Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजकोवळी पालवी

कोवळी पालवी

कथा : डॉ. विजया वाड

लहानपणापासून किशोरी, निशिगंध बरोबर वाढले. मोठे झाले. ही किशू, तो निशी…. मैत्री, स्नेह ते प्रेम सगळ्या पायऱ्या पार पडल्या. निशिगंधला यूएसची शिष्यवृत्ती मिळाली नि किशूला पाहायला बाहेरची मंडळी येतायेत असं कळलं. निशीच्या पोटात तुटलं. तो आतून ढवळून निघाला. किशूला जाब विचारावा? पण कोणत्या आधारावर? अजून प्रेम अव्यक्त होतं. दोघांच्या मनात होतं. वाचा कोण फोडणार? किशोरी तर आनंदात दिसत होती.

“मकू अस्सा! मकू तस्सा!” निशीला ऐकूनच ऊबग आला.
“हे बघ मकू पुराण नको.”
“तू जळलास?”
“कशावर? कुणावर?”
“मकू इतका शानदार, रुबाबदार, पिळदार…”
“बस्”
“जळतोसच तू!”
“हो हो! जळतो!”
“का पण रे?”
“कारण? कारण…” शब्द अडखळले.
“मकू आज ‘फायनल’ करायला येणारे?”
“क्काय?”
त्याचा ‘आ’ मिटेना. घरात कोंडून बसला. सुन्न, निराश, हताश…
मकरंद आला. पसंती देऊन, ठरवून गेला, असं कळलं, तेव्हा नेत्रांतून अश्रू ओघळले.
“संपलं सारं.” तो हताशपणे म्हणाला. मनाशीच!
“काय झालं मकू?” आईनं विचारताच रडू फुटलं मकूला.
“किशूचं ठरलं!”
“अरे मग? लग्नाच्या वयात विवाह होणारच.” इति आई.
“तू का रडतोयस निशी!” आईनं खांद्यावर, पाठीवर हात फिरवीत मायेनं प्रश्न केला.
“कारण प्रेम व्यक्त करायचं राहिलं! आता बसा जन्मभर रडत.”
“तू हे थांबवू शकतोस!”
“पण कसा आई?” त्याचा आवाज रडका बसका झाला.
“किशू शिवाय जगणं अशक्य! असं वाटतयं ना?”
“हो. हो. होहोहो!”
“बेटर लेट दॅन नेव्हर! जाऊन सांग!”
“जातो.”
निशिगंध किशूकडे धावला.
“अरे, ये निशी. तुला पोहे आवडतात नं. आत्ताच मकूसाठी बनवले…” काकू म्हणाली.
“मी पोहे सोडले काकू!”
“अरे, पण का?”
“मकूला जे जे आवडतं; ते मी जन्मात खाणार नै!”
“का रे?”
“कारण माझी ठेव त्यांच्याकडून हिसकावून घ्यायची मला.” निशिगंध एका दमात बोलला. त्याला धाप लागली.
तरातरा किशोरीजवळ गेला. आक्रसून म्हणाला, “किशोरी, तू सरळ नकार दे मक्याला.”
“एक कारण सांग मला. तुझं म्हणणं मी ऐकेन.”
“किशोरी… मला खूप आवडतेस तू.”
“असं? मला हे ठाऊकच नव्हतं.”
“असं कसं? शक्यच नाही! अशक्य.”
“..………..”
“किशोरी तू माझी बस! फक्त माझी.”
त्याच्या डोळ्यांतून भळाभळा पाणी वाहू लागलं.
“अरे रडू नकोस ना! प्लीज! माझ्या राजा!”
“माझ्या राजा? तुला आपली जवळीक नकोशी झाली.”
“मला खूप वाटतं रे!”
“पण कसंय ना. मी उच्चार केल्याशिवाय तुझं पत्थरदिल हृदय; त्याला पाझर फुटणार नाही.”
“मी चालले आता.”
“नको गं नको. तुझ्याशिवाय जगणं; दगड म्हणून जगणं!”
“इतकं प्रेम करतोस माझ्यावर?”
“हो हो किशोरी.”
“निशू… निशी…”
“किशू राणी.” ते दोन प्रेमी जीव घट्ट मिठीत बद्ध होते. कोवळी पालवी भराभर मनीप्लँटसारखी वाढत होती, चढत होती…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -