Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनकोकणातील ‘नमन खेळे’ आता राज्य गाजवणार!

कोकणातील ‘नमन खेळे’ आता राज्य गाजवणार!

दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीमध्ये स्थानिक लोककला असलेल्या ‘नमन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे येथील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ, तर मिळालेच; परंतु या कलेची दखल राज्य शासनाने घेतली, हे विशेष आहे.

कोकण ही भूमीच कलेची, कलाकारांची भूमी आहे. इथल्या किलोमीटरनुसार जशी इथली भाषा बदलते तशीच इथली कला-संस्कृतीसुद्धा बदलते. तळकोकणात म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दशावतार ही कला लोकप्रिय झाली आहे. या दशावताराला सुद्धा इथे मोठी परंपरा आहे. अनके मोठे कलाकार या दशवताराने महाराष्ट्राला दिले आहेत. गावोगावी होणाऱ्या सण-उत्सवामध्ये, जत्रेमध्ये दशावतार सादर केला जातो. रात्र-रात्र जागून ही दशावतार रंगतो. तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्गची ओळख जशी ‘दशावतार’ ही आहे, तशीच ‘नमन खेळे जाकडी’ ही ओळख रत्नागिरीची आहे. या भूमीला नमन भजनाची मोठी परंपरा आहे. गावागावांत मनोरंजनास्ठी नमन जाकडी खेळली जाते.

कोकणात दोन उत्सव मोठे समजले जातात. ते म्हणजे भाद्रपदातील गणेशोत्सव आणि फाल्गुनातील शिमगा हे दोन सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. अशावेळी चाकरमानी मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी परत येत असतात. या काळात गावागावांत उत्सवाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. अशा वेळी मनोरंजनासाठी नमन खेळे गवळण सादर केली जाते.

नमनाची सुरुवात ही खेळ्यांपासून होते, खेळे गायनातून विविध देवतांची आराधना करतात. त्यानंतर संखासूर नृत्य अन् मग गणेशाची आराधना होते. पुढे कृष्ण संवंगड्यांसह गवळणी अन् मावशीसोबत थट्टामस्करी मनोरंजन होत रासलीला दाखवीत कृष्णाच्या ८ अवतारांसह नमनाचा पहिला भाग संपतो. नंतर लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनपर भाष्य करणारे हास्यकल्लोळासहित काळजाचा ठोका चुकविणारे फार्स नाट्यकृती सादर करीत नमनाचा दुसरा टप्पा संपतो. त्यानंतर काल्पनिक, पौराणिक, ऐतिहासिक कथांच्या आधारे एक चित्तथरारक वगनाट्य सादर करीत नमनाचा सांगावा केला जातो. दशावतारप्रमाणेच कोकणात रात्री सुरू झालेले नमन दुसऱ्या दिवशी सकाळी कोंबडा आरवेपर्यंत चालतं. यातूनच रंगभूमीची सेवा केली जाते. यातूनच कलाकार घडत असतात. असे अनेक कलाकार या भूमीने याच कलांमधून या राज्याला दिले आहेत.

राज्य शासन गेल्या काही दिवसांपासून अशा विविध कलांसाठी व्यासपीठ मिळवून देत आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरीत गेल्या आठवड्यात भरवण्यात आलेल्या नमन महोत्सवाला उत्तम प्रतिसाद तर मिळालाच; परंतु अनेक स्थानिक कलाकारांना एक मोठं व्यासपीठसुद्धा मिळालं. कोणत्याही कलेला राजसत्तेचं पाठबळ मिळालं की ती कला आणि कलाकार बहरतात. त्यामुळे या महोत्सवामुळे रत्नागिरी आणि परिसरात होणाऱ्या या ‘नमन खेळे’ या लोककलेला उत्तम भविष्य आहे, यात वाद नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -