Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपिल्लू सोडणे...

पिल्लू सोडणे…

  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

‘त्या’ माणसाने ‘चोऱ्या होतात’, असे एक पिल्लू माझ्या डोक्यात सोडले होते. अशी अनेक माणसे अनेक पिल्लं आपल्या डोक्यात सोडत असतात. आपण त्या पिल्लांना घेऊन जडावलेल्या डोक्याने आयुष्य ओढत असतो. का? कशासाठी? उलट त्याचा नाहक त्रास आपल्यालाच होतो. त्यामुळे आपण या डोक्यात सोडलेल्या पिल्लांना, योग्य वळणावर सोडून थंड डोक्याने आयुष्याचा प्रवास करायला हवा.

गेल्या वर्ष-दोन वर्षांच्या काळात साधारण महिनाभरात तीन ते चार वेळा ट्रेनचा प्रवास करावा लागतोय, त्यामुळे शक्यतो रात्रीच्या प्रवासाची तिकिटे काढते. व्यवस्थित झोपून प्रवास करायचा प्रयत्न करते. कार्यक्रमाचा दिवस आणि वेळ ठरल्यानंतरच आपण तिकीट काढतो ना… ए. सी., स्लीपर, सीटिंग असे जे कोणते तिकीट मिळते ते काढते. शेवटच्या क्षणी कार्यक्रम ठरला, तर महिला जनरल डब्यातूनही दोनदा प्रवास केल्याचे आठवतेय. तरीही ट्रेनचाच प्रवास करणे पसंत करते. ट्रॅव्हल्स किंवा रस्त्याने प्रवास टाळते. गंमत म्हणजे एकदा अलार्म लावून झोपले की अलार्म वाजेपर्यंत मला शांत झोप लागते. त्यामुळे प्रवासानंतर ताजेतवाने होऊन मी दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी तयार असते. परतीच्या प्रवासातही अशीच पूर्ण झोप मिळाल्यावर ४-५ दिवस घरात अडलेली कामे अगदी आल्याक्षणापासून उत्साहाने सुरू करू शकते.

हे इतकं सगळं सांगण्याचे कारण म्हणजे ‘ट्रेनमध्ये शांत झोपणे’ या माझ्या आनंदावरच विरजण पडले. म्हणजे काय झाले ते जरा आता विस्तृत सांगते. थर्ड एसीचे तिकीट काढल्यामुळे मधला आणि खालचा झोपणारा माणूस जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत दोघेही झोपू शकत नाहीत. ट्रेनच्या प्रवासाची वेळ विचित्र होती म्हणजे संध्याकाळी सातला सुटणारी होती आणि मुंबईत ती पहाटे तीनला पोहोचणार होती. आमच्या सीटवर ज्याला वरचा बर्थ मिळाला होता, तो ९ वाजता झोपायला निघून गेला. मलाही वाटले भल्या पहाटे उठायचे आहे, तर ९.३० वाजता झोपून जावे. माझ्यासोबत मधल्या बर्थवर झोपणारा गृहस्थ छानपैकी मोबाइलवर काहीतरी स्क्रोल करत बसला होता. मी त्यांना विनंती केली की, “मला मध्यरात्री ट्रेनमधून उतरायचे आहे तर एक चार-पाच तास झोपावे असे वाटते आहे, तर आपण मधला बर्थ सरळ करूयात.” तर ते पटकन म्हणाले, “पण अजून मला जेवायचंय की.” मी म्हटले की ठीक आहे. अर्धा तास उलटला तरी तो माणूस काही जेवला नाही. मी ट्रेनमध्ये आजूबाजूला नजर टाकली, तर अर्ध्यापेक्षा जास्त माणसे झोपली होती किंवा कमीत कमी सीटवर आडवी पडली होती. १० वाजले तसे मी त्यांना विनंती केली की, “सर, मला दिवसभर कार्यक्रम होता, थकले आहे, झोपण्याची आवश्यकता आहे तर मी झोपू का?” ते म्हणाले, “मला अजून जेवायचे आहे.” मी म्हटले की, “जेवा ना मग.” ते म्हणाले, “मी १०.३० आधी जेवू शकत नाही.” तसेही ९.१५ वाजून गेले होते. साधारण १०.३५ ला त्यांनी त्याचा डबा उघडला. मी एक दीर्घ श्वास घेतला. मनात म्हटले… चला, दहा मिनिटांत झोपू शकू. शाळेत शिकवल्याप्रमाणे इतके हळूहळू छत्तीस वेळा प्रत्येक घास चावून, मोबाइल स्क्रोल करत त्यांनी रात्री ११ वाजेपर्यंत त्याचे जेवण उरकले. मी त्यांना परत विनंती केली की, “आपले जेवण झाले आहे तर मी झोपू शकते का?” तर ते म्हणाले, “या ट्रेनमध्ये झोपायचे नसते कारण, बरोबर रात्री ११.३० ते १२.००च्या सुमारास चोऱ्या होतात. या ट्रेनमधून मी दर दिवसाआड प्रवास करतो.” मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. मला तो माणूसच मला चोर भासला. मी त्यांना सहज विचारले की, “आपण कधी उतरणार?” तर ते म्हणाले, “साधारण १ वाजता.” माझ्या लक्षात आले की या माणसाला झोपायचेच नव्हते, कारण डुलकी लागली तरी त्यांचे स्टेशन निघून जाणार होते. त्यामुळे त्यांना कसाही अजून तास-दीड तास खेचायचा होता. मग माझ्या मनात आले की, मी त्यांचा का विचार करतेय? मी त्यांना म्हटले की, “सर मी साडेनऊपासून आपल्याला विनंती करत आहे की मला झोपायचे आहे. तर मी झोपू का? आपण मधली सीट टाकून घेऊया.” वैतागून, चिडून ते उठून उभे राहिले. मधली सीट लावायला त्यांनी मला मदतही केली नाही. मी स्वतःच एवढी जड फळी हाताने धरून त्यात कोएंडा अडकवला. माझी चादर पसरवली. उशी डोक्याखाली ठेवली आणि आडवे झाले. डोळे मिटले. स्वतःलाच ‘गुड नाईट’ ही म्हटले आणि मला आठवले की, साडेअकरा-बारा वाजता हमखास चोऱ्या होतात. ११ तर वाजूनच गेले होते. त्यामुळे झोप येणे शक्य नव्हते. त्या माणसाचा उद्देश कसेही करून मला बारापर्यंत बसवून ठेवण्याचा होता. जेणेकरून त्यांना त्या सीटवर निवांत बसता येणार होते आणि मग स्टेशन आल्यावर जागे असल्यामुळे उतरताही येणार होते. मी थकलेले होते. आडवे झाल्यावर माझे डोळे जड होऊ लागले, पण तरी ताणून ताणून मी त्याला उघडे ठेवत होते. सतत सीटखाली हात घालून आपली बॅग जाग्यावर असल्याची खात्री करत होते. वर पाहिले, तर ते शांतपणे झोपले होते.

साधारण १२.३० वाजता ते उतरून माझ्या पायापाशी बसले. त्यांच्या हातात त्यांचीच बॅग होती की, माझीही याची खात्री करण्यासाठी मी डोळे ताणून ताणून त्यांच्याकडे पाहत होते. अधूनमधून माझ्या बॅगेलाही हात लावून खात्री करून घेत होते की, ती व्यवस्थित आहे. साधारण पाऊण वाजता ते उतरण्यासाठी दाराकडे गेले. मी लाइट लावून माझी बॅग परत जाग्यावरच असल्याची खात्री करून घेतली. कोणते तरी स्टेशन आले असावे. बहुधा ते गृहस्थ उतरले असावेत… परंतु उतरण्याआधी ते माझी झोप उडवून गेले होते. माझ्या लक्षात आले की, या माणसाने ‘चोऱ्या होतात’ असे एक पिल्लू माझ्या डोक्यात सोडले होते. अशी अनेक माणसे अनेक पिल्लं आपल्या डोक्यात सोडत असतात. आपण त्या पिल्लांना घेऊन जडावलेल्या डोक्याने आयुष्य ओढत असतो. का? कशासाठी? माझ्या मनात विचार आला की आपल्या बॅगेत एक साधारण १०-१२ वर्षे वापरलेली एक साडी आणि एक वर्षभर वापरलेला ड्रेस होता. २-३ औषधं होती व कंगवा-पावडर इ. जिन्नस. तेवढ्यासाठी आज मी माझ्या रात्रीच्या झोपेचे खोबरे केले होते. स्वतःवरच रागावले, चरफडले. तर अनेकांनी आपल्या डोक्यात सोडलेल्या पिल्लांना, योग्य वळणावर सोडून आपण रिकाम्या डोक्याने, थंड डोक्याने प्रवास करायला हवा, मग तो दोन-चार स्टेशनांचा असो वा आयुष्याचा!

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -