Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIPL 2024कोलकाता पंजाबवर भारी

कोलकाता पंजाबवर भारी

अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत रोमहर्षक विजय

कोलकाता (वृत्तसंस्था) : वरुण चक्रवर्तीची दमदार गोलंदाजी आणि नितीश राणा, आंद्रे रसेल यांची फटकेबाजी त्याला मिळालेली रिंकू सिंहची निर्णायक खेळी पंजाबविरुद्धच्या सामन्यात कोलकातासाठी यशस्वी ठरली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रिंकू सिंहने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत कोलकाताला विजय मिळवून दिला.

पंजाब किंग्जने दिलेले १८० धावांचे लक्ष्य गाठताना कोलकाता नाईट रायडर्सला बरी सुरुवात मिळाली. सांघिक फलंदाजी करत कोलकाताने विजय सोपा केला. त्यात कर्णधार नितीश राणाने ५१ धावांचे योगदान दिले. आंद्रे रसेलची बॅट चांगलीच तळपली. त्याला रिंकू सिंहने छान साथ दिली. त्यामुळे कोलकाताने फटकेबाजी करत सामना आपल्या बाजूने वळवला होता. परंतु शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत कोलकाताला झुंजवले. कोलकाताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची आवश्यकता होती. थरारक अशा या सामन्यात रिंकू सिंहने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत कोलकाताला विजय मिळवून दिला. रसेलने ४२ धावा फटकवल्या. रिंकू सिंहने १० चेंडूंत नाबाद २१ धावा फटकावत कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. रिंकूची ही खेळी निर्णायक अशी होती. पंजाबचा अर्शदीप सिंग महागडा गोलंदाज ठरला असला तरी त्याने शेवटचे निर्णायक असे षटक अप्रतिम टाकले. राहुल चहरने पंजाबकडून चांगली गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २३ धावा देत २ विकेट मिळवल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. प्रभसिमरन अवघ्या १२ धावा काढून तंबूत परतला. प्रभिसमरन याच्यानंतर भानुका राजपक्षे यानेही विकेट फेकली. एका बाजूला विकेट पडत असताना शिखर धवनने संयमी फलंदाजी केली. धवनने पंजाबच्या डावाला आकार दिला. त्याने ४७ चेंडूंत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत धवनने नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. नितीश राणाने धवनची खेळी संपुष्टात आणली. लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांना चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात हे दोन्ही फलंदाज अडकले. कर्णधार शिखर धवनच्या अर्धशतकाच्या बळावर पंजाबने निर्धारित २० षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात १७९ धावांपर्यंत मजल मारली. शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रार यांनी अखेरच्या षटकांत दमदार फलंदाजी केली. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. आंद्रे रसेलने एक षटक टाकले पण तो महागडा ठरला. त्याला एका षटाकात १९ धावा चोपल्या. पंजाबच्या फलंदाजांनी रसेलच्या एका षटकात ४ चौकार लगावले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -