Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनडोंबिवलीतील सातासमुद्रापार पोहोचलेल्या ‘गावच्या गोष्टी’

डोंबिवलीतील सातासमुद्रापार पोहोचलेल्या ‘गावच्या गोष्टी’

  • दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

कोविडचा काळ हा संपूर्ण जगासाठी सर्वात वाईट काळ ठरला. लाखो कुटुंबांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प झाले. कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. या साऱ्या दुष्टचक्रातून तिलादेखील जावे लागले. तिच्या घरातील महत्त्वाची व्यक्ती तिने गमावली. त्यांचा जाहिरात व्यवसाय ठप्प झाला. पुढे काय करायचं? हा यक्षप्रश्न होता. त्याचं उत्तर तिनेच शोधलं आणि नवीन व्यवसाय सुरू केला. आज हा व्यवसायाच तिची ओळख बनलेला आहे. तिने स्वतः उद्योगाची कास धरलीच, पण आपल्यासोबत महिलांना देखील रोजगाराची संधी दिली. तिचा उद्योग निव्वळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून सातासमुद्रापार पोहोचलेला आहे. ही अद्भूत गोष्ट आहे ‘गावच्या गोष्टी’च्या अर्चना पालव यांची.

अर्चनाचा जन्म कोल्हे कुटुंबात झाला. ती, भाऊ, आई अन् बाबा असं चौघांचं छोटं कुटुंब होतं. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं आणि अर्चनाचा जाहिरात क्षेत्रातील एका उमद्या तरुणासोबत विवाह झाला. तिचा प्रेमविवाह झाला. मनासारखा जोडीदार लाभला. नोकरी-मुलगा-घर या चक्रात अर्चना गुरफटली. छान सुखी असं हे तिघांचं जग होतं. कालांतराने तिचा मुलगा मोठा झाला. त्याने शिक्षण पूर्ण केलं. तो रंगशाला पब्लिसिटी या त्यांच्या परंपरागत व्यवसायात उतरला. याचदरम्यान कोविड आला आणि लॉकडाऊन लागू झाला. एक प्रकारे अवघं जग थांबलं होतं. दुर्दैवाने अर्चनाच्या संपूर्ण कुटुंबावर आभाळच कोसळलं. तिचे मोठे दीर गणेश पालव यांचे अचानक निधन झाले. घरातला कर्ता माणूस अकस्मात निघून गेला. कोणाला काहीच सुचत नव्हते. कालांतराने कुटुंब सावरलं. ‘संकटात पण संधी असते’, असं म्हणतात. पालव कुटुंबाने ते अनुभवलं. एक गाळा भाड्याने देण्याचा त्यांचा विचार होता; परंतु आपणच काहीतरी सुरू करूया, हा विचार अर्चना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात आला. इथेच ‘गावच्या गोष्टी’ या ब्रँडचा उदय झाला.

आपण गावावरून कोणी आले की विचारतो, ‘काय आणले आमच्यासाठी गावावरून?’ त्याला उत्तर आहे ‘गावच्या गोष्टी’. हे नाव तर वेगळे होते. पण खरी कसोटी होती, ग्राहकांना काहीतरी वेगळं आणि दर्जेदार खाद्यपदार्थ देण्याची. उत्तम व वेगळे तेच द्यायचे हा ट्रेंड ठेवला आणि बघता बघता ३०० पेक्षा जास्त खाद्यपदार्थ ‘गावच्या गोष्टी’मध्ये आले. प्रत्येक नवीन पदार्थ आधी ‘गावच्या गोष्टी’मध्ये टेस्ट केल्या जातात. त्याची चव, गुणवत्ता पसंतीस उतरली की, त्यानंतरच ती ग्राहकांना उपलब्ध होते. ग्राहकांची पसंती मिळाली की, तो पदार्थ दुकानात विराजमान होतो. दुकानात अनेक नामवंत, प्रतिष्ठीत व्यक्ती, कलाकार येतात व पाठीवर कौतुकाची थाप देतात त्याला तोड नाही.

‘आपल्याकडे खूप गृहिणी चांगले चांगले पदार्थ करतात. त्यांना आमचे दुकान व्यासपीठ म्हणून वापरायला देतो, कारण गुणवत्ता व दर्जा कधीच लपून राहत नाही. त्याला योग्य ठिकाणी प्रेझेंट करता आले पाहीजे. यासाठीच ‘गावच्या गोष्टी’ हे त्या गृहिणींचे हक्काचे व्यासपीठ आहे.’ असं अर्चना पालव सांगतात. ‘गावच्या गोष्टी‘मध्ये भाजणीची चकली, थालीपीठ भाजणी, रवाळ श्रीखंड, रबडी बासुंदी, आवळा मिठाई, अलिबागची खपटी, चुलीवर भाजलेले काजू, मधातील सुकेळी, घरगुती आगळ, चिंच, कोकम सरबत, आंबा करंजी, पेरू वडी, कडवे वाल, गावठी मटकी, पिवळे मूग, जगातला सर्वोत्कृष्ट ‘वाव लाडू’ असे अनेक चविष्ट पदार्थ मिळतात. यातील बऱ्याच पदार्थांनी देशाच्या सीमा कधीच ओलांडल्या आहेत. घरगुती हाताने बनविलेले पापड, कुरड्या, मिरगुंड, गहू शेवया या पदार्थांना परदेशात खूप मागणी आहे.

अमेरीका, जर्मन, ऑस्ट्रेलिया, जपान, हाँगकाँग अशा बऱ्याच देशांत हे पदार्थ पोहोचलेले आहेत. तिकडच्या लोकांनी हे पदार्थ आवडल्याचे आवर्जून फोन करून ‘गावच्या गोष्टी’चे कौतुक केले आहे. ‘या उपक्रमात अजून बऱ्याच गृहिणींना सामावून घ्यायचे आहे. त्यांच्या पदार्थाची चव प्रत्येक घराघरांत गेली पाहिजे, हा ध्यास आहे. व्यवसाय वाढल्याने शेजारचे अजून एक दुकान घेतले आहे. व्यवसाय वाढतो आहे, मेहनत आहे. पण लोक जेव्हा विचारतात अजून नवीन काय? मग आमचा उत्साह द्विगुणीत होतो, नवीन खाद्यपदार्थ शोधण्यासाठी सांस्कृतिक नगरी डोंबिवलीचा लौकीक वाढवण्यात आमचा पण खारीचा वाटा असावा, हीच भावना ठेवून प्रवास चालू आहे.’ हे सांगताना एक वेगळीच चमक अर्चनाच्या डोळ्यांत जाणवते.

५०० पेक्षा अधिक समाधानी कुटुंब सदस्य गावच्या गोष्टीने मिळवले आहेत. इथे जे मिळणार ते चांगलेच असणार, हा विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे. फणस सोलून गरे देणे, खाद्यपदार्थ पसंत नसले तर पूर्ण पैसे परत देणे, एक पदार्थ असला तरीदेखील होम डिलिव्हरी फ्री देणे, दुकानातला ग्राहक खरेदी न करता गेला तरी त्याला सदिच्छा भेटवस्तू देणे, पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्तीसोबत भेटवस्तू मोफत देणे, सणासुदीला प्रत्येक ग्राहकाचे तोंड गोड करणे या व अशा अनेक नावीन्यपूर्ण कल्पना राबविल्या जातात. या आदरतिथ्यासाठी एकवेळ तरी ‘गावच्या गोष्टी’ला अवश्य भेट दिली पाहिजे. महिलांना कानमंत्र देताना अर्चना पालव म्हणतात, “माझं सर्व गृहिणींना सांगणे आहे. अशक्य काहीच नसते. सकारात्मक विचार करा. यश तुमचेच आहे. आमच्या दोन्ही घरच्या मंडळींची, दुकानातील सहकाऱ्यांची व सर्व डोंबिवलीकरांची मी ऋणी आहे. आपल्या पाठबळाने एका गृहिणीचे रूपांतर उद्योजिकेत झाले.” आपल्यासारख्याच उद्योगक्षेत्रात अनेक ‘लेडी बॉस’ निर्माण करण्याचा अर्चना पालव मनोदय व्यक्त करतात. अर्चना पालव यांची ‘गावच्या गोष्टी’ भविष्यात स्त्री उद्योजिकांच्या ‘यशोगाथेच्या गोष्टी’ ठरेल, यात शंका नाही.

theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -