Saturday, May 4, 2024
Homeमहत्वाची बातमीनिधी नसल्याने कोकण रेल्वेचे हात वर

निधी नसल्याने कोकण रेल्वेचे हात वर

महाड: कोकण रेल्वेच्या दासगाव येथील पूल आणि भरावाची संयुक्त पाहणी आज (बुधवार) करण्यात आली. महाड पूर निवारण समितीने या पूल आणि भरावासंदर्भात मांडलेली भूमिका कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यावेळेस तत्वतः मान्य केली. महिनाभरात या पाहणीचा अंतिम अहवाल आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे कोकण रेल्वेकडून यावेळेस सांगण्यात आले. कोकण रेल्वेचा हा अहवाल भराव काढून टाकण्यास अनुकूल असला तर महाडकरांना दिलासा मिळणार आहे.

दि. २१ व २२ जुलै २०२१ रोजी आलेल्या महापुराने यापूर्वीच्या पुराची पातळी ओलांडल्याने ओढवलेल्या महाप्रलयास कोकण रेल्वेने दासगाव पुलाजवळ गोठ्यापर्यंत जो भराव केला आहे, तो प्रमुख कारणीभूत असल्याचा निष्कर्ष २२ डिसेंबर रोजी झालेल्या रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण रेल्वे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, खारभूमी लँड, महाड पूर निवारण समितीच्या बैठकीत काढण्यात आला होता. या संदर्भात कोकण रेल्वेने नियुक्त केलेल्या आयआयटी मुंबई या संस्थेचा अहवाल देण्यापूर्वी या समितीच्या तज्ज्ञांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून नंतर निष्कर्ष काढावा व अहवाल सादर करावा असे ठरवण्यात आले होते.

त्यानुसार आज आयआयटी मुंबईचे प्रमुख गुप्ता, कोकण रेल्वेचे अधिकारी कपिल पाटील, नागदत्त, महाडच्या प्रांताधिकारी पुदलवाड, महाडचे तहसीलदार काशिद, रायगड पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता धाकतोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सदाफुले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे भोये, पाटबंधारे विभागाचे प्रकाश पोळ महाड पूर निवारण समितीचे संजय मेहता, नितीन पावले आदी उपस्थित होते.

पाहणीनंतर, प्रशासकीय अधिकारी आणि पूरनिवारण समितीच्या सदस्यांनी, महाडच्या महापुराला हा पूल आणि भराव कसा कारणीभूत ठरला आहे, ते कोकण रेल्वेचे अधिकारी आणि आयआयटीच्या तज्ज्ञांना पटवून दिले. त्यावर साधकबाधक चर्चा करण्यात आली. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हा पूल आणि भराव पुराला कारणीभूत ठरत असेल तर काय उपाययोजना करता येतील याची माहिती देत, ते करण्याची तयारी दर्शवली.

या पाहणी दौऱ्याबाबत माहिती देताना महाडच्या प्रांताधिकारी पुदलवाड यांनी सांगितले की, दि. २२ डिसेंबर रोजी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेतील निर्णयानुसार आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ कोकण रेल्वेचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी कोकण रेल्वेचा दासगाव पूल ते गोठेपर्यंत केलेल्या भरावाची पाहणी केली.

कोकण रेल्वेचा अहवाल अद्याप तयार झालेला नाही. हा अहवाल तयार करण्यापूर्वी पूरनिवारण समिती आणि प्रशासनाने तयार केलेला अहवाल कोकण रेल्वेला देण्यात येईल. कोकण रेल्वेच्या अहवालात आयआयटीने त्यातील मुद्यांचाही समावेश करावा, अशी सूचना प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केली. ती कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. महिनाभरात अंतिम अहवाल तयार करण्यात येईल, असे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याने पुदलवाड म्हणाल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -