Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीUttarkashi Tunnel collapsed : उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत ८० तासांनंतरही मजूर अडकूनच

Uttarkashi Tunnel collapsed : उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत ८० तासांनंतरही मजूर अडकूनच

वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु

उत्तराखंड : उत्तराखंड (Uttarakhand) येथील उत्तरकाशी शहरामध्ये निर्माणाधीन सिल्क्यरा बोगद्याचा काही भाग कोसळल्याने (Uttarkashi Tunnel collapsed) ४० मजूर आतमध्ये अडकले. या घटनेला ८० तास म्हणजे तीन दिवसांहून अधिक काळ उलटल्यानंतरही या मजूरांना बाहेर काढण्यात अद्याप यश आलेले नाही. बचावकार्य (Rescue Operation) युद्धपातळीवर सुरु असून या कामगारांसाठी पाईपच्या मदतीने ऑक्सिजनचा व अन्नाचा पुरवठा केला जात आहे. कामगार सुरक्षित असल्याचे कळवण्यात आले असले तरी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

आज या रेस्क्यू ऑपरेशनचा चौथा दिवस असून मजुरांना वाचवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यमुनोत्री हायवेवर धरासू-बडकोटच्या बोगद्यामध्ये मजूर अडकलेले आहेत. त्यांच्याशी वॉकीटॉकीच्या माध्यमातून संपर्क केला जात आहे. दरम्यान, त्यांना वाचवण्यासाठी आता आधुनिक तत्रांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आज कामगारांना सुखरूप बाहेर काढले जाईल, असे तांत्रिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ऑगर मशिनच्या या मजूरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, मंगळवारी रात्री या मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे बुधवारी नवी दिल्लीहून नवीन मशीन मागवण्यात आली होती. वायुसेनेच्या दोन हर्क्युलस विमानांतून मशीन पार्ट्सची खेप चिन्यालिसौर विमानतळावर पोहोचली. रात्री उशिरा मशीनचा शेवटचा आणि महत्त्वाचा भाग सिल्क्यरा बोगद्याजवळ पोहोचवण्यात आला. त्यानंतर सकाळपासूनच मशीन बसवण्याची आणि ट्रायलची तयारी जोरात सुरू आहे. या मशीनच्या मदतीने पोकळीतून पडणारा ढिगारा थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे व खोदकाम सुरु आहे. यासोबतच हवाई दल आणि लष्करही बचाव कार्यात मदत करत आहे.

२४ तास देखरेख करणार

सिल्क्यरा बोगद्यातील भूस्खलनानंतर आता एनएचआयडीसीएलकडून (NHIDCL)व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे. ज्यामध्ये बचाव कार्यासोबतच बोगद्यातील परिस्थितीवर क्षणोक्षणी लक्ष ठेवले जात आहे. याबाबत माहिती देताना संबंधित एका कर्मचाऱ्याने सांगितले की, या कामासाठी दोन जणांना जबाबदारी देण्यात आली आहे. बोगद्यातील व्हिडीओ कॅमेरा २४ तास परिस्थिती आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवेल. तेथील फोटो देखील काढले जातील.

कामगार सुखरुप आहेत

तर NHIDCL PRO गिरधारीलाल यांनी सांगितले की, “आम्हाला प्रशासनाचा पाठिंबा आहे. आम्ही या बचाव प्रक्रियेत यशस्वी होऊ. मशीन ९९.९९% बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. सर्वजण ठीक आहेत. त्यांना वैद्यकीय मदतीची गरज नाही. पण तरी देखील, वैद्यकीय पथक इथे उपस्थित आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -