंतींनी वेढलेला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक ये-जा करीत असतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात शासनाकडून या किल्ल्याचे दरवाजे बंद केले जातात. यामुळे या पावसाळी तीन महिन्यांत किल्ल्याच्या आतील आजूबाजूला भिंतीवर गवत आणि ५ ते ६ फूट उंचीची झाडे वाढल्याने या ठिकाणी सरपटणारी जनावरे असू शकतात. यापासून पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुरातत्व विभागाने किल्ल्याचे दरवाजे काही दिवस बंद ठेवून चहू बाजूला साफसफाईला सुरूवात करण्यात आली होती. आता पर्यटकांसाठी किल्ला फिरण्यायोग्य झाला असल्याने आज दि. ३० सप्टेंबर पासून किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले होणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाने दिली आहे.

पर्यटकांना शिडाच्या बोटीमधून प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक शिडाच्या बोटीत बसणे अधिक पसंत करीत असतात. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो आणि आर्थिक परिस्थिती भक्कम होत असते; परंतु किल्ला बंद असल्याने पर्यटकांनी या ठिकाणी पाठ फिरवल्याने स्थानिक व्यावसायिक चिंतेत आहेत. आजपासून जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खुले होणार असल्याचे समजताच सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी कधी खुले होतील, यासंदर्भात सहाय्यक संवर्धक (पुरातत्व विभाग) बंजरंग येलीकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, पावसाळ्यात किल्ला बंद असतो, त्यामुळे या किल्ल्याच्या आतील व बाहेरील बाजूस पाच ते सहा फूट उंचीची झाडे वाढली आहेत. काल मी स्वतः किल्ल्यात होतो, साफसफाई करत असताना बाजूने साप निघून गेला. या ठिकाणी विंचू पण आहेत. या सरपटणाऱ्या जनावरांपासून कोणाच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये याकरिता सर्पमित्रांनाही बोलविण्यात आले होते. साफसफाईकरिता १२ कामगार होते. कामगार मिळविण्यासाठी प्रयत्न करतो; परंतु गणपती उत्सव जवळ आल्याने कामगार मिळत नव्हते. त्यात अधूनमधून पाऊस पडत होता. त्यामुळे साफसफाईला उशीर होत होता. आमच्या कार्यालयातील बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुंगरे हे स्वतः साफसफाई करत होते. लवकरात लवकर किल्ला सुरु करावा यासाठी प्रयत्न आम्ही करत होतो. तरी स्थानिक बोट व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन बंजरग येलीकर यांनी केले. आजपासून जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खुले झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -