Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजKonkan Temples : कुंभार्लीतील आई महाकाली देवी

Konkan Temples : कुंभार्लीतील आई महाकाली देवी

  • कोकणी बाणा : सतीश पाटणकर

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कुंभार्लीतील आई महाकाली देवीची यात्रा म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक. या साऱ्यांना एकत्रित ठेवणारी ताकद म्हणजे नवसाला पावणारी आई महाकाली देवी. जागृत देवस्थान म्हणून कुंभार्लीतील आई महाकाली देवी प्रसिद्ध आहे. कुंभार्ली हे स्थान शिरगाव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावांचे मुख्य देवस्थान आहे.

हाकेला धावणारी व नवसाला पावणारी आई असे जागृत देवस्थान म्हणून कुंभार्लीतील आई महाकाली देवी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कुंभार्लीतील आई महाकाली देवीची यात्रा म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक. कुंभार्ली हे स्थान शिरगाव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावांचे मुख्य देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. आई महाकालीने आपले सर्व अधिकार सुखाई आणि वरदायिनी या दोन लहान बहिणींना बहाल केलेले आहेत. सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्ग रमणीय परिसरात कौलारू मंदिरात श्री सुखाई, वरदायिनी, महाकाली असून तिथे मंदिर दोन वास्तूत विभागले आहे. मुख्य वास्तूमध्ये सुखाई आणि वरदायिनी तसेच शेजारच्या वास्तूमध्ये श्री आई महाकाली आहे. त्यांच्या ठिकाणी परंपरेनुसार रूपी लावणे आणि वार्षिक उत्सव साजरे केले जातात.

कुंभार्ली हे स्थान शिरगाव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावचे मुख्य देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. आई महाकालीने आपले सर्व अधिकार सुखाई आणि वरदायिनी या दोन लहान बहिणींना बहाल केलेले आहेत. म्हणूनच प्रथम दर्शन या दोन बहिणींचे घेतल्यानंतर महाकालीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. तीन भावांनी दीर्घकाळ गुण्यागोविंदाने नांदावे, त्यांच्यातील एकी आदर्श ठरावी अशा पद्धतीने चिपळूण तालुक्यातील शिरगाव कुंभार्ली पोफळी ही तीन गावे एका कुटुंबाप्रमाणे नांदत आहेत. शके १२०९ सालापासून शिरगावकडे मोठ्या भावाची तर कुंभार्ली, पोफळी यांच्याकडे धाकट्या भावाची भूमिका आहे. या तीन गावांचे देवस्थान सुकाई, वरदायिनी, महाकाली या साऱ्यांना एकत्रित ठेवणारी ताकद आहे.

फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला महाकाली देवीची यात्रा दरवर्षी भरते. या यात्रेत सर्व समाजातील प्रत्येक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे प्रत्येकावर जबाबदारी असते, त्यामुळे स्वाभाविकच एकोपा असतो. शिरगाव हा मोठा भाऊ म्हणजे शिंदे त्यानंतर कुंभार्लीचे कोलगे, पोफळीचे पवार आणि सय्यद बांधव मानकरी आहेत. या तीन गावांचे देवस्थान महाकाली येथील लोक व्यवहार आणि संस्कृती हिंदू-मुस्लीम धर्मियांना एकत्रित बांधणारी आहे. नवल वाटावी अशी गोष्ट म्हणजे गावच्या लोकरहाटीत हिंदूंसोबत सय्यद बांधव यांनासुद्धा सारखेच स्थान आहे. या ठिकाणी १८ कुंभाचे मानकरी आहेत आणि त्या प्रत्येक जातीला मान आणि स्थान आहे हे शके १२०९ सालापासून सुरू आहे. महाशिवरात्रीला यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. यात्रे दिवशी देवीचा मंदिरातील गाभाऱ्यात विड्यांचा मांड भरला जातो. या मांडाची विधिवत पूजा-अर्चा केली जाते. त्यावेळी या वर्षीच्या मानकरीला तिथे बसवून मांडलेल्या पान विड्यांची पूजा केली जाते. मानकरांच्या उपस्थितीत मंदिराला ढोलताशांच्या गजरात वाजत-गाजत ५ प्रदक्षिणा घातल्या जातात. नंतर पुन्हा मंदिराच्या समोर येऊन देवीचे दर्शन घेत मंदिराच्या समोर असलेल्या खुल्या मैदानावर असलेल्या बगाडाला पाच प्रदक्षिणा मारतात. या प्रदक्षिणा मारताना बगाडातील लाटेची दोरी मानकरींसोबत गोल फिरवली जाते. पाच प्रदक्षिणा घालून झाल्यावर तीन गावचे मानकरी व सर्व ग्रामस्थ मंदिरात जाऊन देवीला सामुदायिक आराज लावतात. नंतर नवस फेडण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर मांडलेल्या विड्यांचा मांड, प्रसाद तीन गावांतील मानकरींचा मान म्हणून प्रत्येकाला त्यातील एक एक विडा वाटला जातो. त्यानंतर पुढील नियोजित कार्यक्रमाला सुरुवात होते.

देवी महाकालीच्या यात्रेअगोदर १५ दिवस अगोदर आकुसखा बाबांचा उरूस भरतो, तेथे सर्वधर्मीय जातात. हिंदू धर्मीयांची परंपरागत शेरणीही तेथे असते. अशा तऱ्हेने वर्षानुवर्षे अंत्यत सहज भावाने लोक गुण्यागोविंदाने येथे नांदत आहेत. मुस्लीम बांधवांच्या ईद, मोहरम या सणात हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. गेली अनेक वर्षे या तीन गावांत अतूट नाते पाहावयास मिळत असून तीन गावे एका कुटुंबाप्रमाणे नांदत आहेत. या साऱ्यांना एकत्रित ठेवणारी ताकद म्हणजे नवसाला पावणारी आई महाकाली देवी. यात्रेसाठी खास मुंबईहून उत्कृष्ट फुलांची सजावट मंदिरात केली जाते. येथे संमिश्र संस्कृती कशी नांदते याचा पडताळा या काव्यातून येतो. माळेच्या गुरू बहिणी! माळेला कवड्या चार…! तिच्या भेटीला आला पीर!! महाकाली देवीच्या नावाचा गजर आखाती देशात म्हणजेच साता समुद्रापलीकडे होऊ लागला आहे. माझी आई महाकाली देवी नवसाला पावणारी असल्याचं इथले भाविक सांगतात.

शिमगोत्सवही पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. होळीच्या दिवशी पालखी शृंगारते. शिरगावच्या सहाणेवर वार्षिक बैठक होते व वर्षभराचे नियोजन तीन गावांच्या संमतीने होते. तीन बहिणींच्या ओटी भरल्यानंतर सुवासिनीला एक ओटी परत दिली जाते, म्हणजेच सुवासिनीची ओटी भरली जाते. या मंदिरातील दरवाजे रात्रंदिवस उघडे असते. जागृत देवस्थान असलेल्या महाकाली देवीच्या अस्तित्वाचा प्रत्यय अनेकांना आला आहे. शिरगाव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावांची ही देवी. या देवीचे वर्षभरातील सारे उत्सव अत्यंत आनंदाने, शांततेत आणि भक्तिभावाने साजरे होतात. तीन गावांची कमिटी आणि तीन गावांतील ग्रामस्थ अगदी भक्तिभावाने सर्व उत्सव साजरे करतात. मुस्लीम बांधवदेखील या देवीचे मानकरी आहेत. सय्यद बांधव यांच्याकडे देवीचा मान आहे. शिंदे, कोलगे, पवार, सय्यद, मानकर, शेट्ये, गुरव, लाड, लांबे, काजवे, रहाटे, बेकर, म्हात्रे, लाखणं, सुवार, सुतार, महाजन आणि नाभिक ही सारी मंडळी उत्साहाने उत्साहात सहभागी होतात.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -